नोकरीला पर्याय शाश्‍वत सेंद्रीय शेतीचा 

अमृता जोशी
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

शिक्षण घेऊनही मुलांनी शेती करणे पालकांना कमीपणाचे वाटते. अशा तरुणांना योग्य दिशा देईल अशी पाऊलवाट प्रा. डॉ. अनिल रामगोंडा पाटील यांनी निवडली.

कोल्हापूर - शिक्षण घेतले तर चांगली भरगच्च पगाराची नोकरीच पाहीजे, असे स्वप्न अनेक मुले-मुली, त्यांचे आई-वडील पहातात. मनासारख्या नोकरीसाठी प्रचंड धडपड केल्यावरही पाच-दहा हजारांची नोकरी करण्याची वेळ अनेकांवर येते; मात्र हे तरुण नोकरीमागे धावण्याचे थांबवून घरच्या शेतीत लक्ष घालण्यास उत्सुक नसतात. शिक्षण घेऊनही मुलांनी शेती करणे पालकांना कमीपणाचे वाटते. अशा तरुणांना योग्य दिशा देईल अशी पाऊलवाट प्रा. डॉ. अनिल रामगोंडा पाटील यांनी निवडली.

अर्थशास्त्रात पीएचडी मिळवून प्राध्यापकाची नोकरी सांभाळत त्यांनी घरच्या शेतीत लक्ष घातले. आणि मौजे हालसवडे (ता. करवीर) येथे सेंद्रीय शेतीतून दीड एकरामध्ये 116 टन ऊसाचे विक्रमी उत्पादन घेतले. त्यासोबत आंतरपिके, मत्स्योत्पादन व गो-पालनात आघाडी घेतली आहे. 

वसंतराव नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय ते प्राध्यापक आहेत. महाविद्यालय विनाअनुदानितअसल्याने अनियमित वेतनाचा प्रश्‍न. आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी डॉ. पाटील यांनी सेंद्रीय शेतीचा पर्याय निवडला. त्यांनी दीड एकर माळावर अविरत कष्टातून शेती पिकवली. ताग, ढेंचा यांच्या हिरवे खताचा वापर करून त्यांनी माळ जमीन पिकाऊ बनविण्यासाठी मेहनत घेतली. सुरुवातीला शेती उत्पन्नातून पाणीपट्टीही भागत नव्हती. दोन-तीन वर्षे पाण्याचा प्रश्‍न होता; मात्र त्यांनी हार मानली नाही. एक-एक करून शेतीसाठी आवश्‍यक त्या सुधारणा केल्या. शेतात विहीर खोदून पाण्याचा प्रश्‍न सोडवला. पाईपलाईन, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचे योग्य नियोजन केले. थोडी-थोडी शेती करत 2005मध्ये पहिल्यांदा ऊसाचे उत्पादन घेतले. 2012-13मध्ये 116 टन शंभर टक्के सेंद्रीय ऊसाचे उच्चांकी उत्पादन घेतल्याबद्दल छत्रपती शाहू कारखान्याने प्रथम पुरस्कार देऊन गौरविले. ऊसाचा दर्जा अत्यंत चांगला असल्याने दर वर्षी इतर शेतकरी बियाण्यासाठी हा ऊस विकत घेतात. यामुळे ऊसातून चार ते पाच पट उत्पन्न मिळत आहे. शेतीसाठी घरातील व्यक्ती स्वतः काम करतात. 

मत्स्यशेती अन्‌ देशी गाय संगोपन 
शेतामधील खणीत पावसाळ्यात पाणी साठत असे. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एकनाथ काटकर यांच्या मार्गदर्शनातून, भोई समाज संस्थेच्या मदतीने या पाण्यात मत्स्यशेती केली. कटला, रोव्ह या गोड्या पाण्यातील माशांची आंध्र प्रदेशातून 50 हजार मत्सबीजे मागवून पाण्यात सोडली. भुईमुगाची पेंड, गव्हाचा भुसा, गव्हाच्या पिठाचे गोळे, शेण, कोंबडी खत यांचे खाद्य दिले जाते. शेतीसोबत दोन म्हशी, देशी गायीचे पालन केले आहे. देशी गायीच्या मल-मूत्र विक्रीतूनही नफा मिळतो. 

स्वतः कष्ट केल्याशिवाय शेती होत नाही. उत्पन्न आणि खर्चाचे गणित घातले पाहिजे. कोणतेही अनुदान, मदत यावर कधीच अवलंबून राहिलो नाही. रासायनिक खते, कीटकनाशके महाग असल्याने ती सामान्य शेतकऱ्यांना परवडत नाहीत. इतर शेतकरी रासायनिक खते वापरतात म्हणून आपणही ही खते वापरून विनाकारण खर्च वाढविण्यात अर्थ नाही. सेंद्रीय शेती हाच चांगला उपाय आहे. मातीचे परीक्षण करूनही खतांचे प्रमाण ठरवावे. 
- प्रा. डॉ. अनिल रामगोंडा पाटील, मौजे हालसवडे (ता. करवीर) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Dr Anil Patil success story