कापसाची आवक घटूनही दरात तेजी नाही

कापसाची आवक घटूनही दरात तेजी नाही

बाजारात सध्या कापसाची आवक कमी  आहे, पण तरीही दर मात्र वाढत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सध्या कापूस बाजारपेठेत संभ्रमाचे वातावरण आहे. कापसाच्या दरात मोठी तेजी येईल, अशी चर्चा गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू होती. गेल्या हंगामात (२०१८-१९) मध्ये कापसाचे घटलेले उत्पादन, सूत गिरण्यांकडील कमी साठा, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) नऊ लाख गाठी कापसाचा साठा उच्च दरात विकण्याच्या हालचाली या कारणांमुळे बाजारात कापसाचे दर वाढतील, असे बोलले जात होते. यातली प्रत्येक गोष्ट खरी असूनही देशात कापसाचे दर वाढण्याऐवजी उलट १० ते १५ टक्क्यांनी घटल्याचे आढळून आले.

‘कॉटनगुरू’ने जून महिन्यातच कापसाच्या दरातील ट्रेन्डबाबत भाष्य केले होते. त्या वेळी देशातील रूई बाजार तेजीतच होता. मागील तीन वर्षांच्या तुलनेत कापूस, कॉटनसीड आणि कॉटन केक यांच्या बाजारातही तेजीच होती. त्या वेळी भारतातील रूई जगातील सगळ्यात महागडी रूई होती. त्यामुळे निर्यातीत ४० टक्के घट झाली आणि आयात मात्र २५ टक्क्यांनी वाढली. अशा स्थितीत देशात कापसाचे दर चढे राहण्याची शक्यता धुसर असल्याचे आणि दर पडण्याची शक्यता अधिक असल्याचे जाणवत होते. त्यानंतर नव्या हंगामाची सुरवात होईपर्यंत बाजारात तेजी अनुभवायला मिळाली नाही. जागतिक बाजारातील स्थितीचे विश्लेषण केले असता पुढील बाबी लक्षात आल्याः

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुध्दामुळे रूई, सूत आणि कापसाच्या खपावर विपरित परिणाम झाला. त्यामुळे मागणी रोडावली, पुरवठा साखळी विस्कळित झाली. तसेच आर्थिक मंदीमुळे खरेदीदारांची मानसिकता आणि स्थिती बिघडली.

भारतात गिरण्यांनी आपल्या मागणी आणि खरेदीत कपात केली. त्याचा अंदाज बऱ्याच व्यापाऱ्यांना आला नाही. त्यामुळे मालाची उपलब्धता कमी असूनही भाव आणि मागणी वाढत नसल्याचे दिसून आले.

जिनर आणि स्टॉकिस्ट यांनी रईचा अतिरिक्त साठा करून ठेवला होता. तेजीच्या आशेने त्यांचा माल विकला गेला नाही. त्यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर मध्येही जुनी रूई मिळत होती.

आयातदारांनी मोठ्या प्रमाणात आयातीचे व्यवहार केले होते. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना हा माल विकण्यात अनेक अडचणी आल्या. त्यामुळे आयात केलेला बराचसा माल आजही उपलब्ध आहे.

२०१८-१९ आणि २०१९-२० या दोन हंगामांत रूईच्या उपलब्धतेची कमतरता जाणवलीच नाही.  

रूईची उपलब्धता अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे आवकेच्या आकड्यावरूनही स्पष्ट होते. ऑक्टोबर २०१८ मध्ये सुमारे २५ लाख गाठी कापसाची आवक झाली होती. परंतु, यंदा (ऑक्टोबर २०१९) मात्र १५ लाख गाठींच्या वर कापसाची आवक गेली नाही. नव्या हंगामाच्या पहिल्या महिन्यातच आवकेत १० लाख गाठींचा फरक पडला. तसेच सततच्या पावसामुळे कापसाच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला. परंतु, तरीही चांगल्या गुणवत्तेच्या मालाचे दर वाढताना दिसत नाहीत. वायदेबाजारातही दर थोड्या प्रमाणात वाढल्यानंतर आता घसरणच होत आहे.

बाजारात तेजी येणारच नाही किंवा मंदीचा हा प्रभाव असाच टिकून राहील, असे आमचे म्हणणे नाही. परंतु कापसाच्या बाजारात उठाव येण्यासाठी जे कारक घटक आवश्यक आहेत, ते सध्या कुठे दिसत नाहीत. निर्यातीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली तर कापसाचा बाजार पुन्हा तेजीकडे उसळी घेऊ शकतो. तसेच सरकारने काही विशिष्ट धोरणात्मक निर्णय घेतले तर तेजीकडे वाटचाल होईल.    

(लेखक कापूस बाजार विश्लेषक  असून ‘कॉटनगुरू’चे प्रमुख आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com