विदर्भात मॉन्सून सात जूनपर्यंत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

नागपूर - यावर्षी मॉन्सून अंदमानमध्ये एक आठवड्यापूर्वीच दाखल झाल्यामुळे विदर्भातही मॉन्सूनचे लवकर आगमन अपेक्षित आहे. सध्याची अनुकूल स्थिती कायम राहिल्यास येत्या सात जूनपर्यंत विदर्भात मॉन्सून धडक देईल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक अविनाश ताठे यांनी "सकाळ'ला दिली.

ताठे म्हणाले, विदर्भात मॉन्सून प्रत्यक्षात कोणत्या तारखेला येईल, याबद्दल आतापासून ठामपणे सांगता येणार नाही. पुढील काही दिवसांमध्ये मॉन्सूनची प्रगती कशी राहाते, यावर सर्वकाही अवलंबून राहील. सद्यस्थितीत मॉन्सूनची प्रगती अनुकूल असून, असाच प्रवास कायम राहिल्यास येत्या सात जूनपर्यंत मॉन्सून विदर्भात प्रवेश करण्याची दाट शक्‍यता आहे. मॉन्सून दरवर्षी 15 ते 20 मेदरम्यान अंदमानात प्रवेश करतो. मात्र, यावेळी 14 मे रोजीच दाखल झाला. केरळमध्ये 30 किंवा 31 मे रोजी पोहोचल्यास विदर्भात यायला किमान एक आठवडा लागेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. विदर्भात मॉन्सूनच्या आगमनाची अपेक्षित तारीख 7 किंवा 8 जून आहे. यावेळी लवकर आगमन होणार असल्यामुळे बळीराजासाठी निश्‍चितच "गुड न्यूज' म्हणता येईल. शिवाय यावर्षी पाऊसही "नॉर्मल' राहणार असल्याचे भाकीत, हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आले आहे.

उन्हाची लाट आणखी दोन दिवस
विदर्भातील उन्हाची लाट मंगळवारीही कायम राहिली. नागपुरात कमाल तापमानात किंचित घट होऊन 45.5 अंशांवर आले, तर चंद्रपूर येथे पारा 46.8 अंशांपर्यंत चढला. उन्हाची लाट आणखी दोन दिवस कायम राहणार आहे. तसा इशारा हवामान विभागातर्फे आज देण्यात आला.

Web Title: vidarbha monsoon in 7th june