बोंड अळीने साडेतीनशे कोटींचा फटका

सूर्यकांत नेटके 
रविवार, 10 डिसेंबर 2017

कापसावर पडलेल्या बोंड अळीमुळे शेतकऱ्यांचे यंदा सर्वाधिक सत्तर ते ७५ टक्के नुकसान झाले आहे. त्यात बाजारात सरकारी खरेदी केंद्रे नसल्याने दरही पडलेले आहे. त्यामुळे तातडीने खरेदी केंद्रे सुरू करावीत. पंचनामे करण्यासाठी अर्ज भरून घेतले जात आहेत. मात्र शेतकऱ्यांना त्याबाबत माहिती नाही. प्रशासनाच्या लोकांनी गावगावांत जाऊन त्याबाबत जागृती करावी.
- मिलिंद बागल, शेती अभ्यासक, नगर

कापसावर पडलेल्या बोंड अळीमुळे शेतकऱ्यांचे यंदा सर्वाधिक सत्तर ते ७५ टक्के नुकसान झाले आहे. त्यात बाजारात सरकारी खरेदी केंद्रे नसल्याने दरही पडलेले आहे. त्यामुळे तातडीने खरेदी केंद्रे सुरू करावीत. पंचनामे करण्यासाठी अर्ज भरून घेतले जात आहेत. मात्र शेतकऱ्यांना त्याबाबत माहिती नाही. प्रशासनाच्या लोकांनी गावगावांत जाऊन त्याबाबत जागृती करावी.
- मिलिंद बागल, शेती अभ्यासक, नगर

नगर - उसाचे क्षेत्र असेलल्या नगर जिल्ह्यामध्ये कापसाचे क्षेत्र वाढले खरे, मात्र यंदा बोंड आळीचा मोठा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. यंदा होणाऱ्या उत्पादनात सुमारे सत्तर टक्के उत्पादन घटले आहे. त्यामुळे जिल्ह्याला साडेतीनशे कोटी रुपयांचा फटका बसला आहे. बोंड आळीच्या धक्‍क्‍याने हवालदिल झालेल्या उत्पादकांना मात्र अजून तरी दिलासा मिळालेला नाही. विशेष म्हणजे अजूनही सरकारी खरेदी केंद्र सुरू नसल्याने बाजारात कापसाला दर कमीच आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उसाचे क्षेत्र आहे. मात्र मागील पाच-सहा वर्षांतील दुष्काळी परिस्थितीचा उसाच्या क्षेत्राला फटका बसला. त्यामुळे कापसाचे क्षेत्र वाढत आहे. जिल्ह्यामध्ये खरिपाच्या सरासरी साडेपाच लाख हेक्‍टर क्षेत्रात कापसाचे क्षेत्र आता सव्वा लाख हेक्‍टरवर गेले आहे. तीन वर्षांपूर्वी सरासरी क्षेत्र साठ हजार हेक्‍टर क्षेत्र होते. त्यात वाढ होऊन ते आता एक लाख हेक्‍टर झाले आहे. या वर्षी नगर तालुक्‍यात १४३७, पारनेर १४, श्रीगोंदा १६६८, कर्जत ७१७४, जामखेड ५५३०, शेवगाव ४३२३१, पाथर्डी २५८०३, नेवासा २११८७, राहुरी १०२२२, संगमनेर ४९८, कोपरगाव ३१०६, श्रीरामपर ३४५७, राहाता ६९९ अशी एक लाख २४ हजार २६ हेक्‍टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. 

यंदा चांगल्या पावसामुळे कापसाचा चांगला आधार मिळण्याचा आशा असताना बोंड आळीने मात्र मोठे नुकसान केले आहे. जिल्ह्यामध्ये सरासरी हेक्‍टरी दहा ते बारा क्विंटलचे उत्पादन निघते. यंदा मात्र हेक्‍टरी तीन ते चार क्विंटल एवढेच उत्पादन निघाले आहे. सुरवातीला चांगला पाऊस झाला, नंतरच्या काळात पावसाने ताणल्यामुळे कापसाची वाढ खुंटली आणि शेवटच्या काळात जोराचा पावसाने नुकसान केल्याने संकटाची मालिका सुरूच राहिल्याने कापूस उत्पादकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

शेती अभ्यासकांच्या मते जिल्ह्यामध्ये कापसाच्या उत्पादनातून सरासरी पाचशे साठ ते पाचशे सत्तर कोटींची उलाढाल होत असते. यंदा बोंड आळीच्या प्रादुर्भाच्या नुकसानीमुळे सुमारे साडेतीनशे कोटींच्या जवळपास उत्पादकांना फटका बसला आहे. बीटी बियाण्यांची लागवड करूनही बोंड आळी पडली. त्यामुळे बोगस बियाण्याची विक्री झाल्याचा संशय व्यक्त करत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी संघटना व कार्यकर्ते करत असताना अजून तरी शासनाकडून कापूस उत्पादकांना दिलासा मिळालेला नाही.

खरेदी केंद्र सुरूच नाहीत
राज्यात उसाच्या दराबाबत अंदोलन सुरू आहेत. सर्वच शेतकरी नेते उसाच्या दराबाबत आग्रही असताना कापसाबाबत मात्र सरकारप्रमाणेच नेत्यांनीही फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे. बोंड आळी व अन्य कारणाने नुकसान झाल्याचे सांगत बाजारात कापसाची व्यापारी कमी दराने खरेदी करत आहे. असे असताना सरकारी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतही कसल्याच हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे कापूस उत्पादक दुर्लक्षित आणि दुहेरी संकटात असल्याचे चित्र आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news 350 crore loss by cotton worm