उत्पन्नाचे स्रोत वाढवणारी एकात्मिक, आधुनिक शेती

शेडनेटमध्ये आधुनिक तंत्राने पिकवलेली ढोबळी मिरची दाखविताना अंकुश पाटील.
शेडनेटमध्ये आधुनिक तंत्राने पिकवलेली ढोबळी मिरची दाखविताना अंकुश पाटील.

धुळे जिल्ह्यातील घोडसगाव (ता. शिरपूर) येथील पाटील बंधूंनी विविध फळपिके, त्यास पोल्ट्रीच्या करार शेतीची जोड व अलीकडेच शेडनेट तंत्राचा वापर, असे शेतीत वैविध्य ठेवले आहे. उच्चशिक्षित आणि एकत्रित कुटुंबपद्धती हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढवत ठेवले तर शेती फायद्यात राहू शकते, हेच त्यांच्याकडून शिकण्यास मिळते.

घोडसगाव (ता. शिरपूर, जि. धुळे) हे सुमारे अडीच हजार लोकसंख्येचे गाव अनेर नदीकाठी वसले आहे. गावाची शेती काळी कसदार, मुबलक जलसाठे असलेली आहे. गावाकडे जातानाच केळीच्या बागा व उसाची मोठी शेती नजरेस पडते. पूर्वहंगामी कापसाचे पीक घेणारे चांगले शेतकरीही या भागात आहेत. 

तिघा पाटील बंधूंची शेती  
घोडसगावातील तिघा पाटील बंधूंची सुमारे ३० एकर शेती आहे. यातील मनमोहन कला शाखेतील, अंकुश विज्ञान शाखेतील पदवीधारक आहेत. ते पूर्णवेळ शेती पाहतात. कुणाल यांनी ‘आयटीआय’चे शिक्षण घेतले आहे. ते बोराडी (ता. शिरपूर) येथे संस्थेत तंत्रज्ञ आहेत. दररोज सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर नोकरीसाठी जावे लागत असले, तरी रोजची सकाळची शेतातील फेरी ते चुकवत नाहीत. सर्वजण मिळून शेतीसंबंधीचे सर्व निर्णय घेतात.  
 
वडिलांनी सोडली शेतीसाठी नोकरी
पाटील बंधूंचे वडील प्रताप चिंतामण पाटील मुंबई येथील कंपनीमधील नोकरी सोडून १९८२ मध्ये शेती करण्यासाठीच घरी परतले. तीन भावांची संयुक्त ८० एकर शेती होती. ती प्रताप कसायचे. जुन्या विहिरी सिंचनासाठी होत्या. केळी व उसाचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन ते घ्यायचे. प्रताप यांचे बंधू गुलाब मुंबईत प्राध्यापक, बंधू मुरलीधर खत कंपनीत तर तिसरे बंधू रामरतन अन्न व नागरी पुरवठा विभागात कार्यरत होते. अर्थातच त्यांचे उच्चशिक्षित कुटुंब आहे. शेतीशी त्यांनी आपली नाळ मात्र कायम जपली आहे. विभागणीनंतर प्रताप यांच्या वाट्याला ३० एकर शेती आली. त्यासाठी दोन कूपनलिका आहेत.

केळी  
 केळीची पारंपरिक शेती बदलून उतिसंवर्धित रोपे व सूक्ष्म सिंचनाचा अवलंब
 मागील ८-१० वर्षांपासून या पिकातील अनुभव. कांदेबहर घेतात. एकरी ७५ हजारांपर्यंत खर्च.
 प्रत्येक झाडाच्या घडाची रास २४ किलोपर्यंत भरते. 

ऊस
 १० एकर क्षेत्र आहे. त्याचे एकरी ४५ ते ५० टन उत्पादन मिळते. 
  
पपई 
पपईची मल्चिंग पद्धतीने दरवर्षी फेब्रुवारीत लागवड असते. पपईचे रोप चांगले ‘सेट’ झाल्यावर फेब्रुवारीत त्यात कलिंगडाचे आंतरपीक घेतले जाते. त्यातून मुख्य पिकाचा सुमारे ५० टक्के खर्च कमी होतो. 

