शेतकऱ्यांना १२०० कोटी डॉलरची मदत

Farmer Help by International
Farmer Help by International

वॉशिंग्टन, अमेरिका - चीन आणि युरोपियन संघाबरोबरच्या व्यापार विवादामुळे अमेरिकेतील शेतकऱ्यांना फटका बसला. चीनने सोयामील आणि कापूस आयातीचे करार रद्द केले. तर सोयाबीन, तूर, दूध आणि मांस तसेच विविध प्रकारची फळे, काजू आणि इतर पिकांची निर्यात थांबून शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ट्रम्प सरकार शेतकऱ्यांना एक हजार २०० कोटी डॉलरची मदत देणार आहे. 

देशातील शेतमाल निर्यातीला चीन, युरोपियन संघ आणि भारताबरोबरच्या विवादामुळे फटका बसल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अमेरिकेने एक हजार २०० कोटी डॉलरची मदत जाहिर केली आहे. या मदतीतून शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी अल्पकालीन उपाय करण्यात आले आहेत, असे अमेरिकेच्या कृषी विभागाने म्हटले आहे. ‘‘देशातील शेतकऱ्यांचे व्यापारात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अल्पकालीन उपाय करण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही मदत जाहिर केली आहे. ट्रम्प यांना ग्रामिण अर्थव्यवस्थेचे महत्त्व माहीत आहे. तसेच ते शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत. अमेरिकेतील शेतकऱ्यांवर अवास्तव आयातशुल्क लादले जात असताना सरकार हातावर हात मारून शांत बसणार नाही. देशातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजने ग्रामिण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, असे कृषी सचिव सॉन्नी पेर्ड्यू यांनी म्हटले आहे.

चीनकडून करार रद्द
अमेरिकेच्या सरकारने चीन वस्तूंवरील आयात शुल्क वाढविल्यानंतर त्यास प्रत्यूत्तर देताना चीननेही अमेरिकच्या वस्तूंवर शुल्क वाढविले. अमेरिकेच्या कापूस आणि सोयाबीनचा चीन हा सर्वात मोठा आयातदार आहे. मात्र चीनने आयातशुल्क वाढविल्यानंतर येथील आयातदारांनी केलेले सोयामील आणि कापूस आयातीचे करार रद्द केले. जूनपर्यंत चीनने जवळपास १४ कोटी डॉलरचे सायामील आयातीचे करार रद्द केले आहेत. तसेच चेरी आयातीवर देखील चीनने २५ टक्के आयातशुल्क वाढविल्याने उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागला.  

भारतातही शुल्क वाढीच्या हालचाली
मागील महिन्यात भारताने अमेरिकेच्या ३० वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव जागतिक व्यापार संघटनेकडे पाठविला आहे. मोटारसायकल, पोलाद आणि स्टीलच्या वस्तू, बोरिक ॲसिड आणि तूर आदी ३० उत्पादनांवर आयातशुल्क वाढविणार असल्याचा प्रस्ताव भारातने डब्ल्यूटीओकडे पाठविला आहे. या वस्तुंचे आयातशुल्क आधीच ५० ते ८० टक्क्यांवर आहे. 

या उत्पादनांंवर परिणाम
अमेरिकेच्या शेती व पूरक व्यवसायातील अनेक वस्तूंवर चीन, युरोपियन संघाने आयात शुल्क वाढविले आहे. त्यामुळे अनेक उत्पादनांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. सोयाबीन आणि तूर ही कृषी उत्पादने, दूध आणि मांस ही संलग्न क्षेत्रातील उत्पादने आणि विविध प्रकारची फळे, काजू आणि इतर काही महत्त्वाच्या पिकांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. शुल्क वाढीने उत्पादनांचा बाजार बदलला आणि दर वाढले त्यामुळे ही उत्पादने घेणाऱ्या शेतकऱ्यांना जवळपास एक हजार १०० कोटी डॉलरचे नुकसान झाले आहे.

अध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांना माहिती आहे, की शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. त्यामुळे त्याचे संरक्षण करण्यासाठी ते कोणतेही निर्णय घेण्यास तयार असतात. व्यापार विवादात सोयाबीन उत्पादकांचे सर्वांत जास्त नुकसान झाले आहे. आतापर्यंत एकूण उत्पादकांचे एकूण उत्पन्नापैकी २० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी मदत करणे गरजेचे होते. त्यामुळे अमेरिका सरकारने हा निर्णय घेतला आहे. 
- सॉन्नी पेर्ड्यू, कृषी सचिव, अमेरिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com