पावसाच्या अवकृपेमुळे हातची पिकं गेली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

लातूर - गेल्या पावसाळ्यात जून महिन्याच्या सुरवातीला तीन दिवस व त्यानंतर ऑगस्टमध्ये मध्यात काही भागांत थोडाबहूत पडलेला पाऊस वगळता लातूर जिल्ह्यावर पावसाने अवकृपाच केली. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. हातचा गेलेला रब्बी, आटलेले पाण्याचे स्रोत याआधी रेल्वेने पाणी आणावे लागणाऱ्या लातूर जिल्ह्याची त्याच दिशेने वाटचाल सुरू असल्याचे सूचित करते आहे. मे अखेरीस पाण्यासाठी भटकंती वाढत चालली असून पाऊस लांबल्यास लातूर जिल्ह्यातही दुष्काळाची दाहकता वाढण्याची चिन्हं आहे. केवळ ग्रामीण भागच नव्हे तर जिल्ह्यातील बहुतांश शहरांमध्येही पाणीटंचाईचे संकट भीषण बनल्याचं चित्र आहे.

लातूर - गेल्या पावसाळ्यात जून महिन्याच्या सुरवातीला तीन दिवस व त्यानंतर ऑगस्टमध्ये मध्यात काही भागांत थोडाबहूत पडलेला पाऊस वगळता लातूर जिल्ह्यावर पावसाने अवकृपाच केली. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. हातचा गेलेला रब्बी, आटलेले पाण्याचे स्रोत याआधी रेल्वेने पाणी आणावे लागणाऱ्या लातूर जिल्ह्याची त्याच दिशेने वाटचाल सुरू असल्याचे सूचित करते आहे. मे अखेरीस पाण्यासाठी भटकंती वाढत चालली असून पाऊस लांबल्यास लातूर जिल्ह्यातही दुष्काळाची दाहकता वाढण्याची चिन्हं आहे. केवळ ग्रामीण भागच नव्हे तर जिल्ह्यातील बहुतांश शहरांमध्येही पाणीटंचाईचे संकट भीषण बनल्याचं चित्र आहे.

पाण्याअभावी पपई तोडली
औसा तालुक्‍यातील शिवणी बु. येथील वामन जाधव यांनी पपईची सहाशे झाडं लावली होती. त्यांच्या शेतापासून काही अंतरावर चार नद्यांचा संगम. पण निम्म्यातच पाणी गेल्यानं त्यांची पपईची बाग संपली. फळं खराब व्हायला लागल्यानं त्यांनी ती काढली. जाधव म्हणाले, की गेल्या खरिपात काहीच हाती लागलं नाही. निम्यातच पाऊस गेला. थोडा ऊस व्हता तो कारखान्याला घातला त्याचे बी पैसे अजून याचे हायेत. पपईवर ५० ते ६० हजारांचा खर्च झाला. त्यातून केवळ अडीच हजारांचा हप्ता मिळाला. अन्‌ पपई पाण्याअभावी तोडून टाकण्याची वेळ आली.

चार नद्यांचा संगम कोरडाठाक
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्‍यातील शिवणी बु. हे उटवळी, बुरूळ, मांजरा व तावरजा या चार नद्यांच्या संगमाचे ठिकाण. नद्यांना पूर आला की औसा, निलगाव व लातूर तालुक्‍यांतील नद्यांच्या परिसरात दहा किलोमीटरपर्यंत पाणी नदीपात्रात सारलं जात. त्यामुळं शाश्वत पाण्याचा पट्‌टा म्हणून या चारही नद्यांच्या संगमाच्या परिसराची लातूर जिल्ह्यात ओळख. पण गत वर्षभरात ना या नद्या वाहिल्या ना भूजलात वाढ झाली. त्यामुळे परिसरातील शेकडो एकर जमीन काळीच राहिली. त्यावर रब्बीची पेरणी करताच आली नाही. शिवाय याच परिसरातील जनतेला सध्या तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून मिळेल तिथून पाणी आणण्याशिवाय येथील ग्रामस्थांना पर्याय नाही. पिण्याच्या पाण्यासाठी या परिसरात टॅंकरची सोय प्रशासनाने केली नसल्याची माहिती शेतकरी व ग्रामस्थांनी दिली.

मूर्तीव्यवसायावर संकट गडद
औसा तालुक्‍यातील लोदगा येथील मूर्तीकलेचा व्यवसाय माती व पाण्यावर अवलंबून आहे. मात्र या व्यवसायावर यंदा पुन्हा एकदा संकटाचे ढग गडद झाले आहेत. गेल्या पावसाळ्यात पाऊसच न झाल्याने मोठ्या मूर्तींची उचल झाली नाही. ज्यांनी गणेशोत्सव काळात मोठ्या गणपती मूर्तींची खरेदी केली त्यांना त्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पाणीच उपलब्ध झाले नाही. त्यामुळे यंदा पाऊस झाला नाही तर पुन्हा एकदा या उद्योगातील गुंतवणूक आर्थिक संकटात आणणारी ठरेल, अशी शक्‍यता मूर्तिकार किरण कुंभार यांनी व्यक्‍त केली. पाणीच नसल्याने मूर्ती व घरात लागणाऱ्या मातीच्या साहित्याच्या उद्योगाला जवळपास ३० ते ४० टक्‍के फटका बसल्याचे किरण कुंभार यांनी सांगितले.

