फुलांनी भरले ढोकणे कुटुंबात प्रगतीचे रंग

नामदेव ढोकणे
नामदेव ढोकणे

पोखरी (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथील नामदेव ढोकणे यांनी काळाची पावले ओळखत शेतीपद्धतीत बदलासाठी पुढाकार घेतला. गेल्या काही वर्षांपासून फूलशेतीची कास धरली. बाजारपेठा अोळखून विक्रीचे तंत्रही आत्मसात केले. त्याद्वारे अर्थकारण सक्षम केले. त्यांच्या अनुकरणातून गावातील काही शेतकऱ्यांच्या शिवारातही समृद्धी नांदण्यास सुरवात झाली आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात पुसद या तालुक्‍याच्या ठिकाणापासून अवघ्या दहा किलोमीटरवर असलेल्या पोखरी गावची लोकसंख्या सुमारे दीड हजारांवर आहे. कापूस, भाजीपाला यासारख्या पिकांवर येथील शेतकऱ्यांचा भर राहतो. गावशिवाराला लागूनच नामदेव ढोकणे यांची दहा एकर शेती आहे. सोयाबीन त्यासोबतच एक एकर ऊस, दोन एकरांवर हळद लागवड केली जाते. मेथी, कोथिंबीर, गाजर यासारखी पिके ते घेत. परंतु, काही अपवादात्मक स्थिती वगळता अपेक्षित अर्थकारण या पीकपद्धतीतून साधत नव्हते. झाली तर "भाजी'' नाही तर "पाला'' असा अनुभव काहीवेळा भाजीपाला पिकांमधून यायचा. त्यामुळे या पिकांखालील क्षेत्र त्यांनी कमी केले.  

फूलशेतीची धरली वाट 
गावातील एक शेतकरी फूलशेती करायते. परंतु, पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागल्याने त्यांना फूलशेती थांबवावी लागली. त्याचवेळी ढोकणे यांनी या पीकपद्धतीचा अभ्यास केला. त्यातील अर्थकारण अभ्यासले. पाण्याचे योग्य नियोजन करून हे पीक यशस्वी करण्याचे ठरवले. साधारण २०१३ पासून या पिकावर लक्ष केंद्रित केले. 

प्रयत्नांती परमेश्‍वर
दहा एकर शेतीसाठी एकमेव विहिरीचा पर्याय आहे. ऊस आणि अन्य पिकांसाठी उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे जलस्रोत बळकट करण्यासाठी सरसावलेल्या ढोकणे यांनी पुस नदीपर्यंत दोन किलोमीटर पाइपलाइन टाकत पाणी आणले. हे पाणी विहिरीत सोडत जलपुनर्भरण करण्यावर त्यांचा भर राहतो. या कामासाठी सुमारे चार लाख रुपयांचा खर्च झाला. बॅंकेने दोन लाखांचे कर्ज दिले. उर्वरित पैशाची सोय घरूनच केली. 

फुलांसाठी बाजारपेठ
पोखरीहून मराठवाड्यातील नांदेड हे जिल्ह्याचे ठिकाण सुमारे ११० किलोमीटर आहे. दसरा, दिवाळीत या बाजारपेठेत झेंडू फुले कमी पोचतात. ही बाब हेरून या मार्केटला माल नेण्याचे ठरविले. पहिल्या प्रयत्नात एक क्‍विंटल दहा किलो झेंडू फुले दुचाकीवरून त्यांनी नांदेडपर्यंत नेली. त्या वेळी चांगले दर मिळाले. आता खासगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून झेंडू नांदेडच्या बाजारात नेण्यावर भर राहतो. सरासरी ६० ते ७०  रुपये प्रति किलो दर या ठिकाणी मिळतो. दहा गुंठे क्षेत्रावर गुलाब आहे. पुसद, दिग्रस या तालुक्‍याच्या दोन्ही ठिकाणी विक्री केली जाते. सरासरी दोन रुपये प्रति फूल किंवा काही वेळा त्यातून अधिक दर मिळतात.

