लाख रुपयांची झाडेही रातोरात गायब !

नितीन नायगावकर
शनिवार, 13 मे 2017

लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या झोपड्यांच्या आत एखाद्या नासधूस केली, तरी कुणीही बघायला नाही. एकूणच एकमेकांकडे बोट दाखवून रामभरोसे सोडण्यात आलेल्या दक्षिण मध्य केंद्राला कोट्यवधीचा चुना लागल्याशिवाय जाग येणे शक्‍य वाटत नाही

नागपूर - दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील संचालकांचा बंगला आणि बाहेरच्या परिसरात असलेली लाखो रुपयांची शोभेची झाडे रातोरात गायब झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मूर्ती आणि झाडे एका वैशिष्ट्य "पॅकेज'मध्येच केंद्राच्या बाहेर गेल्याची चर्चा जोरात असून यासंदर्भातही अंतर्गत "संशयकल्लोळ' सुरू झाला आहे.

मुख्य म्हणजे मूर्ती आणि झाडे चोरी होऊन जवळपास तीन महिने होत असताना घटना उघडकीस आली. अर्थात ती उघडकीस आणण्यातही केंद्रातील कर्मचारी-अधिकारी वर्गापैकी एकाने पुढाकार घेतल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. संचालकांचा बंगला आणि परिसर सजविण्यासाठी एक ते दोन हजार रुपयांची जवळपास दहा झाडे सरकारी पैशातून खरेदी करण्यात आली होती. ज्या दिवशी मूर्ती चोरी झाल्या त्याच दिवशी झाडेही झाडेही गायब झाली. चार एकरांच्या परिसरात दोन सुरक्षारक्षक वगळता कुठलीही यंत्रणा नसल्यामुळेच घात झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. प्रशासकीय अधिकारी सुदर्शन पाटील यांनी चौकशी करू असे म्हटले तरी, त्यांच्याकडे कुठलेही अधिकार नाहीत. शिवाय प्रभारी संचालकांचे पाय नागपुरात टिकत नसल्यामुळे त्यांनाही यात फारसा रस नाही. अर्थात प्रभारी संचालक डॉ. साजिथ यांच्यापर्यंत चोरीचा मामला पोहोचला की नाही, हादेखील प्रश्‍न आहेच.
दक्षिण मध्य केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराने परिसरात येणाऱ्यांची कुठलीही नोंद होत नाही. कार्यालयीन वेळेत परिसरात कोण आले आणि कोण गेले, याचा रेकॉर्ड ठेवण्याची पद्धतच केंद्रात नाही. मोठे उत्सव किंवा प्रदर्शनांमध्ये भेट देणाऱ्यांची नोंद ठेवणे अशक्‍य आहे, मात्र इतर वेळी ते अपेक्षित आहे. परिसरात प्रवेश केल्यानंतर तेथील सुरक्षारक्षक गाडी पार्क करण्याची जागा दाखवतो आणि कुणाला भेटायचे आहे, एवढाच प्रश्‍न विचारतो. तुम्ही गाडी पार्क करा आणि काहीही उत्तर देऊन संपूर्ण परिसर सहज फिरू शकता. लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या झोपड्यांच्या आत एखाद्या नासधूस केली, तरी कुणीही बघायला नाही. एकूणच एकमेकांकडे बोट दाखवून रामभरोसे सोडण्यात आलेल्या दक्षिण मध्य केंद्राला कोट्यवधीचा चुना लागल्याशिवाय जाग येणे शक्‍य वाटत नाही.

कुणी लावले "चंदन'?
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या मागील भागात सार्वजनिक बांधकाम विभागाची मोकळी जागा आहे. काही वर्षांपूर्वी याच मोकळ्या जागेतील चंदनाची झाडे चोरीला गेल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यावेळी पीडब्ल्यूडीचे नुकसान झाले असले तरी केंद्राच्या सुरक्षेचा मोठा प्रश्‍न उपस्थित झाला होता. पण, तत्कालीन केंद्र संचालक त्या घटनेनेदेखील भानावर आले नव्हते.

Web Title: Trees stolen