तोंडी तलाकची पद्धत चुकीची नाही- मोहंमद सलीम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

जमाते इस्लामे हिंदतर्फे जनजागृती अभियान

मुस्लिम पर्सनल लॉ काय आहे हे समाजावून सांगण्यासाठी जनजागृती अभियान राबविले जात असल्याचे सलीम यांनी सांगितले.

नागपूर : मुस्लिम पर्सनल लॉ रद्द करून त्याऐवजी समान नागरी कायदा लागू करण्यासाठी तोंडी तलाकचा मुद्दा पुढे केला जात आहे. हे राजकीय षड्‌यंत्र असल्याचा आरोप जमाते इस्लामी हिंदचे राष्ट्रीय महासचिव मोहंमद सलीम इंजिनिअर यांनी आज (ता. 7) येथे केला. तोंडी तलाकची मूळ पद्धत चुकीची नाही, असेही ते म्हणाले.

संघटनेतर्फे मुस्लिम पर्सनल लॉ संदर्भात आयोजित जनजागृती अभियानाच्या समारोपीय कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या तोंडी तलाकच्या मुद्द्यावरून देशभरात वादळ निर्माण झाले आहे. यावरून अनेक गैरसमजदेखील निर्माण केले जात आहे. ते दूर करण्यासाठी आणि मुस्लिम पर्सनल लॉ काय आहे हे समाजावून सांगण्यासाठी जनजागृती अभियान राबविले जात असल्याचे सलीम यांनी सांगितले.

तोंडी तलाकची मूळ पद्धत चुकीची नाही. गैरसमज किंवा शिक्षणाच्या अभावातून अनेकजण एकाचवेळी तीनदा तलाक म्हणून विभक्त होतात. ही पद्धती चुकीची असून, त्याचे कुणीही समर्थन करीत नाही. शिक्षणाचा अभाव, अल्प माहिती, गैरसमज व जाणीवपूर्वक केलेल्या चुकीच्या आचरणातून तोंडी तलाकविषयी संभ्रम निर्माण झाला आहे, असे सलीम यांनी सांगितले.