मॉन्सून सोमवारपर्यंत विदर्भात नागपूर वेधशाळेचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

नागपूर - मॉन्सूनची आतुरतेने प्रतिक्षा करत असलेल्या विदर्भवासियांची प्रतिक्षा आता संपणार आहे. उशिरा का होईना मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून, स्थिती अनुकूल राहिल्यास येत्या सोमवारपर्यंत विदर्भात मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्‍यता वेधशाळेने वर्तविली आहे.

प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक अविनाश ताठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सूनने कर्नाटक व आंध्रप्रदेशनंतर गोवा व कोकणातही प्रवेश केला आहे. मॉन्सूनची प्रगती अशीच कायम राहिल्यास आणि कसलाही अडथळा न आल्यास येत्या रविवार किंवा सोमरवारपर्यंत मॉन्सूनचे विदर्भातही आगमन अपेक्षित आहे. त्याचवेळी बंगालच्या उपसागरातही जोरदार पावसासाठी अनुकूल "सिस्टीम' तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तिकडूनही मॉन्सूनचे वारे विदर्भाच्या दिशेने येण्याची दाट शक्‍यता आहे. मॉन्सून उंबरठ्यावर असल्यामुळे साऱ्यांनाच उत्सूकता लागली आहे. विशेषत: बळीराजा मृगधारा बरसण्याची आतुरतेने वाट पाहात आहे. पावसाअभावी विदर्भातील पेरण्यांना अद्‌याप सुरूवात झाली नाही. दरम्यान, नागपूर वेधशाळेने शनिवारपासून तीन दिवस संपूर्ण विदर्भात मॉन्सूनपूर्व वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे. हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवून शेतकऱ्यांना यापूर्वीच आनंदाची बातमी दिलेली आहे. सुधारित अंदाजानुसार 98 टक्‍क्‍यांपर्यंत पाऊस होण्याची शक्‍यता आहे.

मॉन्सूनचे विदर्भातील आगमन

वर्ष तारिख
2011 18 जून
2012 20 जून
2013 9 जून
2014 11 जून
2015 14 जून
2016 19 जून