esakal | वाढत्या थंडीचे फळबागांवरील परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

वाढत्या थंडीचे फळबागांवरील परिणाम

भारत हा उष्ण आणि शीत कटिबंधीय प्रदेशात मोडतो. महाराष्ट्र हा उष्ण कटिबंधीय तसेच शुष्क प्रदेश (सेमी एरिड) या वातावरणीय विभागात मोडतो. यामुळे संपूर्ण भारताप्रमाणेच महाराष्ट्रातही थंडीची तीव्र लहर पसरते.

वाढत्या थंडीचे फळबागांवरील परिणाम

sakal_logo
By
डॉ. प्रल्हाद जायभाये, डॉ. ज्ञा. नि. धुतराज, सचिन मुंढे

थंडीची लाट येणे ही नैसर्गिक हवामानविषयक चक्राची बाब आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या लाटेची तीव्रताही कमी-अधिक असते. या थंडीच्या तीव्रतेचा परिणाम कृषी क्षेत्रामध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध पिकांवर विशेषतः फळबागांवर वेगवेगळ्या प्रकारे होतो. 

गेल्या आठवड्यापासून राज्यामध्ये वातावरणात बदल जाणवत आहे. महाराष्ट्रात थंडीमध्ये वाढ होत आहे. उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी चालू झाली असून, काही राज्यांमध्ये शीतलहरही सुरू झाली आहे. सामान्यतः महाराष्ट्रासह मध्य भारतामध्ये दिवसाचे ऊन आणि अधिक तापमान असते. यामध्ये उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांची भर पडते. परिणामी बऱ्याच ठिकाणी सकाळी उशिरापर्यंत धुक्याची चादर पसरलेली दिसते. 

Positive Story: थेट विक्री, मूल्यवर्धनासाठी ‘होम डिलिव्हरी चिकन’

थंडीची लाट येण्याची कारणे
हिमालयात पडत असणारे बर्फ, ध्रुवीय वारे, पश्चिमी विक्षोप (वेस्टर्न डिस्टर्बन्सेस) आणि पाकिस्तान व जम्मू काश्मीर वर सक्रिय असलेले चक्रवात ही थंडीची लाट येण्याची प्रमुख कारणे होत. थंडीची लाट भारतात किंवा महाराष्ट्रामध्ये सक्रिय होण्याशी जागतिक हवामान बदलाचा सरळ संबंध नाही. हे नैसर्गिक हवामानविषयक चक्र वर्षानुवर्षे चालू आहे. त्याची तीव्रता कमी अधिक असते. या कमी अधिक थंडीच्या तीव्रतेचा परिणाम कृषी क्षेत्रामध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध पिकांवर वेगवेगळ्या प्रकारे होतो.

सरासरी तापमानापेक्षा १ ते २ अंश सेल्सिअस तापमान कमी झाल्यास हवामान थंड आहे किंवा थंडी पडली असे म्हणतात. सरासरी तापमानापेक्षा उणे ३ ते ४ अंश सेल्सिअस तापमान गेल्यास ‘सौम्य थंडीची लाट’ असे म्हणतात, तर सरासरी तापमानापेक्षा उणे ५ ते ७ अंश सेल्सिअस तापमान गेल्यास ‘मध्यम थंडीची लाट’ असे म्हणतात, आणि सरासरी तापमानापेक्षा उणे ७ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक उणे तापमान गेल्यास ‘तीव्र थंडीची लाट’ असे म्हणतात.

भारत हा उष्ण आणि शीत कटिबंधीय प्रदेशात मोडतो. महाराष्ट्र हा उष्ण कटिबंधीय तसेच शुष्क प्रदेश (सेमी एरिड) या वातावरणीय विभागात मोडतो. यामुळे संपूर्ण भारताप्रमाणेच महाराष्ट्रातही थंडीची तीव्र लहर पसरते.

पुढील काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रावर थंडीची लाट  येण्याची शक्यता अधिक आहे. अशा वाढलेल्या थंडीचे पिकावर आणि पाळीव पशुपक्ष्यांवर दुष्परिणाम निश्चितपणे होतात. हे किमान पातळीवर राखण्यासाठी शेती व्यवस्थापनामध्ये वेळीच योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक असते.

