किमतीच्या अभ्यासानुसार विक्रीचे नियोजन महत्त्वाचे

डॉ. अरुण प्र. कुलकर्णी
सोमवार, 30 जुलै 2018

ज्या किमतीला मागणी व पुरवठा समान होतो, ती किंमत उत्पादकाला मिळते आणि ग्राहकाला द्यावी लागते. हे झाले पुस्तकातील विधान. प्रत्यक्ष मागणी आणि पुरवठा किती आहे, हे कोणालाच माहिती नसते; त्याविषयी फक्त अंदाज असतात. हे अंदाज जसे बदलतात, तशा किमती वर-खाली होतात. त्याचा अभ्यास सध्याच्या काळात महत्त्वाचा आहे.

ज्या किमतीला मागणी व पुरवठा समान होतो, ती किंमत उत्पादकाला मिळते आणि ग्राहकाला द्यावी लागते. हे झाले पुस्तकातील विधान. प्रत्यक्ष मागणी आणि पुरवठा किती आहे, हे कोणालाच माहिती नसते; त्याविषयी फक्त अंदाज असतात. हे अंदाज जसे बदलतात, तशा किमती वर-खाली होतात. त्याचा अभ्यास सध्याच्या काळात महत्त्वाचा आहे.

महाराष्ट्रात या वर्षी बहुतेक ठिकाणी समाधानकारक पाऊस होत आहे; देशातही मॉन्सून सरासरीइतका असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे पीक उत्पादनाला फायदा मिळेल, असा अंदाज आहे. आता येत्या काळात शेतमालाला चांगला भाव कसा मिळेल, याचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. अर्थशास्त्रीय नियमानुसार बाजारातील किंमत मागणी आणि पुरवठा यावर ठरते. ज्या किमतीला मागणी आणि पुरवठा समान होतो, ती किंमत उत्पादकाला मिळते आणि ग्राहकाला द्यावी लागते. हे झाले पुस्तकातील विधान. प्रत्यक्ष मागणी व पुरवठा किती आहे, हे कोणालाच माहीत नसते; त्याविषयी फक्त अंदाज असतात. हे अंदाज जसे बदलतात, तशा किमती वर-खाली होतात. 

शेतकऱ्यांना दोन कालावधींसाठी किमतींचा अंदाज करावा लागतो. एक म्हणजे कापणीनंतर लगेच आपणास किती किमत मिळेल आणि दुसरा अंदाज म्हणजे  कापणीनंतर काही महिन्यांनी आपण शेतमाल विकला, तर किती किंमत मिळेल याचा.  आपण कोणते पीक किती क्षेत्रावर घ्यावयाचे. त्यानंतर त्या पिकावर किती खर्च करावयाचा, वर्षाचा जमा-खर्च कसा सांभाळायचा, हे बघण्यासाठी पहिला अंदाज उपयोगी ठरतो. दुसरा अंदाज आलेल्या पिकापासून आपले उत्पन्न कसे वाढवता येईल, यासाठी उपयुक्त ठरतो. खरीप पिकासाठी पहिला अंदाज  शेतकरी मे-जूनपासून करावयास लागतात. या वेळी कोणालाच पाऊस किती पडेल, देशातील पुढील वर्षात उत्पादन किती होईल किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी असेल, याची माहिती नसते. अशा वेळी शेतकरी गेल्या वर्षी आपणास काय दर मिळाला, त्यानंतर भावात किती बदल झाला, एकूण बाजारात भावाची काय चर्चा आहे, हे विचारात घेऊन आपल्यापुरता एक अंदाज करतो. पुष्कळ वेळा हा अंदाज तो मनात ठेवतो. त्यानंतर हळूहळू पावसाचे एकूण चित्र लक्षात येते, शासनाचे हमी भाव जाहीर होतात आणि त्याचे अंदाज तो बदलत जातो.

