ॲग्रोवन स्मार्ट शेतकरी ॲवाॅर्डचे वितरण २९ डिसेंबरला

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

पुरस्कार वितरण सोहळा
तारीख - २९ डिसेंबर २०१७
स्थळ - टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, पुणे
वेळ : सायंकाळी ४ ते ७ वाजता

पुणे - ‘ॲग्रोवन स्मार्ट शेतकरी ॲवाॅर्ड’चे वितरण २९ डिसेंबर रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात केले जाणार आहे. राज्यभरातील अकरा पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे.

राज्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींच्या अस्मानी आणि शेतकरीविरोधी धोरणांच्या सुलतानी संकटांचा सामना करत आहेत. याही परिस्थितीत अनेक शेतकरी कल्पकता, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आव्हानांवर मात करण्याची धडपड करत आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवलेल्या शेतकऱ्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली जावी आणि इतर शेतकऱ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी, या हेतूने हे पुरस्कार दिले जातात. या उपक्रमासाठी सोनाई कॅटल फिड्‌स, यूपीएल, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि, स्मार्टकेम फर्टीलायझर्स लि. बँक ऑफ महाराष्ट्र, ओरियंटल इन्शुरन्स, चौधरी यात्रा कंपनी प्रा. लि यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. 

राज्यस्तरीय सहा व विभागीय पाच अशा एकूण अकरा गटांमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या पुरस्कारांसाठी राज्यभरातील शेतकऱ्यांमधून मोठा प्रतिसाद मिळाला. त्रयस्थ निवड समितीने त्यातून अकरा विजेत्यांची निवड केली आहे. आजपासून टप्प्याटप्प्याने पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा `ॲग्रोवन`मधून केली जाणार आहे. या विजेत्यांच्या यशोगाथा आज (ता. २०) पासून प्रसिद्ध होत आहे. ‘ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी’ या पुरस्काराची घोषणा मात्र २९ डिसेंबरच्या मुख्य समारंभात केली जाईल. महाराष्ट्रातील कृषी व ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारा खास कार्यक्रम या प्रसंगी सादर केला जाणार आहे. 

राज्य पातळीवरील ‘ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी’ पुरस्कार मिळवणाऱ्या शेतकऱ्याला एक लाख रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. ‘ॲग्रोवन प्रेरणा’ आणि ‘ॲग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी’ पुरस्काराची रक्कम प्रत्येकी २५ हजार रुपये आहे, तर विभागीय पातळीवरील ‘स्मार्ट शेतकरी’ पुरस्कार तसेच सेंद्रिय शेती, कृषिपूरक व्यवसाय, कृषी उद्योजक पुरस्कार प्रत्येकी १० हजार रुपयांचा आहे. या विजेत्यांनाही सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra news agrowon smart farmer award