मोबाईल वॅलेट वापरणाऱ्यांनो, सावधान! 

मोबाईल वॅलेट वापरणाऱ्यांनो, सावधान! 

नागपूर - रोकडरहित (कॅशलेस) व्यवहाराकडे सर्वसामान्यांचा कल वाढत असतानाच मोबाईल वॅलेट तसेच यासारख्या इतर ऍप वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. रोकडरहित व्यवहारासाठी उपयुक्त असलेल्या या ऍपमुळे तुमच्या मोबाईलमधील छायाचित्रे, संपर्क तसेच इतर स्टोअरेज डेटा सार्वजनिक होत आहे. तेव्हा रोकडरहित व्यवहार करताना "जरा बचके रहना रे बाबा' हेच धोरण योग्य असल्याचे सायबर गुन्हे विश्‍लेषक ऍड. महेंद्र लिमये यांनी सांगितले. 

नोटाबंदीच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर रोकडरहित व्यवहार करण्याचे आवाहन केंद्र सरकारतर्फे करण्यात येत आहे. तंत्रस्नेहींसह सर्वच जण रोकडरहित व्यवहार करताना दिसताहेत. मोबाईल वॅलेटने तर सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. अगदी चहा-नाश्‍ताच्या टपरीपासून ते मोठाल्या मॉलपर्यंत मोबाईल वॅलेटचा वापर सुरू आहे. मात्र, सायबरतज्ज्ञांच्या मते ऑनलाइन रोकडरहित व्यवहार फारसा सुरक्षित नाही. मोबाईलद्वारे होणारा हा व्यवहार तुमची खासगी माहिती सार्वजनिक करण्यास कारणीभूत ठरत आहे. यावर उपाय म्हणून ऑनलाइन व्यवहारांसाठी स्वतंत्र मोबाईल आणि क्रमांक वापरायला हवा. तसेच वैयक्तिक मोबाईल क्रमांक या व्यवहारांसाठी वापरू नये. याऐवजी नवीन क्रमांक विकत घ्यावा, असे ऍड. लिमये म्हणाले. आजघडीला संपूर्ण जग ऑनलाइन होत असताना आपण मागे राहू शकत नाही. कधी ना कधी तरी ऑनलाइन व्यवहार करावे लागतात. यामुळे असे व्यवहार करताना शक्‍य तितकी दक्षता घेणे आवश्‍यक असल्याचा सल्ला ऍड. लिमये यांनी सर्व मोबाईल उपभोक्‍त्यांना दिला. 

पोर्न पाहाल तर हॅक व्हाल 
पौगंडावस्थेतील मुलामुलींमध्ये पोर्न पाहण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. पोर्न पाहिल्यानंतर गुगल हिस्ट्री मिटविल्याने सारे काही संपले, या गैरसमजात कुणीही राहू नये. इंटरनेटवरून काहीही मिटविता येत नाही. तुम्ही केलेल्या प्रत्येक कृतीची नोंद तिथे कायमस्वरूपी होत असते. तसेच पोर्न संकेतस्थळांना भेट देणाऱ्यांचे ई-मेल खाते, ऑनलाइन व्यवहार हॅक करणे सोपे जात असल्याचे ऍड. लिमये म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com