द्राक्ष पट्ट्यात दिशादर्शक रेशीम शेती

द्राक्ष पट्ट्यात दिशादर्शक रेशीम शेती

नाशिक हा द्राक्ष-भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध जिल्हा. मात्र दाढेगाव येथील अल्पभूधारक संतोष भोर यांनी सुमारे सतरा वर्षांपूर्वी रेशीम शेती सुरू केली. प्रशिक्षण, सुधारित पद्धतींचा अवलंब यातून प्रावीण्य मिळवीत उत्तम दर्जाची रेशीमकोष निर्मिती व चॉकी सेंटर यशस्वी केले आहे. त्याद्वारे आर्थिक प्रगतीसह जीवनमान उंचावले आहे.  

दाढेगाव (ता. जि. नाशिक) येथील संतोष भोर यांची अवघी अडीच एकर जमीन आहे. पूर्वी भाजीपाला पिकांवर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून होता. सन २००३ च्या दरम्यान नातेवाइकांची रेशीम शेती पाहण्यात आली. आपणही प्रयोग करून पाहावा यासाठी ते जिल्हा रेशीम कार्यालयाशी जोडले गेले. रेशीम शेती आश्‍वासक वाटल्याने म्हैसूर (कर्नाटक) येथील केंद्रीय रेशीम उत्पादन संशोधन व प्रशिक्षण संस्थेसह विविध ठिकाणी प्रशिक्षण घेतले. विविध अभ्यासदौरे केले. ‘होमवर्क’ केल्यानंतर रेशीम शेतीला प्रारंभ केला. द्राक्ष व भाजीपाला पट्ट्यात हा प्रयोग असल्याने काहींनी खिल्ली उडविली. कुणी  हसले. मात्र संतोष यांनी जिद्द कायम ठेवली. जिल्हा रेशीम अधिकारी सारंग सोरते यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळू लागले. 

अनुभवातून शिक्षण 
एक एकरात तुती लागवड व अवघ्या ६० हजार रुपयांच्या भांडवलावर साध्या पद्धतीने लाकूड- बांबू यांचा वापर करून कीटक संगोपनगृह बांधले. जिल्हा रेशीम कार्यालयाकडून ‘कोलार गोल्ड’ जातीचे १०० अंडीपुंज खरेदी केले. ८० किलो रेशीम कोष तयार झाले. कामकाजात बदल करून, त्रुटी सुधारून कोषांची गुणवत्ता वाढवली. 

...असे आहे व्यवस्थापन 
  सकस खाद्य, गुणवत्तापूर्ण उत्पादन हे सूत्र ठेवले.
  प्रति १०० अंडीपुंजांसाठी एक हजार चौरस फूट सूत्राप्रमाणे तीन कीटक संगोपनगृहांची उभारणी. (१०० बाय ३० फूट अंतराचे १ तर ४० बाय २० फूट अंतराची दोन.)  
  लोखंडी अँगल, लाकडे व शेडनेट जाळीचा वापर करून चार थर पद्धतीने कप्प्यांची उभारणी.
  कोषांची गुणवत्तापूर्ण निर्मिती होण्यासाठी दर्जेदार पाला निर्मिती, त्यासाठी खत व सिंचन व्यवस्थापनावर भर. 
  दोन एकरांत तुती. वर्षातून एकदा एकरी पाच ट्रेलर शेणखताचा वापर.
  पुढील बॅच सुरू करण्यापूर्वी आंतरमशागत करून युरिया, १०:२६:२६, २००:२०:० यांचा वापर.
  पाणी मुबलक असल्याने प्रवाही पद्धतीने आठवड्यातून सिंचन.
  पानांची तोडणी झाल्यानंतर चांगल्या फुटव्यासाठी खरड छाटणीच्या कामात ब्रश कटरचा वापर. 
  चॉकी अवस्था ते कोषनिर्मिती कालावधीत सातत्यपूर्ण निरीक्षण
  संगोपनगृहात आर्द्रता व तापमान नियंत्रणाकडे विशेष लक्ष
  दर्जेदार सकस तुतीच्या पाल्याचा दिवसातून दोन वेळा पुरवठा
  स्वच्छतेवर भर, संसर्ग व रोग टाळण्यासाठी बेड कोरडे ठेवण्याकडे लक्ष
  प्रत्येक बॅचमधून कोष निघाल्यानंतर दरवेळी संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शेतकऱ्यांनी काळानुरूप कृषिपूरक व्यवसायातून बदल करणे गरजेचे आहे. सुरुवातीला धाडसाने रेशीम शेतीचा पर्याय निवडला. जिद्द, सातत्य व चिकाटीतून त्यात स्थैर्य मिळवले. 
- संतोष भोर, ८८३००९३५३७ 


