खाद्य, पाण्यातील जिवाणूंचा प्रादुर्भाव अोळखण्याची पद्धत विकसित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

जगभरातील बहुतेक लोक भाज्या शिजवून खातात. परंतु अमेरिकेतील जास्तीत जास्त लोकांना फळे अाणि भाज्या कच्चे खाणे आवडते.

जगभरातील बहुतेक लोक भाज्या शिजवून खातात. परंतु अमेरिकेतील जास्तीत जास्त लोकांना फळे अाणि भाज्या कच्चे खाणे आवडते.

खाद्यपदार्थ अाणि पाण्यातील जिवाणूंमुळे विविध प्रकारचे जिवाणूजन्य अाजार पसरतात. अन्नसुरक्षेतील सध्याची ही एक मोठी अाणि महत्त्वाची समस्या अाहे. ही समस्या लक्षात घेऊन अमेरिकेतील विश्लेषणात्मक रसायनशास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ लिली हे यांनी मैसाचुसेट्स एमहर्स्ट विद्यापीठातील त्यांच्या सहकाऱ्यांसह पाण्यामधील किंवा खाद्यातील जिवाणूंचा शोध घेण्यासाठी एक नवीन, जलद आणि कमी-खर्चाची पद्धत विकसित केली आहे. त्यामुळे पाणी, फळे अाणि भाज्यांतील जिवाणूंचा प्रादुर्भाव तपासून स्वच्छ अाणि अारोग्यदायी फळे अाणि भाज्यांची निवड करणे शक्य होणार अाहे. या पद्धतीमुळे जलदगतीने फळे अाणि भाज्यांतील जिवाणूंचा प्रादुर्भाव कळू शकेल.

...असा अोळखता येईल जिवाणूंचा प्रादुर्भाव
जिवाणूंचा शोध घेण्यासाठी एक चीप तयार करण्यात अाली अाहे. या चीपमध्ये प्रकाश सूक्ष्मदर्शकाचा वापर करण्यात अाला अाहे. त्यामुळे खाद्यपदार्थातील जिवाणू स्मार्ट फोनद्वारे सहजपणे डोळ्यांना दिसतील.
प्रकाश सूक्ष्मदर्शकासह वापरल्या जाणाऱ्या चिपमध्ये ३ - मरकॅप्टोफीनीलबोरोनिक अाम्लाचा वापर करण्यात अाला अाहे. त्यामुळे कोणतेही जिवाणू या चीपकडे आकर्षिले जाऊन बांधून ठेवले जातील.

पाणी, फळांचे ज्यूस किंवा भाज्यांची पाने बारीक करून त्यामध्ये ही चीप ठेवून स्मार्ट फोन ॲपद्वारे त्यातील जिवाणूचे प्रमाण तपासता येते.

या चीपकडे केवळ जिवाणू आकर्षिले जातात. साखर, प्रथिने, फॅट अाणि धूळ अाकर्षिली जात नाही.

चीपला लागलेले खाद्य किंवा पाणी जास्त सामू असलेल्या बफर द्रावणाने धुतले जाते. त्यामुळे केवळ जिवाणूचे प्रमाण स्मार्ट फोन सूक्ष्मदर्शक अाणि ॲपद्वारे डोळ्यांना दिसते.

जिवाणूंचा प्रादुर्भाव अोळखण्याची जलद पद्धत
जिवाणूंचा प्रादुर्भाव अोळखण्याची एरोबिक प्लेट काऊंट ही प्रमाणित पद्धत मानली जाते. परंतु या पद्धतीद्वारे जिवाणूंचा प्रादुर्भाव अोळखण्यासाठी दोन दिवस लागतात. तसेच काही जलद पद्धतीही अाहेत, परंतु त्या विश्‍वसनीय अाणि खात्रीशीर नाहीत, परंतु या पद्धतीमुळे दोन तासांच्या अात अधिक जलद अाणि खात्रीशीरपणे जिवाणूंचा प्रादुर्भाव अोळखता येणार अाहे. हे तंत्र आता पेटंटच्या प्रक्रियेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news food water bacteria develop an effective method of infestation

टॅग्स