हंगामाआधीच विदर्भात पोचले ‘एचटी’ बियाणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

चंद्रपूर - तेलंगणा सीमेलगत असलेल्या कोरपना तालुक्‍यातील आरण खुर्द गावात कृषी विभागाच्या छापेमारीत २४५ ‘एचटी’ बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे ‘ॲग्रोवन’ने या आधीच विदर्भात दीड लाख ‘एचटी’ बियाणे पाकिटे पोचल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या कारवाईमुळे या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. 

चंद्रपूर - तेलंगणा सीमेलगत असलेल्या कोरपना तालुक्‍यातील आरण खुर्द गावात कृषी विभागाच्या छापेमारीत २४५ ‘एचटी’ बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे ‘ॲग्रोवन’ने या आधीच विदर्भात दीड लाख ‘एचटी’ बियाणे पाकिटे पोचल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या कारवाईमुळे या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. 

गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यात ‘एचटी’ सीडचे अनधिकृत बीजोत्पादन केले जात असल्याचे गुणनियंत्रण विभागाकडून सांगितले जाते. या बियाण्यांचा पुरवठा नंतर महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यातून राज्यभर होतो, अशीही माहिती आहे. गेल्यावर्षी वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बियाणे पोचले होते. कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर याचा खुलासा झाला. 

यावर्षी कापसाचा हंगाम सुरू होण्याला दोन महिने शिल्लक असले तरी काही बियाणे कंपन्यांच्या फिल्ड असिस्टंटच्या माध्यमातून सुमारे दीड लाखावर ‘एचटी’  बियाण्यांची पाकिटे पोचल्याचा दावा विक्रेता संघटनांकडून करण्यात आला आहे. मात्र कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाने हा दावा फेटाळला. हंगाम सुरू होण्याला विलंब असल्याने बियाणे जवळ ठेवण्याची जोखीम कोणी का व कशाकरिता घेईल, असे गुणनियंत्रण विभागाच्या सूत्रांचे म्हणणे होते.

२० मार्च रोजी या संदर्भाने ‘ॲग्रोवन’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. मात्र चंद्रपूरमधील या कारवाईने गुणनियंत्रण विभागाच्या नाकावर टिच्चून एच. टी. सीडचा पुरवठा होत असल्याचे सिद्ध झाले आहे. 

एकावर गुन्हा दाखल
कोरपना तालुक्‍यातील आरण खुर्द या गावात ‘एचटी’ बियाणे पाकीट असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यानुसार अंकुश शांताराम पायघन याच्या घरी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत ‘एचटी’ बियाण्यांची सुमारे २४५ पाकिटे जप्त केली गेली. या पाकिटांवर ‘पवनी सीडस’ तसेच बीटी-२ हायब्रीड कॉटन असे नमूद आहे. ९३० रुपये किंमतही त्यावर नमूद असून कंपनीचा पत्ता, लॉट नंबर व इतर माहिती मात्र नाही, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी अंकुश पायघन विरोधात गडचांदूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

किशोर तिवारी यांनी धरले धारेवर
‘अॅग्रोवन’मध्ये २० मार्च रोजी प्रकाशित वृत्ताची दखल घेत शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी अमरावती विभागीय गुणवत्ता नियंत्रण विभागाला ‘एचटी’ सीड प्रकरणी धारेवर धरल्याचे वृत्त आहे. यवतमाळ जिल्ह्यात या संदर्भाने तपासणी करण्याच्या सूचना तिवारी यांनी गुणनियंत्रण विभागाला दिल्या होत्या. त्यानंतर काही ठिकाणचा कानोसादेखील घेण्यात आला. परंतु, या कारवाईत काहीच हाती लागले नसल्याची माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news HT Seed