पोल्ट्री  
पाच वर्षांपूर्वी नामथे शिवारात शेतातच एका बाजूला पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. दीड एकरांत शेड व मजुरांची निवासस्थाने आहेत. नियमित व हमीचा पैसा मिळावा हा विचार या व्यवसायामागे होता. सुमारे पाच हजार पक्ष्यांचे संगोपन केले जाते. शेड उभारणीसाठी दहा लाख रुपये खर्च आला. हैदराबाद येथील एका कंपनीसोबत ब्रॉयलर पक्ष्यांच्या संगोपनाचा करार केला आहे.

पक्षी, खाद्य व उपचारसेवा कंपनी पुरवते. सुमारे ४० दिवस संगोपन करून पक्षी कंपनीला दिला जातो. एक कर्मचारी पोल्ट्रीसाठी नियुक्त केला असून, तो वर्षभर संगोपन व सफाईची जबाबदारी पार पाडतो. पोल्ट्रीमध्ये दर दीड महिन्यानी उत्पन्न येते. नफ्याचे प्रमाण हिवाळ्यात अधिक तर त्यानंतर ते पावसाळ्यात मिळते. उन्हाळ्यात तुलनेने नफा कमी मिळतो. पाच रुपये प्रतिकिलो या दराने पक्ष्यांची विक्री केली जाते.

सुधारित शेतीचा अवलंब 
 पूर्वी पाटील बंधूंची शेती पारंपरिक होती. पट पद्धतीने सिंचन, केळीसाठी कंदांची लागवड होती. नगदी पिकांचा पैसा वर्षभरानंतर मिळायचा. मग पुढचे नियोजन व्हायचे. अशात नवे तंत्रज्ञान, संकल्पना राबवायला उशीर व्हायचा. 
 सुधारित तंत्राचा अवलंब करताना या बंधूंना नाशिक येथील आपल्या अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानुसार बदल करण्यास व नवे तंत्रज्ञान वापरण्यास सुरवात केली. 

शेडनेट तंत्राचा वापर 
 सुमारे ९० गुंठ्यांत दोन वर्षांपूर्वी शेडनेटमध्ये ढोबळी मिरची
 शेड उभारण्यासाठी मोठी जोखीम उचलून बॅंकेकडून कर्ज घेतले. त्यासाठी किमान ४० लाख रुपये खर्च आला. त्यास शासनाकडून अनुदान अद्याप मिळायचे आहे. शेडनेटमध्ये १० मजूर वर्षभर काम करतात.
 मागील वर्षीच प्रथम खरिपात प्रयोग केला. मध्य प्रदेशातील इंदूर, उज्जैन, गुजरातमधील सुरत तसेच मुंबईच्या व्यापाऱ्यांनी विक्री केली. हिवाळ्यात ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो सरासरी दर मिळाला. तर किमान २० तर कमाल ७० रुपये दर राहिला. 
 लागवड बेडवर. बेडची उंची दीड फूट. दोन बेडमधील अंतर पाच फूट. एका बेडवर दोन ओळी असून, प्रत्येकी सव्वा फूट अंतरावर लागवड. दोन लॅटरल्स सिंचनासाठी.
- मल्चिंगचा वापर. 

व्यवस्थापनातील वैशिष्ट्ये 
  जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी एकरी चार ट्रॉली कोंबडीखत व शेणखताचा वापर 
 शेडनेट व पोल्ट्रीसाठी विजेची स्वतंत्र व्यवस्था सिंगल फेज यंत्रणेच्या माध्यमातून केली. पक्ष्यांचे संगोपन व शेडनेटमधील कामांसाठी ही वीज उपयोगी पडते. शेडनेटमधील कमी अश्‍वशक्तीचे पंपही सिंगल फेजवर चालविले जातात. 
 आगामी काळात पाच हजार पक्ष्यांचे आणखी एक शेड, वीस म्हशींचा गोठा व शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करायचा मानस आहे.
 दररोज पैसे मिळाले पाहिजेत व कमी क्षेत्रात चांगले उत्पन्न मिळावे या विचाराने शेतीचे नियोजन 
- अंकुश पाटील, ९४२१६१६९८८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com