थंडीची लाट ही नैसर्गिक आपत्ती
बदलत्या वातावरणात थंडीच्या लाट, थंड वारा आणि अवकाळी पाऊस यांच्या होणाऱ्या घटनांमधील वारंवारिता वाढत चालली आहे. महाराष्ट्रातील पीक पद्धती बदलली असून फळबागांचे प्रमाण वाढले आहे. त्यातही द्राक्ष, डाळिंब, आंबा, संत्री,  मोसंबी, फूल शेती व स्ट्रॉबेरी यासारखी नगदी पिके घेतली जातात. वातावरणातील थोड्याशा बदलांसाठीही ही पिके संवेदनशील आहेत. परिणामी उत्पादनामध्ये, दर्जामध्ये घट होते. नगदी पिके असल्याने उत्पादन खर्चही अधिक असतो. उत्पादन, उत्पन्न आणि वाढत चाललेला खर्च यांचा ताळमेळ बसवणे अनेक वेळेला शक्य होत नाही. परिणामी शेतकरी अडचणीत येतो. म्हणून थंडीची लाट, या काळामध्ये पडणारे धुके आणि त्याला जोडून येणारा हलका पाऊस किंवा मध्यम पाऊस ही बाबही नैसर्गिक आपत्तीप्रमाणे गृहीत धरली गेली पाहिजे. 

फळबागांवर थंडीचा होणारा परिणाम 
फळ झाडांची वाढ होण्यासाठी फळ बागेस उष्ण व कोरडे हवामान आवश्यक असते. त्याच बरोबर आकाश निरभ्र असावे लागते. फळ बागेस योग्य वाढीसाठी २७ ते ३७ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. कोरड्या हवामानात उत्कृष्ट प्रतीची फळे मिळतात. हवामान व जमिनीचा प्रकार हे दोन घटक फळबाग लागवडीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. जेव्हा हिवाळ्यामध्ये तापमान ५ अंश सेल्सिअस पेक्षा कमी होते, तेव्हा फळझाडे सुप्तावस्थेत जातात. त्यालाच शास्त्रीय भाषेमध्ये ‘डॉरमन्सी’ असे म्हणतात. झाडे स्वत:च्या रक्षणासाठी पानगळ, फूलगळ सुरू करतात. प्रामुख्याने सीताफळ, संत्री, अंजीर, बोर, द्राक्ष, चिकू, आंबा , डाळिंब, केळी इ. पिकांमध्ये पानगळ किंवा फूलगळ होण्यास सुरवात होते. सोबत धुक्याचे प्रमाण वाढल्यास पिकांवर रोगांचा विशेषतः भुरी, तांबेरा यांचा प्रादुर्भाव वाढतो. 

क्वालिटीची कमाल; सोलापुरातील खवा परराज्यातही झाला 'फेमस'

विविध फळ झाडांना फळधारणा झालेली असल्यास व पाऊस पडल्यास किंवा वातावरण ढगाळलेले असेल तर ते वातावरण फळ पिकास हानिकारक ठरते. 
अति थंडीमुळे फळामध्ये साखर निर्माण होण्याची प्रक्रिया मंदावते. 
या काळात हवेतील हवेतील आर्द्रता वाढल्यास फळांना भेगा पडतात. परिणामी फळांना बाजारभाव कमी मिळतो. 
या काळात सकाळी पडलेल्या तीव्र व दाट धुक्यामुळे रोग व किडींचे प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त असते. 

यामुळे संपूर्ण झाडांची पाने गळतात, फळगळ होते, फळे तडकतात, फळांच्या सालीस इजा होते. पाने, फांद्या, खोड यातील पेशींमध्ये पाण्याचे गोठण होऊन /बर्फ तयार होते. यामुळे कधीकधी फांद्या, तर कधीकधी पूर्ण झाड वाळून जाते. थंडीच्या लाटेचे विपरीत परिणाम होऊन एकूण प्रादेशिक उत्पादनात जवळपास २० ते ३० टक्के घट होते. 

भाजीपाल्याचे दर स्थिर;वांगी दरात सुधारणा

कीडनाशके संजीवके वापरासंबंधी
कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत.  फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे.   खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे.  बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे.  लेबल क्लेम वाचावेत.  पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत.  रसायनांचा गट तपासावा.  पीएचआय, एमआरएल तपासावेत.  पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.

 ः डॉ. प्रल्हाद जायभाये, ७९८०६८४१८९ 
(कृषी हवामान शास्त्रज्ञ तथा प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, जालना अंतर्गत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

loading image
go to top