दुग्ध व्यवसायातून मिळवली आर्थिक सक्षमता

उफाडे बंधूंनी गाईंसाठी मुक्त संचार पद्धतीने तयार केलेला गोठा.
उफाडे बंधूंनी गाईंसाठी मुक्त संचार पद्धतीने तयार केलेला गोठा.

नाऊमेद न होता जो मार्गातील अडथळ्यांवर योग्य पद्धतीने मात करतो, तोच यशस्वी होतो. वरखेडा (जि. नाशिक)  येथील उफाडे बंधूंची कथा अशीच आहे. कुटुंबाकडे अवघे दोन एकर क्षेत्र. मागील पाच वर्षांत एका गाईपासून सुरवात करून सोळा गाईंपर्यंत उफाडे बंधूंनी मजल मारली. दुग्ध व्यवसायातून त्यांनी आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल सुरू केली आहे.

वरखेडा (ता. दिंडोरी, जि. नाशिक) हे गाव द्राक्षशेतीसाठी प्रसिद्ध. लखमापूर फाट्याहून वरखेडा गावाकडे जाताना जनता विद्यालयाजवळ प्रल्हाद पुंजाजी उफाडे यांची शेती आहे. टोमॅटो, द्राक्ष, कोबी लागवड करणारे प्रयोगशील शेतकरी अशी त्यांची ओळख. मागील काही वर्षांत बदलत्या वातावरणामुळे ही पिके अडचणीत आली. यातच मणक्‍याची शस्त्रक्रिया करण्याची वेळ त्यांच्यावर आली. प्रल्हादराव जिद्दीने शेती करीत असतानाच शिकत असलेल्या जालिंदर, वैभव, चेतन या मुलांनी हळूहळू शेतीची सर्व जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेण्यास सुरवात केली. भाजीपाला शेती परवडत नसल्याचे समोर आल्यानंतर या तिघांनी दुग्ध व्यवसायाकडे वळायचे ठरवले. 

जालिंदरचे वय ३२, वैभवचे वय २६, तर चेतनचे वय २२ आहे. जालिंदर आणि वैभव गावालगत असलेल्या एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. चेतन मात्र पूर्णवेळ दुग्ध व्यवसायात आहेत. जालिंदर आणि वैभव हे नोकरी संभाळून चेतन यांना पशुपालनात मदत करतात. तिघांनीही व्यवसायातील कामाचे विभाग वाटून घेतले आहेत. तिघांचा समन्वय आणि व्यवस्थापनात वडील प्रल्हाद व आई नंदाबाई, जालिंदर यांची पत्नी वर्षा यांचा सहभाग यामुळे उफाडे कुटुंबाचा ‘ईश्‍वरी डेअरी फार्म’ दमदार वाटचाल करीत आहे. 

शेतीतील अनुभवाबाबत जालिंदर म्हणाले, की वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भाजीपाला पिके घेत होतो. कधी चांगले उत्पन्न यायचे तर कधी मोठा तोटा व्हायचा. स्थिर उत्पन्न कधीच नसायचे. २०१० मध्ये लागवड केलेल्या टोमॅटो क्रेटला ११०० पर्यंत दर मिळाला. त्या वेळी चांगले उत्पन्न मिळाले होते. त्याच्या दुसऱ्या वर्षी दर इतका कमी मिळाला की खर्च तर गेलाच; वरून अडीच लाखांचा तोटा झाला. हा अनुभव आमच्यासाठी ‘टर्निंग पॉइंट’ ठरला. आता उत्पन्न कमी मिळाले तरी चालेल, पण शाश्‍वत उत्पन्न कसे मिळेल याचा आम्ही शोध घेऊ लागलो. दुग्ध व्यवसायाचा पर्याय समोर आला. मात्र हा यशस्वी होणारा व्यवसाय नाही. गोठ्याकडे वळू नका, असे अनेकांनी आम्हाला सांगून हे न करण्याचे सल्ले दिले. मात्र आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो.

दुग्ध व्यवसायाला सुरवात 
दुग्ध व्यवसायाच्या वाटचालीबाबत चेतन उफाडे म्हणाले, की,वर्ष २०१२ पासून आम्ही दुग्ध व्यवसायाकडे वळलो. सायखेडा बाजारातून पहिल्यांदा एका मध्यस्थाच्या मदतीने होल्स्टिन फ्रिजियन गाय खरेदी केली. दुसऱ्या वेताची समजून गाय खरेदी केली, मात्र प्रत्यक्षात ती पाचव्या वेताची गाय होती. हे उशिराने कळले. फसवणूक झाल्यानंतर आमची समज वाढली. दुसऱ्या वर्षी लोणी (जि. नगर) येथील बाजारातून चार होल्स्टिन फ्रिजियन गाई घेतल्या. २०१५ मध्ये आमच्याकडे भीषण पाणीटंचाई होती. या काळात चांगल्या १० कालवडी विकाव्या लागल्या. आता पाच वर्षांनंतर गोठ्यात १६ दुधाळ गाई आणि पाच कालवडी आहेत. या सर्व गाई घरच्या वेताच्या आहेत. आम्ही मुक्त संचार गोठ्याचा अवलंब केला आहे. दोन्ही वेळेचे मिळून २२० लिटर दूध खासगी डेअरीला देतो. डेअरीची गाडी रोज गोठ्यावर येऊन दूध घेऊन जाते. त्यामुळे दूध वाहतुकीची अडचण नाही. 

