राज्यातील कापूस उत्पादन २० लाख गाठींनी घटणार

चंद्रकांत जाधव
मंगळवार, 9 जानेवारी 2018

जळगाव - देशात सर्वाधिक ४१ लाख ४९ हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड करणाऱ्या राज्यात यंदा ७९ ते ८० लाख गाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन येणार असून, मागील कपाशी हंगामाच्या तुलनेत ते २० लाख गाठींनी कमी होणार आहे. यातच महाराष्ट्राच्या तुलनेत लागवड निम्मी असतानाही गुजरातमध्येही ८० ते ८१ लाख गाठींचे उत्पादन येईल. गुजरातेत महाराष्ट्राची कपाशी अधिक प्रमाणात गेल्याने गुजरातचे उत्पादन वाढणार असल्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियासह खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशनने व्यक्त केला आहे. 

जळगाव - देशात सर्वाधिक ४१ लाख ४९ हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड करणाऱ्या राज्यात यंदा ७९ ते ८० लाख गाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन येणार असून, मागील कपाशी हंगामाच्या तुलनेत ते २० लाख गाठींनी कमी होणार आहे. यातच महाराष्ट्राच्या तुलनेत लागवड निम्मी असतानाही गुजरातमध्येही ८० ते ८१ लाख गाठींचे उत्पादन येईल. गुजरातेत महाराष्ट्राची कपाशी अधिक प्रमाणात गेल्याने गुजरातचे उत्पादन वाढणार असल्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियासह खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशनने व्यक्त केला आहे. 

राज्यात १०३ लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज होता. परंतु दिवाळीनंतर कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने सर्वांचे अंदाज चुकले. राज्यात गुलाबी बोंड अळीची स्थिती जेवढी गंभीर आहे तेवढी गुजरातेत यंदा नाही. तेथे सुधारित देशी व देशी कपाशी वाणांवर फारसा गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव नाही. २०१५ च्या हंगामात गुजरातेत गुलाबी बोंड अळी आली होती. परंतु बोंड अळीच्या नियंत्रणासंबंधी गुजरात सरकारने २१ कोटींचे विशेष पॅकेज देऊन मोहीम राबविली होती. त्यामुळे २०१६ व २०१७ च्या हंगामात गुजरातेत बोंडळी फारशी नाही. त्या तुलनेत राज्यात मात्र कोरडवाहू कपाशी अधिक आहेत.

पूर्वहंगामी कपाशीचे क्षेत्र गुलाबी बोंड अळीने ९० टक्के रिकामे झाले आहे, दावा कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य अरविंद जैन यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना केला.

कपाशी १२०० तर सरकी ४०० ने वधारले
मागील २८ दिवसांत दर्जेदार कपाशी कमी व किडकी कपाशी अधिक येत असल्याची स्थिती आहे. यातच दर्जेदार कपाशीचा तुटवडा वाढला असून, कपाशीचे दर मागील २८ दिवसांत एक क्विंटलमागे १२०० ते १३०० रुपयांनी वधारून ५४०० ते ५५०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. तर सरकीचे दर क्विंटलमागे ४०० रुपयांनी वाढले आहेत. ही तेजी पुढेही कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले. 

राज्याच्या उत्पादनात गुजरात हिस्सेदार
राज्यात दिवाळीपूर्वी कपाशीची स्थिती बरी होती. त्याच वेळी बुलडाणा, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार या कपाशी पट्ट्यातून गुजराती जिनर्सनी मोठ्या प्रमाणात कपाशीची आयात केली. त्यासाठी गावोगावी मध्यस्थ पाठविले होते. खेडा खरेदी वेगात केली. दरही महाराष्ट्रातील जिनर्सच्या तुलनेत क्विंटलमागे १५० ते २०० रुपये अधिक दिले. सणासुदीला पैसे लागतात म्हणून शेतकऱ्यांनीही साठविलेली कपाशी विकली. जळगाव जिल्ह्यातून तर रोज पाच हजार क्विंटल कपाशी गुजरातेत जात होती. गुजरातेत यंदा सुमारे २१ लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली आहे. तेथे पूर्वहंगामी कपाशीचे क्षेत्र सुमारे १३ लाख हेक्‍टर आहे. देशी वाणांमुळे तेथे फरदड कपाशीही अधिक घेतली जात असल्याने उत्पादन वाढणार असल्याची माहिती मिळाली. 

महाराष्ट्रात यंदा १०० लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज होता. परंतु गुलाबी बोंड अळीमुळे दर्जेदार कपाशी कमी झाली आहे. सूतगिरण्या बाहेरील राज्यातून दर्जेदार रुईचे सूत मागवून घेत आहेत. राज्यातील गाठींचे उत्पादन कमी होणार असून, ते ८३ लाख गाठींपर्यंत असेल. 
- राजाराम दुल्लभ पाटील, कार्यकारी संचालक, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, लोणखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार)

महाराष्ट्र व गुजरातमधील रुईचे (गाठी) उत्पादन सारखेच राहील. कारण गुजरातेत महाराष्ट्रातूनच कपाशी जाते. महाराष्ट्रात २० ते २१ लाख गाठींनी उत्पादन घटणार आहे. महाराष्ट्रात गुलाबी बोंड अळीची स्थिती गंभीर आहे. गुजरातेत तशी स्थिती नाही. तेथे एप्रिलपर्यंत कपाशीचे दर्जेदार उत्पादन येईल, असे चित्र आहे. 
- अरविंद जैन, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

गुजरातमधील जिनर्सनी कर चुकवून कोट्यवधींच्या कपाशीची महाराष्ट्रातून आयात केली. राज्यात सर्वाधिक कपाशी लागवड करणाऱ्या जळगावमध्ये अनेक मध्यस्थ गुजराती जिनर्सनी हाताशी धरले आहेत. 
- लक्ष्मण पाटील, सचिव, खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news cotton production less