तुळशीविवाहाची आजपासून लगबग 

tulasi-vivah
tulasi-vivah

भंडारा - हिंदू संस्कृतीत तुळशीचे माहात्म्य व पावित्र्य सर्वश्रुत आहे. धार्मिकदृष्ट्या तुळशीच्या रोपट्याला महत्त्व असले तरी प्रत्येकाच्या दारात असणारी तुळस ही वैज्ञानिक व पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्वाची भूमिका बजावते. पारंपरिक तुळशीविवाह सोहळ्याला शुक्रवार (ता.11) पासून प्रारंभ होणार असून 14 नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यासाठी शहर आणि परिसरात लगबग दिसून येत आहे. तुळशीच्या लग्नासाठी महिला तयारीला लागल्या आहेत. दिवाळी आटोपल्यानंतर मावळलेल्या उत्साहाला पुन्हा उधाण आले आहे. बाजार ऊस, हारफुले, रांगोळ्या व फटाक्‍यांच्या दुकानांनी सजला आहे. 

अंगणातील तुळशीवृंदावन रंगविण्यात येत आहे. विवाहासाठी मातीच्या सुबक वृंदावनांची विवाहासाठी साफसफाई चालू आहे. तुळशीविवाहानिमित्त दरवर्षी अनेकजण आपले तुळशी वृंदावन आकर्षण पद्धतींने सजवितात. यावर चांगला खर्च केला जातो. यात रंगकाम, विद्युत रोषणाई शिवाय अन्य कामांचा यात समावेश असतो. 

तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सौभाग्य लेणं, नवीन वस्त्र विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पूजेसाठी लागणाऱ्या चिंचा, आवळा, फळे आणि फुले आदींनी बाजार बहरू लागला आहे. 

या सोहळ्यासाठी तुळशी वृंदावन रंगरंगोटी करून सुशोभित केले जाते. तुळशीभोवती रांगोळी काढली जाते. उसाचा मांडव घालून आवळे व चिंचा ठेवल्या जातात. बाळकृष्णाची षोडशोपचारे पूजा केली जाते. गोरज मुहूर्तावर (सायंकाळी) श्रीकृष्ण-तुळशीचा विवाह धुमधडाक्‍यात पार पडतो. आता पूजासाहित्य, फळफळावळ, फुलांच्या खरेदीबरोबरच तुळशीविवाहाची धामधूम सर्वत्र पहायला मिळत आहे. अलीकडे बऱ्याच वसाहतींमध्ये सामूहिक तुळशीविवाह सोहळे आयोजित करून भोजनाचा कार्यक्रमसुद्धा केला जातो. या निमित्ताने एक वेगळे वातावरण तयार होते. 

तुळशीच्या लग्नानंतर विवाह मुहूर्ताला प्रारंभ 
तुळशीविवाहानंतर विवाह मुहूर्त काढून लोक आपापल्या मुलामुलींची लग्ने त्या मुहूर्तानुसार लावत असत. विवाहात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी हे विवाह मुहूर्त काढण्याची प्रथा आणि परंपरा समाजात रूढ झाली होती. ही मुहूर्त काढण्याची प्रथा आजच्या काळातही कायम आहे. तुळशीला घरची कन्या असेही मानले जाते. श्रीकृष्णासारखा आदर्श पती कन्येला मिळावा, असे संकेतसुद्धा या घटनेच्यामागे आहेत. 

तुळस ही औषधीयुक्त 
तुळस हवेतील कार्बन डायऑक्‍साइड शोषून घेते. शरीर निरोगी राहण्यासाठी तुळशीची पाने खाल्ली जातात. मुखदुर्गंधी रोखण्यासाठीसुद्धा मुखामध्ये तुळशीची पाने ठेवली जातात. तुळशीत अनेक औषधी गुण आहेत. तिचे हे औषधी सामर्थ्य ओळखूनच मानवाने तिला आपल्यासारखा दर्जा देऊन तिचे माहात्म्य वाढविले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com