विदर्भाचा पंतप्रधानांच्या नेतृत्वात विकास - नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

नागपूर - गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भाने अन्याय सहन केल्याचे नमूद करीत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज मागील आघाडी व यूपीए सरकारला दोषी ठरविले. पंतप्रधानांनी नागपूरला दिलेली भेट अविस्मरणीय असून त्यामुळे  विकासाचे नवे दालन उघडे होणार असल्याचेही ते म्हणाले. 

नागपूर - गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भाने अन्याय सहन केल्याचे नमूद करीत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज मागील आघाडी व यूपीए सरकारला दोषी ठरविले. पंतप्रधानांनी नागपूरला दिलेली भेट अविस्मरणीय असून त्यामुळे  विकासाचे नवे दालन उघडे होणार असल्याचेही ते म्हणाले. 

डिजिधन योजनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. गडकरी म्हणाले, पंतप्रधानांनी आज ट्रिपल आयटी, एम्स आणि आयआयएम या संस्थांचा पाया रचला. याशिवाय त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दीक्षाभूमीच्या टपाल तिकिटाचे लोकार्पण केले.  त्यामुळे त्यांनी नागपूरला दिलेली भेट अस्मिरणीय आहे. विदर्भाने आतापर्यंत अन्याय सहन केला. परंतु, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी असे डबल इंजिन आहे. त्यामुळे विदर्भाच्या विकासाचा मार्ग मोकळा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घेतला आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवा भारत घडत आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर दोन वर्षांत देशाचा महसूल २८ लाख कोटींपर्यंत पोहोचणार आहे. या महसुलातून तरुणांसाठी रोजगारनिर्मिती होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

नागपुरात इन्क्‍युबेशन सेंटर 
नागपुरात ट्रिपल आयटी सुरू होत आहे. नागपूर नवे आयटी क्षेत्र म्हणून उदयास येईल. त्यामुळे  या क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी नागपुरात २० हजार वर्गफुटात इन्क्‍युबेशन सेंटर सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली. या  सेंटरच्या माध्यमातून डिजिटल इंडियाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास लाभ होईल, असे ते म्हणाले. केंद्राच्या योजनेच्या एक रुपयापैकी  १५ पैसे गरिबांपर्यंत पोहोचत असल्याची खंत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिधनसारख्या योजनांच्या माध्यमातून गरिबांपर्यंत १०० टक्के निधी पोहोचविण्याचा प्रयत्न  होत असल्याचे ते म्हणाले.