विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन  असलेली २३ एकरांतील केळी

विनोद इंगोले
मंगळवार, 21 मे 2019

वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न पवनार (जि. वर्धा) येथील कुंदन वाघमारे यांनी केला आहे. शासकीय नोकरी सोडून २३ एकरांत आधुनिक तंत्रज्ञान व जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून उतिसंवर्धित केळीची शेती ते करताहेत. प्रतिघड चांगली उत्पादकता मिळवण्याबरोबर केळीची गुणवत्ताही अत्यंत चांगली जोपासली आहे. विदर्भात फेब्रुवारी हंगामात व २३ एकरांत केळीचा प्रयोग करणारे वाघमारे बहुधा एकमेव शेतकरी असावेत.

कधीकाळचे केळीचे हब
वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुका कधी काळी केळीचे हब म्हणून नावारूपास होता. पवनार तालुक्‍यात सुमारे ३० वर्षांपूर्वी केळीची लागवड व्हायची असे येथील कुंदन वाघमारे सांगतात. दररोज सरासरी ३५ ते ४० ट्रक येथून ‘लोड’ व्हायचे, अशी माहिती ३५ वर्षांपासून केळी व्यापारात असलेल्या सेलू येथील सुदेश सांगोळकर यांनी दिली. नंतरच्या काळात पाणी, वीज उपलब्धतेच्या अभावी केळीखालील क्षेत्र झपाट्याने कमी झाले.    

कुंदन यांचा केळी प्रयोग 
पवनार येथील कुंदन वाघमारे यांनी शेतीच्या ओढीने साडेचार वर्षांपूर्वी ग्रामसेवक पदावरून ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. वडिलोपार्जित १३ एकर शेती विकून पवनार शिवारात २७ एकर शेती खरेदी केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर कापसाची एकरी २० ते २५ क्‍विंटल उत्पादकता मिळविण्याचा विचार होता. त्यासाठी पहिल्या टप्प्यात संपूर्ण २७ एकर शिवार ठिबकखाली आणले. काही दिवसांतच जागतिक दर्जाचे केळीतज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांची शेताला भेट झाली. त्यांनी कपाशीऐवजी केळी घेण्याचा सल्ला दिला. अधिक चर्चा, अभ्यास, बाजारपेठ शोध यातून कुंदन यांनीही केळीचा प्रयोग करण्याचे निश्‍चित केले.    

केळी व्यवस्थापनातील बाबी 
  लागवड - ६ बाय ५ फूट अंतरावर
  विदर्भात किंवा अन्य ठिकाणी शक्यतो फेब्रुवारीत केळी लागवडीकडे कल नसतो. मात्र या हंगामातील केळींना दर चांगला मिळतो. त्यासाठी कुंदन यांनी या हंगामातील प्रयोग केला. त्याचा दुसरा खोडवा सध्या उभा आहे. ऑक्‍टोबर महिन्यात तो कापणीस येईल असे नियोजन आहे. 
  तज्ज्ञ के. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनातून फर्टिगेशन शेड्यूलचा वापर 
  प्रतिघड ९ फण्या ठेवण्यास सांगितल्या. मात्र त्या १० पर्यंत आहेत. 
  शेणखताचा वापर एकरी पाच ट्रक. तीन वर्षांपर्यंत तो उपयोगी ठरेल.
  केळी झाडांत पॉलिमल्चिंग. त्यामुळे निंदणी, आंतरमशागत खर्च वाचला. 
  फेब्रुवारीतील लागवडीत प्रत्येक केळीच्या दोन रांगांच्या बाजूंना बोरूच्या झाडांची लागवड. त्यामुळे तापमानाची तीव्रता कमी झाली.

  जीवामृत देण्यात सातत्य. त्यातून रासायनिक खतांवरील खर्च कमी होण्यासोबतच केळीचा दर्जा सुधारतो. उत्पादकताही वाढीस लागते असा अनुभव. ठिबक व्हेन्चुरीच्या माध्यमातून त्याचा रविवार आणि गुरुवार असा वापर. त्यासाठी १२ बाय १० बाय १२ फूट खोली आकाराचा सिमेंट टॅंक. त्यासाठी एक लाख रुपये खर्च आला. शेण, गूळ, बेसन, गोमूत्र, वडाखालची माती, काही प्रमाणात गांडूळखत यांचा वापर जीवामृत निर्मितासाठी.

  जीवामृत देताना कमी खर्चातील वस्त्र व गाळणी यांचा वापर. त्यामुळे ठिबकमध्ये चोक अप होत नाही. 
  सेन्ट्रलाईज्ड व्हॉल्व्ह सिस्टिमचा वापर. आहे. शेतापासून काही अंतरावरून वाहणाऱ्या धाम नदीच्या काठावर विहीर. त्यामुळे मुबलक पाणी.   
  सेलू येथील व्यापारी जागेवर माल खरेदी करतात. गुणवत्ता चांगली असल्याने दरही चांगला मिळत असल्याचे कुंदन सांगतात. काही वेळा तो घसरतोही. 

रायपनिंग चेंबरची वाढली संख्या
सेलू येथील एकाच व्यापाऱ्याला केळी विकण्यावर भर राहिला आहे. केळीची खरेदी करणाऱ्या सुदेश यांनी नऊ वर्षांपूर्वी सेलू येथे रायपनिंग चेंबर उभारले. त्या वेळी या भागात केळी लागवड जेमतेम होती. आजच्या घडीला अडीच लाख रोपांची मागणी जिल्ह्याची आहे. सुमारे १५० एकरांत लागवड होते. सोबतच रायपनिंग चेंबरच्या संख्येतही वाढ होत ती सातवर पोचली आहे. त्यावरून पुन्हा केळीकडे या भागातील शेतकरी वळू लागल्याचे सिद्ध होत आहे. कृषी सहायक प्रशांत भोयर यांचेही मार्गदर्शन केळी व्यवस्थापनात मिळते. कुंदन यांनी चार एकरांवर जळगाव येथील कंपनीच्या मार्गदर्शनातून ब्राझील येथील मोसंबीच्या जातीचाही प्रयोग अलीकडेच सुरू केला आहे.  
 कुंदन वाघमारे, ९९२२७०४४८५


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agricultural stories marathi kundan waghmare banana