गोइंधनातच दडलंय गोवंदन

गोइंधनातच दडलंय गोवंदन

राज्यात गोइंधनावर वाहने कधी धावणार? याची मागणी झाली तरच देशी गोवंशाबाबत कृतीतून सद्भावना दिसू शकेल. केवळ वंदनासाठी गाय नको, तिची क्षमता वीजनिर्मिती, ऊर्जाशक्ती, इंधन पुरवठा यादृष्टीने पडताळणे गरजेचे आहे.

विज्ञान युगात देशी गोवंश भावनिक, धार्मिक, पुजनीय स्वरुपात पडळताना ऊर्जास्त्रोत म्हणून अधिक डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. गोहत्या बंदीबाबत प्रदीर्घ चर्चेपेक्षा गो उपयुक्तता अनुभवणे, वाढविणे, प्रसारीत करणे म्हणजे पशुकल्याण अपेक्षित असणारी कृतीतून सद्भावना होय. गोविज्ञानाची झेप फार स्पृहणीय ठरत असल्यामुळे भारतीय कौशल्य विकासाकडे सर्वांचे लक्ष दिसून येेते. 

पश्चिम बंगालमध्ये मोठी आरामगाडी गोइंधनावर सुरू करण्यात आली असून केवळ एका रुपयात सतरा किमी एवढ्या दराने प्रवासी भाडे आकारण्यात येत आहे. अवघ्या एक किलो गोइंधनात सहा किलोमीटर एवढे अंतर पूर्ण करणारी बस हा चर्चेचा विषय आहे. मिथेन या जैवइंधनावर वाहनांची सोय मोठ्या प्रमाणात दिसून येण्याचे दिवस अजिबात दूर नाहीत. कारण भारताचे उद्योगमहर्षी टाटा यांच्या निर्मितीची बायो-मिथेन बस यशस्वीपणे रस्त्यावर उतरली आहे.

गायीच्या शेणापासून मिळणारा मिथेन हा वायू रंगहिन, विषहीन मात्र ज्वालाग्राही असून त्याचा इंधनासारखा वापर केल्यास वाहने, स्वयंपाक इंधन आणि वीजनिर्मिती असा उपयोग होतो. पर्यावरणाच्या रक्षणासाठी जैवइंधनाची वाहने म्हणजे इष्टापत्ती असून रॉकेल, डिझेल, पेट्रोल वापर कमी होण्यास आणि त्यावर होणाऱ्या आयातीची बचत देश विकासात मोलाची साथ ठरू शकेल. राजस्थानमधील शेतकऱ्याने दरमहा दोन लाख रुपयांचे वीजबिलाची बचत करण्यासाठी शेणाचा यशस्वी वापर करून वीजनिर्मिती सुरू केली आहे. दररोज ८० किलो व्होल्टस एवढी वीज उत्पादन करणारा ऊर्जा निर्मिती संच उभारुन दूध संकलन संयंत्र, रोबोटीक दूध यंत्रणा, दूध शितकरण, पंखे, तुषार यासह अनेक ठिकाणी वीजवापर सुरू केला आहे. देशात नरवासरे आणि बैल संख्या उपयुक्तता आणि म्हणून झपाट्याने घटत आहेत. दरवर्षी २० टक्के एवढ्या संख्येने कमी होणारे गोऱ्हे हा चिंतनाचा विषय आहे. शेतीसह वाहतूक कामासाठी लागणारी शक्ती ट्रॅक्टर आधारित झाल्याने ट्रॅक्टरपोळा ही संकल्पना वेदनादायक आहे. मात्र दिवसा शेतीकाम आणि रात्री ऊर्जाशक्तीतून वीजनिर्मिती करण्यासाठी नर गोवंश सांभाळला गेल्यास ऊर्जाबचतीचे मोठे काम होऊ शकेल.

गोबर गॅसचे महत्त्व खेडोपाडी अजून पटले नाही. कारण राजकारणाची सबसिडी तिथे अडथळे आणते. मात्र अत्यल्प किंमतीत बायोगॅस प्रकल्प गाव निर्माण करण्यासाठी राज्यातले अभियंते सरसावले आहेत. गरीब महिलांना मोफत गॅस पुरवठा करण्यापेक्षा सगळे गावच गॅस सिलेंडर मुक्त म्हणजे द्रव पेट्रोलियम वायुमुक्त करण्याचा संकल्प राज्यात सुरू आहे. अशी बलस्थाने ओळखण्याची जागरूकता असणे गोपालनात महत्त्वाचे आहे. गोमय म्हणजे शेण आणि गोमूत्र हीच उत्पन्न साधने असताना दूध, वासरे मिळविण्याचा पाठपुरावा गौण ठरतो. अशी विचारधारा समोर येत आहे. सेंद्रीय शेतीसाठी शेणखताचा वापर वाढत असून वर्षाकाठी गायीमागे पंचवीस ते सत्तावीस हजार एवढा फायदा राज्यात मिळतो आहे. गोमूत्र विक्री हा विषय आणखी तेवढीच रक्कम देत असताना सहज सांभाळलेली गाय परवडते. हा अनुभव मध्यम वर्गीय शेतकरी घेत आहेत. 

