शासन कापूसप्रश्‍नी कधी गंभीर होणार?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 January 2018

खानदेश हा कापूस उत्पादनात आघाडीवर राहिलेला भाग आहे. या भागात पूर्वीपासून किंवा अगदी जेव्हा डिझेल इंजिन विहिरींवर कार्यरत होते, तेव्हापासून कापसाचे उत्पादन घेतले जात आहे. ब्रिटिशकालीन कापूस संशोधन केंद्र जळगाव व धुळे येथे आहे. धुळे व जळगाव हे कापूस उत्पादनात अग्रेसर राहिल्याने अगदी १८८० पासूनच्या काही जिनिंगही खानदेशात आहेत. जर्मन तंत्रज्ञानाच्या त्या जिनिंग असून, यामुळे जळगावात रेल्वेचे जाळे उभे राहिले. तसा खानदेश दुर्लक्षित भाग असला, तरी कापूस व आता केळीने खानदेशला जगभर पोचविले आहे. 

बागायती कापूस खानदेशात अगदी एप्रिलपासून लावायला सुरवात होते. शहादा, तळोदा, नंदुरबार, शिंदखेडा, चोपडा, शिरपूर, यावल, जळगाव, मुक्ताईनगर या भागांतील तापी काठावरील गावांमध्ये अनेक वर्षांपासून कापूस लागवड केली जाते. कापूस प्रमुख पीक असल्याने त्यावर संशोधन होत राहिले. देशी, एच ४, असे संशोधन झाले. नंतर २००४-०५ पासून बीटी कापूस वाण आले. त्याने कापसाची उत्पादकता वाढेल, असे सांगितले जात होते. फवारण्यावरचा खर्चही कमी होईल, असे बियाणे पुरवठादार कंपन्या म्हणायच्या. परंतु मागील दोन वर्षे बीटीचे उत्पादन कमी येत आहे. खानदेश हा कापूस पिकावर अवलंबून असलेला भाग असल्याने अर्थकारणही कोलमडले आहे. यंदा तर या पिकावर बोंड अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने त्याचा फटका सर्व शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. धुळ्यातील ७०, जळगावमधील ७० आणि नंदुरबारातील ६० टक्‍क्‍यांवर क्षेत्रावर कापूस पीक असते. आता कीड - रोगांचा एवढा फटका बसला, की हे पीक खर्चिक बनल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटू लागल्या आहेत. पुढील हंगामात कापसाची लागवड कमी होईल, असे दिसते. खानदेशात आठ लाख हेक्‍टरवर कापूस असतो, परंतु पुढे यातील निम्मे क्षेत्र कमी होईल की काय, अशी भीती आहे. कारण सर्व प्रकारच्या रोगांना प्रतिकारक्षम असे कापूस वाण बाजारात नसल्याचे चित्र तूर्ततरी आहे. तसेच शासनही काही करीत नाही. कापूस संशोधन संस्था, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, संस्था यांच्याकडून चांगल्या कापूस वाणासाठी काय प्रयत्न होत आहेत, हे अजूनही जगासमोर आलेले नाही. शासनाने भरपाईचे अमिष दाखविले आहे. किती व केव्हा भरपाई कापूस उत्पादकांना मिळेल, हे स्पष्ट होताना दिसत नाही. कापूस उत्पादक हवालदिल आहेत. याचा परिणाम देशाच्या उत्पादनावर नक्की होईल, असे म्हणता येईल.

...या असाव्यात उपाययोजना
    चांगले, रोगप्रतिकारक्षम कापूस बियाणे तंत्रज्ञान तातडीने आणावे.
    शेतकऱ्यांना लवकर नुुकसान भरपाई मिळावी.
    देशी कापूस वाणांबाबत चीनप्रमाणे संशोधन व्हावे.

- सुनील नामदेव पाटील, शेतकरी, विखरण, जि. जळगाव.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news government cotton issue