राज्य फूल कोणतं व्हय रं बावा?

राज्य फूल कोणतं व्हय रं बावा?

नागपूर - महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते? पडलात ना विचारात. बरोबरही आहे. कारण आपल्याला सर्वच माहिती असेल ही अपेक्षाही नसते. विभागीय आयुक्त कार्यालयासह शहरातील अनेक भागांतील वृक्षांना सध्या जांभळ्या रंगाची फुले दिसत आहेत. तेच आहे राज्य फूल. जारूळ अथवा बोंडारा असे त्यास म्हणतात. सोशल मीडियावर केलेल्या एका सर्वेक्षणात ९९ टक्के लोकांना राज्य फूल कोणते माहीतच नसल्याची बाबही यानिमित्ताने पुढे आली आहे.  

कडक उन्हाळ्यात जांभळ्या रंगाच्या फुलांनी फुललेले हे वृक्ष अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. शहरातील अनेक भागांत रस्त्याच्या शेजारी ही झाडे लावली आहेत. हे झाड साधारण गोलसर, डेरेदार असते. फूल पूर्ण उमलल्यानंतर सहा ते सात सेंटिमीटर व्यासाचे होते. त्या फुलाला झालरीसारखी दुमड असणाऱ्या सहा किंवा सात नाजूक, तलम चुणीदार पाकळ्या असतात. कोकणात नदीनाल्यांच्या काठांवर जारुळाची भरपूर झाडे दिसतात. बंगाल, आसाम, दक्षिण भारत, अंदमान निकोबार आणि श्रीलंकेतील जंगले येथे जारुळाची झाडे आहेत.  म्यानमार, मलाया, चीन या देशांत नदीकाठी आणि दलदलीच्या भागात मोठ्या प्रमाणावर हे वृक्ष आढळतात. जारुळाचे झाड सरासरी दहा ते वीस मीटर उंचीचे असते. भारतात त्याचा वापर अधिकतर शोभेसाठी केला. रायगड जिल्ह्यात माणगाव येथे जारुळाचा अंदाजे शंभर फूट उंचीचा वृक्ष आहे. लाकूड लालसर रंगाचे, मजबूत, टिकाऊ, चमकदार असते. टिकाऊपणा आणि उपयोग याबाबतीत जारूळ सागवानाच्या झाडाशी स्पर्धा करते. जारुळाचे लाकूड इमारती, होड्या, घरबांधणी, पूल, मोटारी, विहिरींचे बांधकाम, जहाजबांधणी, रेल्वे वॅगनसह विविध वस्तू बनवण्याच्या कामात वापरले जाते. 

युरोप-अमेरिकेपर्यंत पोचले जारूळ 
जारूळ वृक्ष भरपूर पाणी मिळणाऱ्या जागी वाढतो. हे झाड एप्रिल ते जूनच्या दरम्यान फुलून येते. त्याचे शास्त्रीय नाव लॅजिस्ट्रोमिया असे आहे. लिथ्रेसी किंवा मेंदी कुळातील हा सपुष्प वृक्ष. त्याला जारूळ तामण, बोंडारा, बोंद्रा, बुंद्रा अशी इतर नावेही आहेत. भारतीय उपखंडातले जंगली फूल म्हणून याची ओळख असली तरी त्याच्या गुणांमुळे ते फूल युरोप-अमेरिकेतही पोचले आहे. 

जारुळाचे औषधी गुणधर्म
ताप आल्यास या झाडाच्या सालीचा काढा दिला जातो. 
तोंड आल्यास जारुळाचे फळ तोंडाच्या आतून लावले जाते. 
ताम्हणाच्या पानांत-फळांत ‘हायपोग्लिसेमिक’ हे द्रव्य असते. ते मधुमेहावर गुणकारी आहे. 
पोटदुखीवर इलाज आणि वजन कमी करण्यासाठी या झाडाचा उपयोग केला जातो.

जारुळाला राज्य पुष्पाचा दर्जा शासनाने दिला आहे. देशातल्या वनस्पतीशास्रातील अभ्यासकांनी जारुळाला ‘प्राइड ऑफ इंडिया’ असे सार्थ नामकरण केले आहे. एप्रिल ते जून या कालावधीत या वृक्षाला आकर्षक फुले लागत असल्याने ते सर्वांचे लक्ष वेधून घेते. 
-सुधीर बावनकर, वनस्पती अभ्यासक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com