दानवेंना जागा दाखवणे आवश्‍यक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

नागपूर - तूरखरेदीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जे वक्‍तव्य केले, ते एका जबाबदार लोकप्रतिनिधीला न शोभणारे आहे. त्यांच्या वक्‍तव्यामुळे केवळ शेतकऱ्यांची नव्हे तर, शेतमजूर आणि संपूर्ण कष्टकऱ्यांची अहवेलना झाली. त्यामुळे असे बेजबाबदार वक्‍तव्य करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू देण्याची गरज असल्याचा सूर सभेत व्यक्त करण्यात आला.

नागपूर - तूरखरेदीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जे वक्‍तव्य केले, ते एका जबाबदार लोकप्रतिनिधीला न शोभणारे आहे. त्यांच्या वक्‍तव्यामुळे केवळ शेतकऱ्यांची नव्हे तर, शेतमजूर आणि संपूर्ण कष्टकऱ्यांची अहवेलना झाली. त्यामुळे असे बेजबाबदार वक्‍तव्य करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू देण्याची गरज असल्याचा सूर सभेत व्यक्त करण्यात आला.

दानवे यांच्या निषेधार्थ दक्षिणायनतर्फे मंगळवारी (ता. 16) संविधान चौकात निषेध सभा घेण्यात आली. या वेळी उपस्थितांनी शेतकरीविरोधी सरकार चले जाओ, शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या सरकारचा धिक्‍कार असो, असे नारे देत निषेध नोंदविला. ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर, शेतकरी नेते विजय जावंधिया, ज्येष्ठ समाजसेविका लीलाताई चितळे, प्राचार्य बबन तायवाडे, अमिताभ पावडे, माजी कुलगुरू शरद निंबाळकर, हरिभाऊ केदार, डॉ. सुनीती देव, अरुणा सबाने, रंजीत मेश्राम, बबन नाखले, तन्हा नागपुरी, प्रमोद मुनघाटे, सुभाष तुलसिता, बबन नाखले, मारोती वानखेडे होते.

दानवे यांचे वक्‍तव्य म्हणजे कष्टकऱ्यांचा आवाज बंद करण्याचा प्रकार आहे. लोकप्रतिनिधींची भाषा ही सभ्य आणि संविधानाशी बांधीलकी असणारी असली पाहिजे. मात्र, तेच आज असभ्य भाषेचा वापर करीत आहे. त्यामुळे अशांना धडा शिकविण्यासाठी मतदान करताना डोक्‍यात संविधान ठेवा.
- यशवंत मनोहर, ज्येष्ठ विचारवंत.

शेतकरी संकटात असताना त्याला मदत करून परिस्थिती सुधारणे ही सरकारची जबाबदारी असताना भाजपचे जबाबदार नेते मात्र बेजबाबदार वक्‍तव्य करीत आहेत. ही दुर्दैवाची बाब आहे. असे बेजबाबदार वक्‍तव्य करणाऱ्याना लगाम लावण्याची खरी गरज आहे.
- लीलाताई चितळे, ज्येष्ठ समाजसेविका.

भाजपच्या नेत्यांना सत्तेचा माज आला असल्यानेच अन्नदात्याविषयी अशी असभ्य भाषा वापरीत आहे. तूरखरेदी करून सरकारने शेतकऱ्यांवर कोणतेही उपकार केले नाही, तर ती सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे अशा सरकारला धडा शिकविण्याची हीच वेळ आहे.
- विजय जावंधिया, शेतकरी नेते.

शेतकऱ्यांविषयी भाजप सरकारला खरोखरच कळावळा असेल तर त्यांनी दानवेंचा त्वरित राजीनामा घ्यावा.
- प्राचार्य बबनराव तायवाडे

शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्‍नावर सरकारकडून अहवेलना केली जात आहे. त्यातच दानवे यांच्या वक्‍तव्याने भाजप सरकार शेतकरीविरोधी असल्याचे स्पष्ट होते.
- हरीभाऊ केदार

भाजप सरकारच्या अजेंड्यावर कुठेच शेतकरी नसल्याचे त्यांच्या धोरणावरून स्पष्ट होते. घरची करते देवा देवा, अन्‌ बाहेरचीला चोळी शिवा असेच धोरण सरकारने शेतकऱ्यांसाठी अवलंबल्याचे सध्या चित्र आहे.
- अमिताभ पावडे, शेतकरी अभ्यासक.

Web Title: tur purchase issue