काही वेळा पीक काढण्याअगोदरच  व्यापारी शेतकऱ्यांशी बोलणी करू लागतात. त्यांनी पुढे केलेले भाव स्वीकारायचे की नाही, या विषयी तो द्विधा अवस्थेत असतो. जर, ते स्वीकारले आणि नंतर भाव वाढले, तर  होणाऱ्या नुकसानीची त्याला भीती वाटते.  बरेच शेतकरी त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याची वाट पाहतात. बाजारातील किमती अपेक्षेपेक्षा कमी असतील व हमी भाव अधिक असतील, तर शासनाकडे धाव घेतात, खरेदी केंद्रे उघडण्याची मागणी करतात. मग त्यांच्या लक्षात येते, की शासन ‘सर्व साधारण प्रतीच्या’ शेतमालाचीच उचल करण्यासाठी बांधिल आहे. त्यासाठी थांबणे आले, शेतमाल स्वच्छ करणे आले. थोडक्यात, किमतींचे व विक्रीचे नियोजन आपण नीट करीत नाही. त्यामुळे आपला आयत्या वेळी गोंधळ होतो.  

किमतींचा अभ्यास महत्त्वाचा 
पीक घेण्यापूर्वी आपण पिकांच्या किमतींचा अभ्यास करावा. मुख्यत्वे हा अभ्यास दोन गोष्टींसाठी करावा लागतो. एक म्हणजे किमतींतील गेल्या पाच ते सात वर्षांतील कल. हा कल वाढता आहे का? दर वर्षी तो किती टक्क्यांनी वाढतोय? सर्व साधारण किमती जर सहा टक्क्यांनी वाढत असतील, तर आपल्या शेतमालाच्या किमती यापेक्षा जास्त दराने वाढावयास हव्यात. ज्या शेतमालाचा कल जास्त असेल, त्याची लागवड वाढविणे गरजेचे आहे.  

आपण किमतींतील चढ-उतारांचा अभ्यास करावा. यासाठी गेल्या पाच-सात वर्षांतील मासिक किंवा साप्ताहिक किमती विचारात घेऊन त्यातील चढ-उतार मोजावेत. ज्या शेतमालात चढ-उतार जास्त त्यात जोखीम अधिक. असे पीक लागवडीखाली आणताना थोडी काळजी घ्यावी. सर्वच क्षेत्र अशा पिकांच्या लागवडीखाली आणणे टाळावे, अशा अभ्यासाच्या मदतीने आपण पुढील काही महिन्यांच्या किमतींचे अंदाज अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार करू शकतो.

अर्थशास्त्र व संख्याशास्त्र यांच्या मदतीने काही तंत्रे यासंबंधी विकसित केली गेली आहेत. ही तंत्रे वापरून व तज्ज्ञांची मते घेऊन असा अभ्यास आणि किमतींचे अंदाज करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत भारतीय कृषी विपणन माहिती व विश्लेषण केंद्राची( CIAMI ) पुण्यात सुरवात झाली आहे. हे केंद्र एप्रिल २०१६ मध्ये स्थापन झाले. जून २०१६ पासून ते नियमितपणे मासिक किमतींचा अहवाल व किमतींचा पुढील काही महिन्यांसाठी अंदाज प्रसिद्ध करीत आहे. सध्या हे केंद्र सोयाबीन, मका, कापूस, तूर, हरभरा, कांदा व टोमॅटो या पिकांसाठी अशी माहिती पुरवीत आहे. पुढील कालावधीत अधिक पिकांचा यात समावेश होईल. (अधिक माहितीसाठी  http://macp.gov.in संकेतस्थळ पाहावे )

शेतमालाची प्रतवारी महत्त्वाची 
जेव्हा बाजारात आपला शेतमाल आणायचा तेव्हा तो प्रतवारी करून आणि स्वच्छ करूनच आणावा. फ्युचर्स व्यवहारात किंवा शासनाच्या खरेदी केंद्रांवर मालाची जर डिलिव्हरी द्यावयाची असेल, तर हे अनिवार्य आहे. त्यासाठी शेतावर किंवा गावात अशी व्यवस्था करावी. लिलावातसुद्धा प्रतवारी केलेल्या शेतमालाला अधिक किमत मिळते; वाहतुकीतील खर्च वाचतो. शेतमालाच्या प्रतवारीनंतर राहिलेल्या घटकांची विल्हेवाट अधिक चांगल्या प्रकारे करता येते. 