केंद्र शासनाने शेण आणि गोमुत्र याच विषयावर लक्ष केंद्रित करून या बाबी खरोखर उपयुक्त आहेत काय, यासाठी वैज्ञानिक प्रमाणीकरणाचा आराखडा संशोधनासाठी मांडला आहे. पंचगव्य किंवा त्यातील कोणत्याही घटकातून निर्माण होणारी उत्पादने आता विज्ञानातून तपासली जाणार असून भारतातील सर्व अग्रणी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय संस्था त्या दृष्टीने संशोधन करणार आहेत. 

विशेष बाब अशी की, शेण आणि गोमुत्राचाच विचार असणारी गाय सांभाळताना चारा पुरवणे महत्त्वाचे असते. खर्चिक पौष्टिक खुराकाची साथ दूध आणि प्रजननासाठी द्यावी लागत असल्याने तसा खर्चिक सांभाळ नेहमी टाळला जातो. बांधावर सहज चरणारी, ॲझोला क्षार मिश्रणांची नियमित उपलब्धता केली जाणारी गाय अल्प खर्चिक आणि बहुउपयोगी ठरते. शेती सुपीकतेसाठी शेणखत, कीटक नियंत्रणासाठी गोमुत्र यांचे शेतकऱ्यांना वापरासाठी आवाहन आता भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधिकृत संस्था करत असून शेण व गोमूत्र आधारित उत्पादनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बायोडायनामिक म्हणजे जैव गतिमान शेतीत विविध प्रकारची खते शेणखतापासून निर्माण करून वापरली जातात आणि सेंद्रीय शेतीचा प्रसार घडविला जातो. इंधनातून पर्यावरणाची गाय, अर्थाजनातून ग्रामविकासाची गाय आणि मानवी उपचारासाठी गोउत्पादने देणारी (कुटुंब) स्वास्थाची गाय आता दूध या एकाच घटकावर सहज पडताळता येणार नाही. मात्र प्रत्येक उपयोगिता वैज्ञानिक सिद्धांताने तपासली जाण्यासाठी पायाभूत कार्यासाठी म्हणजे संवर्धनासाठी, सांभाळासाठी ग्रामीण भागात जागृती आणि अभियानाची गरज आहे.

अभिनिवेश आणि अंधानुकरण विज्ञानाल मान्य नाही. म्हणून सिद्धता, प्रमाणीकरण या बाबींना साथ देण्याची गरज असते. अनुभव मांडताना विपर्यास होणार नाही आणि गोवंश राजकारणात अडकणार नाही याची दक्षता सर्वांनीच घेण्याची गरज आहे. कृतीतून सद्भावना गायींबाबत दाखविण्याचे इंधननिर्मिती, वीजनिर्मिती, उर्जानिर्मिती हे मार्ग देश विकासाला पूरक ठरू शकणार असल्याने त्यात सहभाग वाढून आपली गोभूमिका पार पाडणे अपेक्षित आहे. 

आंतरराष्ट्रीय ऊर्जा यंत्रणेच्या मते २०५० पर्यंत जैविक ऊर्जा निर्मितीतून जगातील वाहतुकीसाठीची इंधनक्षमता जैववायु आणि जैवघनातून २५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात दिसून येईल. डेन्मार्कच्या शासकीय संकेतस्थळावर ‘हरितऊर्जा’ असा शेणाचा उल्लेख असून कृषी क्षेत्रात खऱ्या अर्थाने शेणखताची क्षमता पडताळली गेली नसल्याचा उल्लेख आहे. ताज्या उदाहरणात समोर आलेल्या वृत्ताने खळबळ माजली आहे. गायीच्या शिंगात किरणोत्सर्ग शोषण्याची क्षमता तर शेणात अणुउर्जेस लागणाऱ्या प्लुटोनियमचा अंश असल्याचा दावा केरळात करण्यात आला आहे. गोमुत्रात सुवर्णकण असल्याचा दावा आज प्रत्येक भ्रमणध्वनीत फिरत आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या खुद्द न्यायमूर्तींनीच गायीचे विविध गुण वर्णन केल्यामुळे गाय हा चर्चेचा विषय ठरली आहे. येणाऱ्या गणेशोत्सवासाठी राज्यात शेणापासून बनलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध होणार आहेत. बुद्धीची देवता असणारा गणेश विज्ञानातून गाय शोधण्याची, जोपासण्याची, वीजस्त्रोत्र म्हणून गोवंशाचा नव्याने विचार करायला संधी मिळाल्यास गाय धर्मातीत मानून जगात स्वीकारली जाईल यात शंका नाही.

- ८२३७६८२१४१ (लेखक पशुवैद्यक महाविद्यालय परभणी येथे प्राध्यापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com