विविध फुलांची निवड
नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध शिर्डी संस्थानच्या परिसरात ज्या गुलाबाची शेती होती त्याची शेती ढोकणे यांनी सुरू केली. त्याचबरोबर गॅलार्डिया, शेवंती, निशीगंध, अॅस्टर, झेंडू यासारखी फुलेदेखील त्यांच्याद्वारे घेतली जातात. ज्या फुलांची मागणी असेल तोच लागवडीचा  हंगाम असतो. दसऱ्याच्या आठ ते दहा दिवस आधीच झेंडू बाजारात पोचला पाहिजे असे त्यांचे नियोजन असते. कारण दसऱ्याच्या एक दिवस आधी किंवा दसऱ्याच्या दिवशीच बाजारात अनेक शेतकऱ्यांचा माल पोचतो. परिणामी आवक वाढल्याने दर कोसळतात. हा अनुभव लक्षात घेऊन दर चांगला पदरात पाडून घेण्याचे हे तंत्र वापरले जाते.

तीन क्‍विंटल फुलांची गरज
बाजारपेठ किंवा व्यापारी नसले तरी इच्छा तिथे मार्ग या उक्‍तीनुसार हार- फुले विक्रेत्यांच्या माध्यमातून असलेली बाजारपेठ ढोकणे यांनी शोधली. पुसद येथील किरकोळ विक्रेत्यांची दररोजची फुलांची गरज तीन  क्‍विंटल आहे.  ही गरज भागविण्याचे काम पोखरीसह परिसरातील अन्य गावातील शेतकरी करतात असे ढोकणे यांनी सांगितले. 

ढोकमे यांच्या शेतीची ठळक वैशिष्ट्ये
  मुख्यत्वेतुषार सिंचनाने पाणी व्यवस्थापन
  कळ्या लागल्यावर पाण्याचा ताण पडू देत नाही.
  उत्पादनात सातत्य
  एक प्लॉट संपण्यापूर्वी दुसरा प्लॉट तयार असतो.
  उन्हाळ्यात दोन ते तीन दिवसांनी, तर हिवाळ्यात आठ दिवसाआड पाणी.
  मशागतीसोबतच शेणखत पसरवून दिले जाते. 
  रोपांच्या बुडाशी शेणखताचा वापर.
  जैविक खतांचे ड्रेचिंग.
  वर्षभर फुले मिळतील असे नियोजन
  लागवडीपूर्वी मार्केटचा अभ्यास

फूल विक्रेत्यांशी केला करार
पुसद, दिग्रसला फूल बाजारपेठ किंवा व्यापारी नाहीत. त्यामुळे किरकोळ फूल विक्रेत्यांनाच विक्री करण्यावर या भागातील शेतकऱ्यांचा भर राहतो. सद्यस्थितीत पुसदला पाच तर दिग्रसला सुमारे सहा असे विक्रेते आहेत. त्यांनाच नामदेव आपली फुले देतात. अॅस्टर वर्षभर २० रुपये प्रति किलो दरांप्रमाणे विकण्याचा करार त्यांनी या विक्रेत्यांसोबत केला आहे.  

पोखरी झाले फूलशेतीचे हब
ढोकणे यांना फूलशेतीच्या माध्यमातून अर्थकारण सक्षम करणे शक्य झाले. त्यांच्या अनुकरणातून पुढे गावातील गोपाल फुलाते, सुदर्शन भालेराव, हनुमंत आष्टे, अशोक फुलाते यांनीदेखील फुलशेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. आज घडीला फूलशेतीच्या माध्यमातून पोखरी या छोट्याशा गावाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. फुलांतून दररोज ताजा पैसा मिळतो. कुटुंबाच्या गरजा भागविता येतात. त्यातून शेतीचे व्यवस्थापन करणेही सोयीचे होते असे फूल उत्पादक सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com