घरात पाणी अन्‌ अंगणात चिखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जुलै 2016

मुलांना खेळायला पुरेसे मैदान हवे. वसाहतीत घसरगुंडी किंवा लहान मुलांना खेळण्याची व्यवस्था करावी. वसाहतीत एखादा हॉल बांधून मिळाल्यास सार्वजनिक कार्यक्रमासाठी तो वापरता येईल.
- अवंती राजूरवार

नागपूर - गणेशपेठ पोलिस वसाहतीच्या मागे असलेला कचरा आणि घाणपाण्यामुळे परिसरात डासांचा त्रास आहे. घरासमोरील कचऱ्यामुळे कुटुंबीयांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पावसाचे पाणी घरात आणि अंगणात साचलेल्या चिखलामुळे या वसाहतीतील रहिवासी त्रस्त झाले आहेत.

सर्वत्र अस्वच्छता आणि मोकाट जनावरांमुळे होणारा उपद्रव वसाहतीतील पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सहन करावा लागत आहे. गणेशपेठ ठाण्याच्या मागे कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ५१ घरांची (क्‍वॉर्टर्स) वसाहत आहे. पावसाळ्यात येथे राहणे दिव्यच आहे. पावसाचे पाणी घरासमोर साचते; तर रस्त्यावरील पाणी सरळ घरात शिरते. बराच वेळ घरातील पाणी बाहेर फेकण्यात कर्मचारी व्यस्त असतात. रस्त्यावरील तसेच छतांवरील पाण्यामुळे भिंतींना ओलावा असतो. भिंती झिरपत असल्यामुळे संपूर्ण घर नेहमीच ओलसर असते. 

भिंतींना बाहेरून शेवाळ
छताच्या लाकडी बल्ल्यांचा घाणेरडा वास सुटतो. बल्ल्या सडल्यामुळे छत कोसळण्याची शक्‍यताही आहे. रंगरंगोटी न केल्यामुळे दुरूनच घरे भकास दिसतात. घराच्या भिंतींना बाहेरून शेवाळ लागल्याने हिरवेगार दिसतात. येथे शिपायांपासून ते सहनिरीक्षकांपर्यंतच्या दर्जाचे अधिकारी राहतात. मात्र, त्या मानाने सुविधा खूपच कमी आहेत.

पार्किंगची व्यवस्था नाही
संपूर्ण वसाहतीत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना घरासमोरील रस्त्यावर दुचाकी उभ्या कराव्या लागतात. काही कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या पैशातून टिनपत्रे विकत आणून घरासमोर तात्पुरती डागडुजी केली आहे. काही घरांच्या खिडक्‍यांना काचा नाहीत. सार्वजनिक शौचालये तुटलेल्या अवस्थेत आहेत.

जप्तीची वाहने भंगारात
वसाहतीत पुरातन शिवमंदिर आहे. मात्र, मंदिराच्या बाजूलाच गणेशपेठ पोलिसांनी जप्तीची वाहने उभी केली आहेत. त्यामुळे वसाहतीत प्रवेश करताच भंगार विक्रेत्यांच्या गल्लीत आल्याचा भास होता. यासोबतच प्रत्येक घरामागचा भाग अस्वच्छ असल्यामुळे साप, विंचू व कीटकांची भीती आहे.
 

Web Title: Water and mud house in the courtyard