शेतकऱ्यांना ३३० कोटींचा फटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

पुणे - शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू असताना बाजारात मात्र शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. खानदेशात आतापर्यंत मूग आणि उडदाची ७० ते ८० टक्के, मराठवाड्यात ५० टक्के तर वऱ्हाडातील बुलडाणा, वाशीम आणि अकोला जिल्ह्यांत ४० टक्क्यांपर्यंत विक्री केली आहे. या तीनही विभागांतील शेतकऱ्यांना बाजारात मूग आणि उडीद विक्रीतून ३३० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

पुणे - शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू असताना बाजारात मात्र शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. खानदेशात आतापर्यंत मूग आणि उडदाची ७० ते ८० टक्के, मराठवाड्यात ५० टक्के तर वऱ्हाडातील बुलडाणा, वाशीम आणि अकोला जिल्ह्यांत ४० टक्क्यांपर्यंत विक्री केली आहे. या तीनही विभागांतील शेतकऱ्यांना बाजारात मूग आणि उडीद विक्रीतून ३३० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

केंद्र सरकारने यंदा मुगाला ६९७५ रुपये प्रतिक्विंटल तर उडदाला प्रतिक्विंटल ५६०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. सप्टेंबर महिन्याचा मध्यापासूनच राज्यात अनेक ठिकाणी मूग काढणी सुरू झाली आणि बाजारात आवक होऊ लागली. त्यापाठोपाठ उडीदही बाजारात दाखल झाला. शासनाने हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी सुरू केली. परंतु अद्यापही खरेदी सुरू झाली नाही.

अद्यापही त्याबाबत स्पष्टता नाही. नेहमीचीच आर्थिक चणचण आणि रब्बीत काही साधले नाही म्हणून पाऊस पडताच रब्बीसाठी तडजोड करावी आणि दसऱ्याच्या मुहुर्तावरील देणीघेणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी मूग, उडीद मिळेल त्या भावात विकण्यास सुरवात केली. खानदेशात आतापर्यंत मूग आणि उडदाची ७० ते ८० टक्के मराठवाड्यात ५० टक्के तर वऱ्हाडातील बुलडाणा, वाशिम आणि अकोला जिल्ह्यांत ४० टक्क्यांपर्यंत विक्री केली आहे. मात्र बाजारात दोन्ही धान्यांना अनेक ठिकाणी हमीभावाच्या निम्मे दर मिळत आहेत. त्यातून शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.

खानदेशात ८० टक्के विक्री 
खानदेशात जवळपास ७५ ते ८० टक्के मूग आणि उडदाची विक्री खासगी बाजार, बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना यात सुमारे २५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. खानदेशात धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यांत मुगाची ५५ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. या तीनही जिल्ह्यांत धुळे एकरी ९० किलो ते एक क्विंटल उत्पादन मिळाले. अर्थातच खानदेशात मुगाचे एकूण एक लाख १८ हजार क्विंटलपर्यंत मुगाचे उत्पादन आले, असे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. यातील ८० टक्के मुगाची विक्री झाल्याची माहिती बाजार समित्यांमधील सूत्रांनी दिली आहे. मुगाला हमीभाव कुठल्याही बाजार समितीत मिळाला नाही. सरासरी ३८०० रुपये प्रतिक्विंटल या दरात विक्री झाली. ३५ कोटींची उलाढाल त्यातून झाली.

हमीभावापेक्षा क्विंटलमागे तीन हजार रुपये कमी मिळाले. सुमारे २३ कोटींचे नुकसान शेतकऱ्यांना मूग विक्रीसंबंधी खानदेशात सहन करावे लागले. उडदाची खानदेशात ५० हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. उडदाचे एकरी दोन क्विंटल उत्पादन आल्याचे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. खानदेशात एकूण एक लाख ९० हजार क्विंटलपर्यंतचे उत्पादन आले असून, यातील सुमारे ७५ टक्के उडदाची विक्री बाजारांमध्ये झाली आहे. उडदालाही प्रतिक्विंटल सरासरी चार हजार रुपये दर मिळाला. उडदाला ५६०० रुपये हमीभाव असून, क्विंटलमागे १६०० रुपये कमी मिळाले. ३५ कोटीपर्यंत नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे.

