नगरमध्ये साडेदहा हजार क्विंटल हरभरा खरेदी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 April 2018

नगर - बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात सुरू झालेल्या दोन खरेदी केंद्रांवर दहा हजार ४५३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे. अन्य नऊ ठिकाणी खरेदी सुरू असून, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, असे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले. 

नगर - बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात सुरू झालेल्या दोन खरेदी केंद्रांवर दहा हजार ४५३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे. अन्य नऊ ठिकाणी खरेदी सुरू असून, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, असे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले. 

जिल्ह्यात सुमारे दीड लाख क्विंटल हरभरा खरेदी होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात कापसाचे पीक वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी काढून हरभरा पेरला गेला. त्यामुळे हरभऱ्याचे ८३ हजार ७९५ हेक्‍टर क्षेत्र असून, यंदा सरासरीपेक्षा जास्त म्हणजे ८५ हजार ४५३ हेक्‍टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली. हरभऱ्याची काढणी झालेली असल्याने बाजार समितीत दर दिवसाला ३०० ते ४०० क्विंटल हरभऱ्याची आवक होत आहे. मात्र, हमीभावाच्या तुलनेत बाजार समितीत १००० ते १२०० रुपये कमी दर मिळत आहे. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्र सुुरू करण्याची मागणी केली जात होती. 

जिल्हा मार्केटिंग कार्यालयाने शेतकऱ्यांच्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर चौदाही तालुक्‍यांतील बाजार समितीत हरभऱ्याची होणारी आवक, मिळणारा दर आणि लोकांची मागणी याबाबींचा विचार करून हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज असल्याबाबत नाफेडला पत्र देऊन कळवले होते.

जिल्हाभरात साधारण दीड लाख क्विंटल खरेदी अपेक्षित असल्याचे त्यात नमूद केले होते. मनुष्यबळ आणि शेतकऱ्यांची अडचण समजून घेत ज्या ठिकाणी तूर खरेदी सुरू आहे, तेथेच हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचे निश्‍चित करू जिल्हाभरातील अकरा ठिकाणी हरभरा खरेदी केंद्रे सुरू करण्याला परवानगी मिळाली. विक्रीसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन नोंदणीही करून घेतली. सध्या श्रीगोंदा व जामखेड येथे खरेदी सुरू आहे. श्रीगोंद्यात १८२ शेतकऱ्यांनी १५७२ क्विटल व जामखेडला ७६३ शेतकऱ्यांनी ८८८१ क्विंटल अशी १० हजार ४५३ क्विंटल खरेदी झाली, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी भारत पाटील यांनी सांगितले. 

जास्तीत जास्त हरभरा खरेदीचे नियोजन
श्रीरामपूर, राहाता, कर्जत, पाथर्डी, नगर, श्रीगोंदा, नेवासा, कोपरगाव, मिरजगाव या ठिकाणीही हरभरा खरेदी नुकतीच सुरू झाली आहे. मात्र तेथे किती खरेदी झाली आहे याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. शेतकऱ्यांच्या हरभरा विक्रीच्या अडचणी समजून घेत नाफेडची खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. जास्तीत जास्त हरभरा खरेदी करण्याचे नियोजन आहे, असे मार्केटिंग फेडरेशनतर्फे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news gram purchasing