मार्गदर्शकाच्या भूमिकेत 
जिल्हा रेशीम कार्यालयाकडून सन्मानपत्र.
रेशीम महासंचालनालयाच्या ‘महा-रेशीम अभियान’ २०१९ मध्ये विशेष प्रशस्तिपत्र. या उपक्रमातून ‘पायलट शेतकरी’ म्हणून मार्गदर्शक. नवे व्यावसायिक घडावेत यासाठी अनेकांना मार्गदर्शन.
केंद्रीय रेशीम महामंडळाच्या वतीने रेशीम कृषक मेळा, बारामती येथे पुरस्कार (२०१६).
ग्रामस्थांकडून ‘दाढेगाव भूषण पुरस्कार’ (२०१५).

‘चॉकी सेंटर धारक’ म्हणून ओळख 
अंडीपुंजांची उबवणी करण्यासाठी स्वतःचे चॉकी सेंटर.
‘ब्लॅक बॉक्सिंग’ प्रक्रिया अवगत. स्वच्छता, प्रादुर्भाव नियंत्रण या बाबी सांभाळून चॉकी व्यवस्थित वाढवून शेतकऱ्यांना पुरवतात. 
दहा वर्षांत एकाचीही तक्रार चॉकी गुणवत्तेत आलेली नाही हे कामकाजाचे यश.
प्रति १०० अंडीपुंजांच्या संगोपनातून १५०० रुपये मिळतात. 
दरवर्षी स्वतःसाठी ८ हजार, तर वितरणासाठी सहा हजार अंडीपुंज उबवितात. 
चॉकी सेंटरमधून १० व्या दिवशी संगोपनगृहात कीटक सोडल्यानंतर दिवसातून दोन वेळा असे १६ दिवस तुतीचा पाला खाऊ घातला  जातो. 
संगोपनगृहात तापमान किमान २२ ते कमाल २८ अंश से.   तापमानात घट झाल्यास कोळसा शेगडी पेटवून वाढवले जाते. तापमान अतिरिक्त वाढल्यास संगोपनगृहाच्या बाजूला बारदाने व सूक्ष्म तुषार फवारे मारून नियंत्रित केले जाते. आर्द्रता ७० टक्क्यांवर ठेवली जाते. 
रोग नियंत्रणासाठी विजेता पावडर, चुना, ब्लिचिंग पावडर यांची आवश्यकतेनुसार योग्य मात्रेत सुती वस्त्रातून  धुरळणी
दर्जेदार कोषनिर्मितीसाठी चंद्रिका. सुमारे २८ दिवसांनंतर रेशीम कोष तयार होऊन चंद्रिकेत अडकतात. तिसाव्या दिवसानंतर कोष चंद्रिकेतून संकलित केले जातात.
ए ग्रेडला दर अधिक मिळतो. यासाठी गुणवत्ता वाढविण्यावर भर. 

उत्पादन, विक्री व उत्पन्न  
  प्रति ३०० अंडीपुंजांपासून २०० ते २५० किलो रेशीम कोष उत्पादन 
  तीनही शेडमधून वर्षभरात आलटून पालटून सहा ते १२ बॅचेस
  २० किलोप्रमाणे डाग 
  संतोष यांचा सुमारे १० रेशीम उत्पादकांचा गट असून जालना, बारामती यासह रामनगर (कर्नाटक) येथील बाजारात कोषांची एकत्रित विक्री. प्रतवारीमुळे काहीवेळा थेट जागेवरही खरेदी. 
  अलीकडील वर्षांतील सरासरी दर (किलोचे) २५० ते ३००, ३५० रु. 
  वर्षभरात मिळणारा एकूण नफा- दोन ते अडीच लाख रु.
  चॉकी सेंटरमधून सुमारे ४० हजार रु.  

साध्य बाबी 
  संतोष यांच्यासह पत्नी अनिता, मुले समाधान व दीपक यांचेही व्यवस्थापनात लक्ष. कुटुंब केंद्रित कामकाजातून मजुरी खर्चावर मात.
आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यासह जीवनमानात बदल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com