फ्लोरीकल्चर पार्कमधून ४० लाख फुलांची निर्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

पुणे - ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त तळेगाव (दाभाडे) येथील फ्लोरीकल्चर पार्कमधून सुमारे ४० लाख लाल गुलाब जगाच्या विविध भागांमध्ये निर्यात झाले आहेत, तर देशांतर्गत विविध राज्यांमध्येदेखील तितकी सुमारे ४० लाख फुले पाठविण्यात आल्याची माहिती तळेगाव फ्लोरीकल्चर ग्रोअर्स असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. एस. जम्मा यांनी दिली. मात्र, थंडीच्या कडाक्यामुळे  यंदा फुलांचे उत्पादन २५ टक्क्यांपर्यंत घटल्याचेही मत त्यांनी नोंदवले.  

पुणे - ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त तळेगाव (दाभाडे) येथील फ्लोरीकल्चर पार्कमधून सुमारे ४० लाख लाल गुलाब जगाच्या विविध भागांमध्ये निर्यात झाले आहेत, तर देशांतर्गत विविध राज्यांमध्येदेखील तितकी सुमारे ४० लाख फुले पाठविण्यात आल्याची माहिती तळेगाव फ्लोरीकल्चर ग्रोअर्स असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. एस. जम्मा यांनी दिली. मात्र, थंडीच्या कडाक्यामुळे  यंदा फुलांचे उत्पादन २५ टक्क्यांपर्यंत घटल्याचेही मत त्यांनी नोंदवले.  

गुलाबांची लागवड आणि निर्यातीसाठी महाराष्ट्रामध्ये पुणे व त्यातही मावळ तालुका ओळखला जातो. तळेगाव फ्लोरीकल्चर पार्कमधून दरवर्षी लाखो फुलांची निर्यात विविध देशांमध्ये होते. या वर्षीही २६ जानेवारीपासून निर्यातीला प्रारंभ झाल्याचे जम्मा यांनी सांगितले. साधारण १५ दिवस निर्यात सुरू राहून, ९ फेब्रुवारी रोजी शेवटची निर्यात झाली. दरवर्षी युरोपातील विविध देशांसह आखाती देश आणि लंडनमध्येही निर्यात होते. शेतकऱ्यांना निर्यातक्षम फुलांना दर्जा व दांडीच्या लांबीनुसार ७ ते १३ रुपये दर मिळतो, असेही जम्मा यांनी सांगितले.  

ही निर्यातीचे लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर देशांतर्गत बाजारपेठेत फुले पाठवली जातात. यामध्ये प्रामुख्याने दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, आसाम अशा राज्यांमध्ये फुले पाठवली जात आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत फुलांच्या लांबीनुसार ७ ते १० रुपये दर मिळत असल्याचेही जम्मा म्हणाले.

प्लॅस्टिकच्या फुलांचे आव्हान 
व्हॅलेंटाइन डेनिमित्त होणाऱ्या लाल गुलाबांच्या निर्यातीवरच आम्हा फूल उत्पादकांची खरी मदार असते. कारण वर्षभरामध्ये सण, उत्सव आणि लग्न हंगाम या काळात सजावटीच्या दृष्टीने विविध रंगी फुलांना मागणी असते. मात्र, सध्या लग्नाचे ठेके हे इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांकडे देण्याचा कल वाढला आहे. या कंपन्या चिनी बनावटीची हुबेहूब दिसणाऱ्या गुलाबाच्या फुलांचा सजावटीसाठी वापर करतात. परिणामी नैसर्गिक गुलाब फुलांची मागणी सुमारे ३० टक्क्यांनी घटली आहे. याचा फटका पॉलिहाउसधारक शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे प्लॅस्टिकच्या फुलांवर बंदी घालावी, अशी मागणी संघटनेमार्फत सातत्याने करत आहोत, असे जम्मा यांनी सांगितले.

थंडीच्या कडाक्यामुळे उत्पादनात घट
यंदा थंडीच्या दिवसांमध्ये वाढ झाल्याने झाडांचा प्रतिसाद मंदावला. परिणामी कळ्या उमलण्याच्या प्रमाणात घट होऊन उत्पादनात सरासरी २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट झाली. माझे स्वतःचे साडेआठ एकर पॉलिहाउस असून, लाल गुलाबांचे यंदाचे निर्यातीचे उद्दिष्ट ३ लाख ५० हजार फुलांचे होते. मात्र, केवळ १ लाख ७० हजार फुले निर्यात झाली. तर स्थानिक (देशांतर्गत) बाजारपेठेत ५० हजार फुले विक्रीसाठी पाठविली, असे जम्मा यांनी सांगितले.

माझे तळेगाव फ्लोरीकल्चर पार्कमध्ये साडेतीन एकर पॉलिहाउस आहे. त्यापैकी दीड एकरमध्ये लाल गुलाबजाती आहेत. या वर्षी  ५५ हजार फुलांची निर्यात झाली असून, तेवढीच फुले देशांतर्गत बाजारपेठेत पाठवली आहेत. यंदाचा दर ६२ ते ४२ सें.मी. लांबीसाठी १२ रुपये ते साडेसहा रुपये असा मिळाला. यंदा वाढलेल्या थंडीमुळे उत्पादनात ३० ते ४० टक्के इतकी घट झाली. देशांतर्गत बाजारपेठेत मागणीच्या तुलनेमध्ये फुले कमी पडण्याची शक्यता दिसते. स्थानिक बाजारपेठेत किरकोळ विक्रीसाठी फुलांचा दर २५ ते ३० रुपयांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
- मल्हारराव ढोले, सचिव, तळेगाव फ्लोरीकल्चर ग्रोअर्स असोसिएशन. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 40 lakh flowers exported from Floriculture Park