देशातील जलाशयांमध्ये ३२ टक्के पाणीसाठा

Water-Storage
Water-Storage

नवी दिल्ली - देशातील महत्त्वाच्या ९१ जलशयांमध्ये एका आठवड्यात पाणीसाठ्यात वाढ होऊन ५२.३५५ अब्ज घन मीटर पाणीसाठा झाला आहे. सध्या या जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली आहे. 

देशातील अनेक भागांत पावसाने जोरदार पुनरागमन केल्याने दिलासा मिळाला आहे. सध्या देशातील महत्त्वाच्या ९१ जलाशयांमध्ये असलेला पाणीसाठा हा मागील वर्षीच्या तुलनेत २५ टक्‍क्यांनी जास्त आहे. तर मागील १० वर्षातील सरासरी साठ्याच्या १६ टक्के जास्त पाणीसाठा आहे. 

त्रिपुरा, केरळमध्ये अधिक पाणीसाठा
देशात सध्या ज्या भागात पावसाचा जोर जास्त आहे त्या भागातील जलाशयांमध्ये पाणीसाठा जास्त आहे. गुरुवारी (ता. १९) त्रिपुरा राज्यात सरासरीपेक्षा १३१ टक्के जास्त पाणीसाठा आहे. केरळमधील जलाशयांमध्ये सरासरीच्या ११८ टक्के तर कर्नाटकमध्ये सरासरीच्या ९२ टक्के जास्त पाणीसाठा आहे. या तीनही राज्यांमध्ये मागील काही दिवसांत पावसाने थैमान घातले होते. कर्नाटकात किनार पट्टी तसेच मध्य भाग आणि केरळमध्ये जवळपास राज्यभर जोरदार पाऊस झाला होता. त्रिपुरा राज्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने जलाशयांतील पाणीसाठा वाढला आहे. 

अनेक राज्यात सरासरी  ओलांडली नाही
काही राज्यांधील साठ्याने सरासरी ओलांडली असली तरी अनेक राज्यांमध्ये कमी पाणीसाठा आहे. हिमाचल प्रदेशात सरासरीच्या ७० टक्के तर उत्तरखंडमध्ये २९ टक्के कमी पाणीसाठा असल्याची नोंद झाली आहे. या दोनही राज्यांमध्ये साधारणतः जास्त पाऊस पडतो मात्र यंदा पाणीसाठा कमीच आहे. उत्तर प्रदेशातील जलाशयांमध्ये सरासरीच्या ४८ टक्के तर पंजाबमध्ये १६ टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे. 

मध्य प्रदेशात अधिक १५ टक्के साठा
मध्य प्रदेश देशातील एक महत्त्वाचे खरीप पिके उत्पादक राज्य आहे. मध्य प्रदेशात सध्या जलाशयातील पाणीसाठा सरासरीच्या १५ टक्के अधिक आहे. तसेच येणाऱ्या काही दिवसांत येथे पाऊस पुन्हा सुरू झाल्यास पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. देशात जून आणि सप्टेंबर महिन्यात ३२६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या ४ टक्के कमी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com