नवीन वर्षाची 'वाय-फाय' भेट

नवीन वर्षाची 'वाय-फाय' भेट

नागपूर - एकात्मिक तंत्रज्ञानाचा स्मार्ट सिटी प्रकल्प देशातील पहिला असून, यापुढे इतर स्मार्ट सिटींमध्ये नागपूरच्या या मॉडेलचा उपयोग केला जाईल. एवढेच नव्हे आजपासून सार्वजनिक वायफाय सुविधा देणारे नागपूर पहिले शहर ठरल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. एकात्मिक स्मार्ट सिटी तंत्रज्ञान प्रणालीमुळे वर्षाच्या शेवटी जगातून नागरिक शहर बघण्यास येतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

नागपूर स्मार्ट सिटीच्या दिशेने आगेकूच करीत असून, आज आणखी एक मैलाचा दगड गाठला. नववर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांनी शहराला वाय-फायच्या निमित्ताने "हाय-फाय' भेट दिली. दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत स्मार्ट सिटीच्या एकात्मिक तंत्रज्ञानावर आधारित सुविधांचे लोकार्पण केले. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आयटी विभागाचे प्रधान सचिव विजय गौतम, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम तसेच शहरातील आमदार, मनपा पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. जपानी गार्डन ते ऑरेंज सिटी हॉस्पिटलपर्यंत स्मार्ट रस्त्यावरील चौकांमध्ये वायफाय सुविधा मिळेल. 31 मार्चपर्यंत शहराच्या इतर भागातही ही सुविधा उपलब्ध होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. राज्य शासन व महापालिकेच्या एकात्मिक तंत्रज्ञान प्रणालीचे केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने कौतुक केले असून, इतर शहरासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. माहिती व तंत्रज्ञान सुविधेसाठी रचलेल्या या पायामुळे अनेक "ऍप' विकसित करून त्याचा नागरिकांना लाभ देणे शक्‍य होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रणालीने शहरात लावण्यात आलेल्या जागतिक दर्जाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे शक्‍य होईल. वाहनधारकाने वाहतूक नियमाची पायमल्ली केल्यास तो घरी पोहोचण्यापूर्वी दंडाची पावती त्याच्या घरी पोहोचेल, अशी सुविधा राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. वाहतूक, कचऱ्याचे व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रणासोबतच या प्रणालीमुळे चौकात उभारल्या जाणाऱ्या किऑस्कवर महापालिकेसह राज्य शासनाच्या सर्व सेवा उपलब्ध राहील. संचालन मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे यांनी तर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com