अपहरण करून युवकाचा खून दोघा भावंडांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

नागपूर-वाडी - जुन्या वादातून संतोष (32) व प्रशांत परतेकी (34) या भावंडांनी कुणाल शालीकराम चचाणे (18) या युवकाचे अंबाझरीतून अपहरण केले. दारू पाजल्यानंतर त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लाव्हाहद्दीत महादेवनगरच्या टेकडीवर फेकला. ही घटना बुधवारी सकाळी वाडीत उघडकीस आली. आरोपी भावंडांना अंबाझरी पोलिसांनी अटक केली. 

नागपूर-वाडी - जुन्या वादातून संतोष (32) व प्रशांत परतेकी (34) या भावंडांनी कुणाल शालीकराम चचाणे (18) या युवकाचे अंबाझरीतून अपहरण केले. दारू पाजल्यानंतर त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लाव्हाहद्दीत महादेवनगरच्या टेकडीवर फेकला. ही घटना बुधवारी सकाळी वाडीत उघडकीस आली. आरोपी भावंडांना अंबाझरी पोलिसांनी अटक केली. 

कुणाल हा तेलंगखेडीत राहतो. याच वस्तीत परतेकी भावंडं राहतात. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दोघांनी मंगळवारी सकाळी दहाला कुणाल तसेच मित्र आकाश पाल यांना फिरायला जाऊ, असे सांगून सोबत नेले. आधी सीताबर्डी, नंतर भिवसनखोरी गिट्टीखदान आणि त्यानंतर सायंकाळी ते वाडी परिसरात गेले. तिन्ही ठिकाणी आरोपी व कुणाल यथेच्छ दारू पिले. दारूच्या नशेत टुन्न झाल्यानंतर आकाश घरी परतला. प्रशांत आणि संतोषने कुणालला डोंगरावर नेऊन दगडाने ठेचून खून केला. बुधवारी सकाळी हे हत्याकांड उघडकीस आले. हत्याकांडाच्या उलगड्यात वाडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार आणि अंबाझरीचे भीमराव खंदाळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

हत्याकांडाचे कारण 
संतोष व जेम्स नावाच्या युवकाचे आठ दिवसांपूर्वी भांडण झाले. त्यामुळे संतोषला जेम्सचा काटा काढायचा होता. जेम्स हा कुणालचा मित्र होता. त्यामुळे संतोष आणि प्रशांत यांनी कुणालला सोबत आणण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, कुणालने त्याला सोबत न आणता स्वतः भेटून समेट करायला गेला. जेम्सला सोबत न आणल्याचे दोघांच्याही जिव्हारी लागले होते. 

भावने केली अपहरणाची तक्रार 
कुणाल रात्रभर घरी न आल्यामुळे भाऊ विशालने मित्र आकाश पालला विचारणा केली. त्याने संतोष व प्रशांतसोबत दारू पिण्यासाठी गेल्याची कबुली दिली. मात्र, मी परत आल्याचे सांगितले. भावाचे अपहरण केल्याची तक्रार विशालने अंबाझरी पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी कुणालचा शोध घेतला. परंतु, तो सापडला नाही. 

असा लागला सुगावा 
प्रशांत व संतोष दोघेही रात्रभर घरी नसल्याची माहिती विशालला मिळाली. भावाच्या जिवाशी काही बरेवाईट झाल्याची त्याला शंका आली. त्यामुळे त्याने अंबाझरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींनी हुडकून चांगल्या खाक्‍या दाखवला. दोघांनीही कुणालचा खून केल्याची कबुली दिली. त्यांनी लाव्हा येथील डोंगराजवळ मृतदेह दाखवला. 

Web Title: Youth murdered Two brothers arrested