विदर्भात सरासरी 55 टक्के मतदान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

नागपूर - दुसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीत विदर्भातील तीन महानगरपालिकांसाठी मंगळवारी (ता. 21) सरासरी 55 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अमरावती जिल्हा परिषद, पंचायत समिती, गडचिरोलीतील चार तालुके, तर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील काही जागांसाठी मतदान झाले. याची सरासरी 65 टक्‍क्‍यांच्या आसपास आहे. 

नागपूर - दुसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीत विदर्भातील तीन महानगरपालिकांसाठी मंगळवारी (ता. 21) सरासरी 55 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अमरावती जिल्हा परिषद, पंचायत समिती, गडचिरोलीतील चार तालुके, तर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील काही जागांसाठी मतदान झाले. याची सरासरी 65 टक्‍क्‍यांच्या आसपास आहे. 

यंदाच्या तुलनेत नागपूरकरांनी भरभरून मते दिल्याने शहरात अंदाजे 55 टक्के मतदान झाले असून 1 हजार 135 उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले. 2012 च्या निवडणुकीत 52 टक्के मतदान झाले होते. सकाळपासून सायंकाळपर्यंत मतदार राजाने कुणाला कौल दिला, याबाबतची चर्चा सुरू झाली असून, प्रत्येकालाच आता निकालाची उत्सुकता लागली आहे. गुरुवारी (ता.23) सकाळी 10 वाजतापासून शहरातील 12 केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. 

सकाळी साडेसात वाजता शहरातील 2 हजार 783 मतदान केंद्रांवर मतदानास प्रारंभ झाला. शहरातील गर्भश्रीमंत भाग सोडला तर मध्यमवर्गीय रहिवासी क्षेत्रांमधील मतदान केंद्रांवर सकाळी गर्दी दिसून आली. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत चार तासांत 18 टक्के मतदान झाले. त्यानंतर मात्र, मतदानाच्या टक्केवारीचा आलेख वेगाने वाढला. दीड वाजेपर्यंत 30 टक्के तर साडेतीन वाजेपर्यंत 45.72 टक्के मतदान झाले. अर्थात साडेअकरा ते साडेतीन या चार तासांमध्ये 28 टक्के मतदानाची भर पडली. काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडणे, मतदान केंद्रावरील यादीत नाव नसणे असे प्रकार सोडले तर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आई सरिता आणि पत्नी अमृता यांच्यासह धरमपेठ हिंदी शाळेत मतदान केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महालच्या टाउन हॉल मतदान केंद्रात तर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघ मुख्यालयाजवळील भारत महिला विद्यालयात मतदान केले. 

अमरावती जिल्हा परिषदेच्या 59 व पंचायत समितीच्या 88 जागांसाठी जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. जवळपास 60 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी 417 तर पंचायत समितीच्या 88 गणांसाठी 533 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्ह्यात 1 हजार 786 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. 

अमरावती महानगरपालिकेत सरासरी 55 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. निवडणुकीत 627 उमेदवारांचे भाग्य यंत्रात बंद झाले. अनेक दिग्गज या निवडणुकीत भाग्य आजमावत असून त्यांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. जिल्हा स्टेडियममध्ये मतमोजणी होणार आहे. महापलिका निवडणुकीच्या रिंगणात 627 उमेदवार आहेत. महिला व युवा मतदारांनी मतदानात उत्स्फूर्त सहभाग घेतला. 

माओवाद्यांच्या धमकीनंतरही दुसऱ्या टप्प्यात नक्षलग्रस्त भागात मतदानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. येथे 68.27 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात एटापल्ली, भामरागड, अहेरी व सिरोंचा या चार तालुक्‍यांतील 16 जिल्हा परिषद क्षेत्र व 32 पंचायत समिती गणांसाठी एकूण 242 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले. जिल्हा परिषदेच्या 16 गटांसाठी 89, तर पंचायत समितीच्या 32 गटांसाठी 153 उमेदवार रिंगणात आहेत.

Web Title: Vidarbha average 55 per cent of voting