शेतात पाणी घुसण्याचा धोका
लातूर ते जाहिराबाद रस्त्याचे काम सद्यःस्थितीत सुरू आहे. औसा, निलंगा तालुक्‍यातून जाणाऱ्या या रस्त्याच्या कामात सर्व्हिस नाली अजून तयार झाली नसल्याने पावसाळा सुरू झाला की रस्त्यावरून वाहणारे पाणी शेतात घुसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्‍त केली आहे. आधीच रस्त्यात जमीन अधिग्रहण व त्याच्या मोबदल्यावरून न्यायासाठी लढा सुरू असताना येत्या पावसाळ्यात शेतात पाणी घुसून पिकाचे नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न ताजीपूर, गौर, येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

पाणीपुरवठा योजना ठप्प
गेल्या पावसाळ्यात ७० टक्‍के भरलेला मसलगा प्रकल्प मार्च अखेरीस आटला. या प्रकल्पावरून पाणीपुरवठा होत असलेल्या पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या असल्याची माहिती पानचिंचोली मंडळातील ग्रामस्थांनी दिली. जवळपास १५ खेड्यासांठी असलेली योजना ठप्प असल्याचे शेतकरी व ग्रामस्थांनी सांगितले. 

यंदा पाणीच पुरलं नाही. अडीच एकरात दरवर्षी शंभर टन होणार उस ४० टनांवर आला. तो कारखान्याला दिला पण त्याचा पहिल्याच हप्ता मिळाला, पूर्ण पैसे मिळाले नाहीत.  ४ महिने झाले बोअर आटलेत. आता कसंबसं जनावरापुरतं पाणी मिळतय. १५ दिवसांत पाऊस पडला तर बरं. नाय त काय खरं नायं.
-अंकुश तळेगावे, लोदगा ता. औसा

तीन एकर उस व्हता तो वाळून गेला. शेवटी जनावराला कुट्टी करून खाऊ घातला, वाळलेला पेटून दिला. तीन महिनं झाली पिण्याच्या पाण्याची वणवण सुरू हाय. ना टॅंकर ना पाणी. एकच पाऊस पडला, त्यानंतर पाऊसच नाय. ना हरभरा आला ना काय. पाळी घातलेली जमीन काळी राहिली ती कायमचीच.
-गोविंद यादव, लोदगा ता. औसा

एकत्रित कुटुंबातील २० एकर शेतीत काही पिकलंच नाय. ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नापिकी झाली. मोठी आर्थिक अडचण आली. सोयाबीन म्हनाव तसं वापलं नाय. तूर वापली तर तिला पुढं पाणीच मिळालं नाय. तूर, सोयाबीनचा विमा भरला त मंडळाला मंजूर मूग, उडीदाचा झाला, ती पीकच नाय.
-अशोक सोमवंशी, निटूर ता. निलंगा

सहा एकर जमिनीतील जवळपास एक हेक्‍टर जमीन जाहीराबाद-लातूर मार्गात गेली. निजामकाळातला रस्ता येगळा अन्‌ हे होत असलेला येगळा. तीन वर्षांपासून गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी लढतोय. अडीचशेवर शेतकऱ्यांचा हाच प्रश्न आहे.
-ज्ञानोबा सोमवंशी, ताजीपूर ता. निलंगा

संचियकेनुसार रस्ता होईना. जेवढी घ्यायची तेवढी घ्यावं, त्यासाठी आम्हास नोटीसा काढावं, त्याचा मोबदला द्यावं. शिवाय रस्त्याची उंची वाढल्यानं नाली नसल्यानं पावसाचं पाणी थेट शेतात घुसून नुकसान व्हणार, त्याला जबाबदार कोण.
-वामन चौरे, गौर ता. निलंगा

५० टक्‍क्‍यांच्या आत आणेवारी असूनही विमा मिळाला नाही ना दुष्काळी अनुदान मिळालं. सोयाबीनचं क्षेत्र जास्त, त्याचं नुकसानही मोठं. पणं त्याला विमा परतावा मिळाला नाही. फक्‍त ज्वारीचा परतावा मंजूर झाला. प्रशासनाकडे मागणी करूनही उपयोग झाला नाही.
-बाबासाहेब पाटील, मसलगा ता. निलंगा

महिन्यांपासून एक ते दीड किलोमीटरवर पाण्यासाठी पायपीट करावी लागती. टॅंकरही नाही अन्‌ पाणीपुरवठ्यासाठी विहीर अधिग्रहणही नाही. पाण्यासाठी लई हाल सुरू हायेत.
-रोहिदास भूरे, ताजपूर ता. निलंगा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agriculture news