शक्य असेल, तर जवळच्या शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद बनावे. सर्वांनी मिळून आपला शेतमाल प्रतवारीनुसार एकत्र करावा. त्याची विक्री कंपनीच्या (किंवा इतर) संकेतस्थळाच्या मदतीने करावी. यामुळे सर्वाधिक खरेदीदारांना मालाची माहिती मिळते. अधिक भाव मिळण्याची शक्यता असते. पिकाची काढणी करावयाच्या अगोदरसुद्धा अशी विक्री करता येते. नवीन इ-नाम  लिलावातही अशा तऱ्हेने शेतमाल विकता येईल.

आंतरराष्ट्रीय पातळीवर किमतींचा परिणाम 
शेतमालांच्या किमतीमधील वाढते चढउतार हा आंतरराष्ट्रीय काळजीचा विषय झाला आहे. जागतिक अन्न व कृषी संघटनेने याबाबत पुढाकार घेऊन, प्रमुख राष्ट्रांच्या (त्यात भारताचा समावेश आहे) मदतीने कृषी व्यापार माहिती पद्धती ( AMIS)   हे केंद्र रोममध्ये स्थापन केले आहे.  यामध्ये गहू, मका, भात व सोयाबीन या पिकांची सद्य:स्थिती व अंदाज मासिक पत्रकाद्वारे (AMIS Market Monitor) प्रसिद्ध केले जातात. शेतकऱ्यांनी ते आवर्जून नियमितपणे अभ्यासावेत.  (http://www.amis-outlook.org/).  

अमेरिकेतीतील कृषी खात्यातर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवर माहिती साधारणतः प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आसपास प्रसिद्ध केली जाते. त्याचा अभ्यास करावा. (https://www.usda.gov/media/agency-reports).

काही शेतमालाचे फ्युचर्स व्यवहार एनसीडीइएक्स आणि एमसीएक्समध्ये चालू आहेत. दररोज या शेतमालांच्या फ्युचर्स किमतींची माहिती तपासावी. हे एक प्रकारे भविष्यातील किमतींचे अंदाजच असतात. जर, फ्युचर्स किमती आपणास योग्य वाटल्या, तर आज किमत ठरवून डिलिव्हरी भविष्यात देण्याचे करार करण्यासाठी या भावांचा आपण उपयोग करू शकतो.  त्याशिवाय, आपण या किमती आपल्या शेतमालाला भविष्यात मिळाव्यात म्हणून हेजिंगदेखील करू शकतो. यामुळे किमतीमधील चढउतारापासून आपण स्वतःस वाचवू शकतो. 

उदाहरणार्थ, आपणास आपले सोयाबीन डिसेंबर २०१८ मध्ये विकायचे आहे.  १२ जुलै, २०१८ रोजी सोयाबीनचा डिसेंबर फ्युचर्स प्रतिक्विंटल भाव ३,४०० रुपये होता.  याचा अर्थ व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार डिसेंबरमध्ये  ३,४०० रुपये हा भाव असेल. शासनाचा हमी भाव ३,३९९ रुपये आहे. यामुळे सध्या आपण काही केले नाही तरी चालेल. पण, जर काही दिवसांनी हाच फ्युचर्स भाव ३,८०० रुपये  झाला आणि आपणास, कमिशन वजा जाता, तो योग्य वाटला, तर आपण सोयाबीन  लगेच या भावाने फ्युचर्समध्ये विकून हेजिंग करू शकतो. त्यामुळे डिसेंबरमध्ये बाजारातील भाव काहीही असला, तरी आपणास मात्र भाव  ३,८०० रुपये (उणे कमिशन) मिळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agriculture goods plantation