वेलिंगकरांची समजूत काढण्याची जबाबदारी नितीन गडकरींवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

नागपूर - गोव्यात भाजपविरुद्ध बंडाचे निशाण फडकवणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रांत संघचालक, तसेच भारतीय भाषा संरक्षण समितीचे अध्यक्ष सुभाष वेलिंगकर यांची केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री, तसेच गोव्याचे निवडणूकप्रमुख नितीन गडकरी समजूत काढणार असल्याचे समजते. 

नागपूर - गोव्यात भाजपविरुद्ध बंडाचे निशाण फडकवणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रांत संघचालक, तसेच भारतीय भाषा संरक्षण समितीचे अध्यक्ष सुभाष वेलिंगकर यांची केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री, तसेच गोव्याचे निवडणूकप्रमुख नितीन गडकरी समजूत काढणार असल्याचे समजते. 

विशेष म्हणजे वेलिंगकर केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि नितीन गडकरी यांच्यावर नाराजी व्यक्‍त करून भाजपच्या विरोधात लढण्यासाठी संघातून बाहेर पडले आहेत. गोव्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे अनुदान बंद करावे आणि कोकणी भाषेचा अभ्यासक्रमात समावेश करावा या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. मात्र यास गोवा सरकारचा विरोध आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर, नितीन गडकरी त्यांचेच ऐकत असल्याने वेलिंगकर यांनी बंडाचे अस्त्र उगारले आहे. एवढेच नव्हे तर गोव्यात भाजपला पराभूत करण्यासाठी आपले समर्थक विधानसभेची निवडणूक लढवतील, अशीही घोषणा वेलिंगकर यांनी केली आहे.
 

त्यांच्या भूमिकेमुळे भाजपला धक्का बसला आहे. पण त्यापेक्षा अधिक चर्चा होत आहे ती स्वयंसेवकांनी प्रथमच पुकारलेल्या उघड बंडाची. यामुळेच वेलिंगकर यांची समजूत काढण्याची जबाबदारी संघाने गडकरींवर सोपविल्याचे कळते. गडकरी पुढील वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी आहेत. वेलिंगकर यांच्या समर्थकांनी विधानसभा निवडणूक लढविल्यास भाजपच्या मतांमध्ये मोठे विभाजन होण्याचा धोका आहे. अनेक वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेले हे राज्य हातातून जाणेही भाजपला परवडणारे नाही. यामुळे याच आठवड्यात नितीन गडकरी गोव्याला जातील आणि वेलिंगकर यांची समजूत काढतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Velingakaranci Nitin Gadkari on the responsibility of understanding removal