शेण, गोमूत्रालाही मागणी 
मुक्त संचार गोठ्यात गाईंचे शेण चार महिन्यांपर्यंत तसेच राहू दिले जाते. उन्हामुळे ते चांगले वाळते. या शेणामध्ये गोमूत्रदेखील मिसळत असल्याने त्याची गुणवत्ता वाढते. परिसरातील शेतकऱ्यांकडून या खताला चांगली मागणी आहे. दरवर्षी साधारण ३६ ट्रॉली शेणखत विकले जाते. प्रतिट्रॉली ४००० रुपये दराने शेणखताची विक्री होते. ठराविक कालावधीत शेतकऱ्यांकडून स्लरीसाठी  गोमूत्राची मागणी असते. गोमूत्र विक्रीतून वर्षाला ५० हजार रुपये मिळतात. ओल्या शेणखताच्या विक्रीतूनही वर्षाला २० हजारापर्यंत उत्पन्न मिळते.
 

दूध प्रक्रियेच्या दिशेने 
 उफाडे बंधूंनी अन्न उत्पादन शुल्क विभागाकडून दूध उत्पादनाचे परवाने, तसेच शुद्धतेसाठीचे ‘एफआयएसएसएआय’ हे मानांकनाचे प्रमाणपत्र मिळवले आहे.
 पाश्‍चराईज्ड, चिलिंग, पॅकिंग आदी व्यवस्था करून दुधाचा ‘ईश्‍वरी दूध’ हा ब्रॅंड विकसित करण्याचा प्रयत्न.
 येत्या महिन्यात स्वतंत्र गोठ्यात ११ थारपारकर या भारतीय गाईंचे संगोपन. यासाठी पुणे येथील थारपारकर काऊ क्‍लबमधून गाई आणण्याचे नियोजन केले आहे. 
 

मुक्त संचार गोठ्यातील नियोजन 
 रोज सकाळी पाच वाजता कामाला सुरवात.
 दूध काढण्यापूर्वी गाईंना ढेप, खनिज मिश्रण दिले जाते.
 ५ ते ६ या वेळात यंत्राने गाईंचे दूध 
काढले जाते. यामुळे वेळ आणि श्रमाची बचत.
 दूध काढल्यानंतर गाईंना पुरेशा प्रमाणात चारा कुट्टी दिली जाते. 
 आठ वाजता गाई गोठ्यात मोकळ्या सोडून दिल्या जातात.
 नऊ वाजेपर्यंत गोठ्याची स्वच्छता.
 दुपारी ४ ते ५ या वेळात यंत्राने 
वैरण, कडबा याची कुट्टी केली जाते.
 पाच वाजता दूध काढले जाते. त्यापूर्वी ढेप, खनिज मिश्रण दिले जाते. दूध काढल्यानंतर फुले जयवंत चाऱ्याची कुट्टी दिली जाते. पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने आहारात बदल केला जातो.
 सातपर्यंत गोठ्यातील सर्व कामे पूर्ण होतात. साडेसातला गाई गोठ्यात मोकळ्या सोडल्या जातात.
 

 महत्त्वाचे मुद्दे 
 मुक्त संचार पद्धतीचा अवलंब. त्यामुळे गाईंना व्यायाम होऊन आरोग्य चांगले.  दर्जेदार खाद्य, सकस चारा, स्वच्छता, जंत निर्मूलन, लसीकरणावर भर. त्यामुळे आजाराचे प्रमाण अत्यल्प. दीड एकरावर चारा पिकांची लागवड.
 दूध काढण्याची वेळ निश्‍चित. सकाळ व संध्याकाळी दोन्ही दूध काढणीतील अंतर १२ तास. गाईंना दर तीन दिवसांनी खरारा.
  गाईंना गोठ्यामध्येच सातत्याने ताजे स्वच्छ पाणी मिळण्याची सोय.
 दोन्ही वेळी दूध काढताना गोठ्यात बासरीचे मधुर संगीत गाईंना ऐकविले जाते. 
 प्रतिदिन एक गाय १८ ते २० लिटर दूध देते, दुधातील फॅट ४ ते ४.४ फॅट, एसएनएफ ८.५ ते ८.८.
 दररोज २२० लिटर दूध खासगी देअरीला दिले जाते. सध्या प्रतिलिटर २८ रुपये दर. गाईंचा विण्याचा काळ, दूध देण्याचा तसेच न देण्याचा काळ हे सर्व पाहता दूध उत्पादनात बदल होतो. त्याप्रमाणे उत्पन्नातही चढ उतार होतात. खर्च वजा जाता दूध उत्पादनानुसार दर महा २५ ते ४० हजारांचा नफा.

- चेतन उफाडे -  ९८२२३२९२९८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com