वऱ्हाडात मूग विक्रीत ३३ कोटी, तर उडीद विक्रीत १८ कोटींचा फटका
वऱ्हाडातील बुलडाणा, अकोला आणि वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये मुगाची सुमारे ६० हजार तर उडदाची सुमारे ५८ हजार हेक्‍टरवर लागवड झाली होती. मुगाची सरासरी हेक्‍टरी उत्पादकता ५ क्विंटल गृहीत धरली तर वऱ्हाडात ३ लाख क्विंटल आणि उडदाचे हेक्‍टरी चार क्विंटल उत्पादन गृहीत धरता सुमारे अडीच लाख क्विंटलपर्यंत उत्पादन झाले. सप्टेंबरच्या मध्यापासून मुगाची व त्यानंतर काहीच दिवसांनी उडदाची बाजारपेठांमध्ये आवक सुरू झाली. या तीनही जिल्ह्यांत ४० टक्के मूग आणि उडदाची आतापर्यंत विक्री झाल्याची माहिती बाजारातील सूत्रांनी दिली. म्हणजेच मुगाची आतापर्यंत एक लाख २० हजार क्विंटल आणि उडदाची एक लाख क्विंटल विक्री झाली आहे. या काळात मुगाला किमान ४२०० रुपयांपासून दर भेटला. अपवाद वगळता शेतकऱ्यांना पाच हजारांपेक्षा अधिक दर मिळाला नाही. म्हणजेच किमान दर विचार घेता मूग विक्रीतून शेतकऱ्यांना ३३ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. उडदाला वऱ्हाडातील बाजारामध्ये किमान ३८०० रुपयांपासून दर मिळाला. काही वेळा ४१०० रुपये दर मिळाला मात्र तो मोजक्याच ठिकाणी मिळाला. एकूण अडीच लाख क्विंटल उत्पादनापैकी ४० टक्के म्हणजेच एक लाख क्विंटल विक्री आतापर्यंत झाली आहे. किमान दर ३८०० रुपये विचारात घेता. शेतकऱ्यांना क्विंटलमागे १८०० रुपये दर मिळाला. एकूण विक्रीचा आकडा विचारात घेता शेतकऱ्यांना १८ कोटींचा फटका बसला आहे. 

मराठवाड्यात २२१ कोटींचा फटका
मराठवाड्यात मुगाची १ लाख ६५ हजार हेक्‍टरवर तर उडिदाची १ लाख ५४ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. मराठवाड्यात यंदा मराठवाड्यात मुगाचे हेक्‍टरी ४ क्‍विंटल उत्पादन आले. उडिदाचे हेक्‍टरी उत्पादन ४ क्‍विंटल २१ किलो आहे. त्या आधारे मराठवाड्यात यंदा मुगाचे सहा लाख ६० हजार क्विंटल उत्पादन झाल्याचा अंदाज आहे. तर उडादाची हेक्टर उत्पादकता आणि पेरणी विचारात घेता जवळपास सहा लाख ४८ हजार क्विंटल उत्पादनाचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, जालना, उस्मानबाद आणि बीड या मोठ्या बाजार समित्या आहेत. या बाजारसमित्यांमध्ये आतापर्यंत ५० टक्के मुग आणि उडदाची विक्री झाली आहे. या बाजार समित्यांमध्ये मुगाला सरासरी ३००० हजारांपासून ६००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाला. मुगाचा किमान विक्री दर विचारात घेता उत्पादकांना १३१ कोटींचा फटका बसला आहे. मराठवाड्यातील बाजार समित्यांमध्ये उडदाला २८०० रुपये ते ४२०० रुपये दर मिळाला. उडदाचा किमान दर विचारात घेता उडीद उत्पादकांना जवळपास ९० कोटींचा फटका बसला आहे. 

यंदा चार एकरांवर मुगाची पेरणी केली होती. ११ क्विंटल उत्पादन मिळाले. बोरी येथील बाजार समितीत क्विंटलला ३१०० रुपये भाव मिळाला. खरेदी आधी व्यापाऱ्याने संमतिपत्र भरून घेतले.
- बाजीराव शेवाळे, शेतकरी, गणपूर, ता. जिंतूर, जि. परभणी. 

मूग, उडदाचे पीक बऱ्याच शेतकऱ्यांनी विकून झाले आहे. आता केंद्र उघडून कोणाला फायदा होईल हे सांगता येत नाही. खरेदीसाठी शासनाकडे पुरेशी यंत्रणा नाही, घोळ होत असतात हे मागील काही वर्षांत दिसून आलेले आहे. शासनाने या खरेदीच्या भानगडीत न पडता थेट भावांतर योजना लागू करावी. ऑनलाइन नोंदणी करा, माल विक्रीला आणा, पैशांसाठी महिनोमहिने प्रतीक्षा करा, अशा प्रकारचे त्रास शासनाने शेतकऱ्यांना देऊ नये. 
- डॉ. प्रकाश मानकर, चेअरमन, भारत कृषक समाज, महाराष्ट्र

   मूग, उडदाची बाजारात कमी दराने खरेदी
   मराठवाडा, खानदेश, वऱ्हाडातील स्थिती
   ५० टक्क्यांहून अधिक धान्याची विक्री

मूग, उडीद विक्रीतील ठळक बाबी
   कोणत्याच बाजारात हमीभाव मिळाला नाही
   खानदेशात ८० टक्के माल शेतकऱ्यांनी विकला
   अनेक ठिकाणी मुगाला ३००० रुपयांपासून दर
   उडदाला मराठवाड्यात २८०० रुपयांपासून दर
   मूग विक्रीत शेतकऱ्यांना १८७ कोटींचा फटका
   उडीद विक्रीत १४३ कोटींचा फटका

मी ३० क्विंटल उडीद ४००० रुपये दरात विकला, कारण देणे द्यायचे होते. अजून शासकीय खरेदीचा पत्ता नाही. अनेक शेतकऱ्यांनी उडदाची विक्री केली. आता माझ्या गावात उडीद अपवाद वगळता कुणाकडेही नाही. शासनाला फारसा उडीद खरेदी करावा लागणार नाही. पण आमचे नुकसान झाले, त्याचे काय?
- रवींद्र महाजन, शेतकरी, आसोदे, ता. जि.  जळगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 330 Crore Loss to Farmer