पाचट कुजवा उत्पादन वाढवा

सोमेश्वर दीक्षित
मंगळवार, 14 जानेवारी 2020

हेक्‍टरी १३० टन खोडव्याचे लक्ष्य - कुरकुटे
भीमाशंकर साखर कारखान्यामार्फत प्रतिएकरी रुपये २३०० रुपये प्रमाणे उधारीवर खासगी ठेकेदारामार्फत पाचटाची कुट्टी करून दिली जाते, तसेच १०:२६:२६ च्या तीन बॅग, फवारणी औषधे, सूक्ष्म व मुख्य अन्नद्रव्येयुक्त खतेही उधारीवर दिली जातात. खोडवा ऊसउत्पादन वाढीसाठी कारखान्याकडून व्यापक अभियान राबविले जात आहे. दत्तात्रेय वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ योजनेंतर्गत २०१७ ते २०२० या लागवड हंगामासाठी हेक्‍टरी १३० टन ऊस उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे, असे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे यांनी सांगितले.

ऊसतोडणी केल्यानंतर शेतकरी उसाचे पाचट जाळून नुकसान करून घेतात. पाचट न जाळता ते कुजविल्यास, तसेच त्याचा वापर आच्छादन म्हणून केला, तर ऊस उत्पादनवाढीसाठी, मजुरी व पाणीबचतीसाठी उपयोग होऊ शकतो. जमिनीचा पोत सुधारून एकरी उत्पादनवाढीसाठी पाचटाचे आच्छादन फायदेशीर आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एक एकर क्षेत्रात सुमारे ३ ते ४ टन पाचट निघते. पण, ऊस तुटून गेल्यानंतर ते सरीत किंवा त्याची कुट्टी न करता शेतकरी ते जाळून टाकणे पसंत करतात. यामध्ये शेतकऱ्यांनी बदल करणे गरजेचे आहे. ऊस तुटल्यावर निघणारे पाचट न जाळता ते खोडव्यामध्ये सरीत किंवा पट्ट्यात व्यवस्थित पसरून टाकले, तर त्याच्या फायदा उन्हाळ्यात आच्छादन म्हणून तसेच उत्तम कंपोष्ट खत म्हणून होईल. उसाचे पाचट ठेवून जिवाणू खतांचा वापर केल्यास रासायनिक खताच्या वापरामध्ये २५ ते ३० टक्के बचत करून उसाच्या उत्पादनात एकरी ४ ते ६ टनाने वाढ होते. उसाच्या पाचटामध्ये साधारणपणे ४३ ते ४६ टक्के सेंद्रिय कर्ब, ०.४ ते ०.५ टक्के नत्र, ०.१ टक्के स्फुरद, ०.५ टक्के पालाश तसेच ०.५ टक्के कॅल्शिअम, ०.३ टक्के मॅग्नेशिअम व ०.१ टक्के गंधक हे दुय्यम अन्नघटक असून २४० पीपीएम लोह, ९० पीपीएम जस्त व ३०० पीपीएम मॅग्निज ही सूक्ष्मद्रव्ये असतात. एक एकरमधील पाचट जाळले, तर साधारणपणे १.५ ते २ टन सेंद्रिय पदार्थ वाया जाते. त्याप्रमाणे १५ ते २० किलो नत्र, ४ ते ६ किलो स्फुरद, काही प्रमाणात पालाश व सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये वाया जातात.
 
आच्छादन कसे करावे
ऊस तुटून गेल्यावर पाचट सरीमध्ये एकसारखे पसरावे किंवा पट्टा असल्यास त्यात पाचट पसरावे, कुटी मशिन उपलब्ध असल्यास त्या मशिनच्या सहाय्याने पाचटाची कुट्टी करावी. पाचटाचे आच्छादन केल्यानंतर किंवा कुट्टी केल्यानंतर उसाच्या बुडख्यावर पडलेले पाचट बाजूला करून बुडखे मोकळे करावे. उसाचे बुडखे उंच राहिल्यास ते जमिनीलगत कोयत्याने छाटून घ्यावेत, त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो व फुटव्यांची एकूण संख्या वाढते. बुडखा छाटणीनंतर रोग व किडीचा प्रादुर्भाव होऊ नये; म्हणून लगेच एक ग्रॅम बाविस्टीन व दोन मिली रोगर एक लिटर पाण्यात या प्रमाणात मिसळून फवारावे. शेतात पसरलेल्या पाचटावर सुरुवातीस प्रति एकर ३० किलो युरिया आणि ४० किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे तसेच प्रतिएकरी ४ ते ५ टन कुजलेली मळी किंवा शेणखतात एक लिटर पाचट कुजविणारे जिवाणू मिसळून पाचटावर टाकल्यावर कुजण्याची क्रिया लवकर होते.
  
पाचट कुजविण्याचे फायदे
खुरपणी व मशागतीच्या खर्चात बचत होते. पाचटाच्या आच्छादनामुळे संपूर्ण जमीन झाकली गेल्यामुळे गवत उगवत नाही, त्यामुळे खुरपणीचा खर्च वाचतो तर पहारीने खत दिल्यामुळे मशागतीचा खर्च वाचतो. पाचट आच्छादनामुळे किंवा पाचट कुटीमुळे संपूर्ण जमीन झाकली जाते, त्यामुळे जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, त्यामुळे जमिनीत १० ते १५ दिवस ओलावा टिकून पाण्याची ४० टक्के बचत होते. जमिनीत सतत वाफसा स्थिती राहिल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते. पाचट कुजल्यानंतर जमिनीत एकरी दीड ते दोन टन सेंद्रिय खताचा पुरवठा होतो, त्यामुळे जमिनीतील मातीच्या कणांची रचना सुधारून जमीन भुसभुशीत होते. हवा, पाणी यांचे संतुलन राहिल्याने जमिनीतील अन्नद्रव्यांचा पुरवठा जास्तीत जास्त होतो. जमिनीचे तापमानही योग्य राखले जाते, त्यामुळे जिवाणूंच्या संख्येत वाढ होऊन जमिनीतील नत्र स्थिरीकरणाचे, स्फुरद व पालाश उपलब्धतेचे प्रमाण वाढते. पाचट आच्छादनामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढल्यामुळे जमिनीचा चोपनपणा कमी होऊन जमिनीची सुपीकता वाढते. उसाच्या उत्पादनात एकरी ४ ते ६ टनांची वाढ होते. पाचट कुजल्यानंतर जमिनीतील अन्नद्रव्ये ऊसपिकास उपलब्ध होतात व त्याची उत्पादनवाढीस मदत होते. पाचट जळाल्यामुळे हवेतील प्रदूषण वाढते. पाचट कुजविल्यास जमिनीत अन्नघटकांचा पुरवठा होत असल्यामुळे बाहेरून रासायनिक खते २५ ते ३० टक्के कमी द्यावी लागतात, त्यामुळे जमिनीचे व पाण्याचे प्रदूषण कमी होते.
(शब्दांकन - नवनाथ भेके, निरगुडसर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agriculture production