दुभत्या जनावरांचे दरही चाळीस टक्‍क्‍यांनी खाली

सूर्यकांत नेटके
सोमवार, 7 मे 2018

नगर - सहा महिन्यांपासून दुधाला दर नसल्याचे गंभीर परिणाम दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवरही झाले आहेत. दूध व्यवसायाला सातत्याने प्राधान्य दिलेल्या नगर जिल्ह्यामधील नावाजलेल्या जनावरांच्या बाजारात दुभत्या जनावरांचे दर तीस ते चाळीस टक्‍क्‍यांनी खाली आले आहेत. याशिवाय मागील आठ महिन्यांपूर्वीच्या आणि आताच्या खरेदी-विक्रीतही मोठी तफावत आहे. बाजारात दुभती जनावरे विक्री करतानाची शेतकऱ्यांची उलघालही त्रस्त करणारी आहे.

नगर - सहा महिन्यांपासून दुधाला दर नसल्याचे गंभीर परिणाम दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवरही झाले आहेत. दूध व्यवसायाला सातत्याने प्राधान्य दिलेल्या नगर जिल्ह्यामधील नावाजलेल्या जनावरांच्या बाजारात दुभत्या जनावरांचे दर तीस ते चाळीस टक्‍क्‍यांनी खाली आले आहेत. याशिवाय मागील आठ महिन्यांपूर्वीच्या आणि आताच्या खरेदी-विक्रीतही मोठी तफावत आहे. बाजारात दुभती जनावरे विक्री करतानाची शेतकऱ्यांची उलघालही त्रस्त करणारी आहे.

राज्यात आठ महिन्यांपासून दुधाला दर नाही. दरवाढ होईल या आशेने शेतकरी तोट्यातला व्यवसाय सुरू ठेवत जनावरे संभाळली जात आहेत. मात्र आठ महिन्यानंतरही शासन दुधाला दर देत नाही. सध्या प्रति लिटरमागे दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्यामुळे राज्यात पाच दिवसांपासून मोफत दूधवाटप करून सरकारच्या भूमिकेचा निषेध केला जात आहे.

दुधाला दर नसल्याने शेतकरी त्रस्त आहेतच; पण दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवरही गंभीर परिणाम झाला आहे. नगर जिल्ह्यामध्ये लोणी (ता. राहाता) काष्टी (ता. श्रीगोंदे), घोडेगाव (ता. नेवासा) पाथर्डी, शेवगाव येथे जनावरांचे बाजार भरतात. या बाजारात दुभत्या गाई, म्हशींची मोठ्या प्रमाणात विक्री होते. काष्टी, घोडेगाव येथून तर मराठवाडा, पुणे, सोलापूर भागांतील शेतकरी जनावरांची खरेदी- विक्री करतात. आठ महिन्यांपासून दर नसल्याने दुभत्या जनावरांचे दर तीस ते चाळीस टक्‍क्‍यांनी खाली आले आहेत. बाजारातील आवक कमी झाली आहे. दर कमी मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत, असे बाजार समितीमधील राजू चौधरी यांनी सांगितले. दुभत्या जनावरांनाच दर नाहीत, भाकड जनावरांना कोण घेणार, सध्या भाकड जनावरे वाटेल त्या किमतीत विकावी लागत असल्याचे विक्री घोडेगाव येथील दिलीप सोनवणे यांनी सांगितले.

शेतकरी, व्यापारी म्हणतात....
‘दुभत्या गाईंचा मी खरेदी- विक्रीचा व्यवसाय करतो. दुधाला दर नसल्याने खरेदी-विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. दर मिळत नसल्याने काही प्रमाणात तोटा सोसावा लागतो.’’
- शेख सादीक रज्जाक, व्यापारी, कोरडगाव (ता. शेवगाव)

‘‘दुधाला दर नसल्याचा सगळ्याच बाबत परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना परवडत नसेल तर शेतकरी तरी काय करणार. बाजारात आवक कमी होत आहे. लोक परवडत नसेल तर खरेदी कशाला करतील?’’
- पिंटू गायकवाड, व्यापारी, घोडेगाव (ता. नेवासा)

दुभत्या गाईंची बाजारातील स्थिती
(आठ महिन्यांपूर्वी (१) आणि आताची (२))

काष्टी (ता. श्रीगोंदा)
(१) आवक ५०००, खरेदी विक्री - ३००० , दर - ७० ते ९० हजार
(२) आवक - २०००, खरेदी-विक्री - १०००, दर - ३० ते चाळीस हजार

घोडेगाव (ता. शेवगाव)
(१) आवक - ३००, खरेदी विक्री - १५० , दर - ६० ते ९० हजार
(२) आवक - १५०, खरेदी-विक्री - ७०-८० दर - ३५ ते ५० हजार

शेवगाव
(१) आवक १०० ते १३०, खरेदी विक्री - ७०-८० , दर - ५० ते ८० हजार
(२) आवक - ३० ते ४०, खरेदी-विक्री - २०-१५, दर - ३० ते चाळीस हजार

पाथर्डी
(१) आवक - २५ ते ३५, खरेदी विक्री - १५ , दर - ६० ते ८० हजार
(२) आवक - ५-१०, खरेदी-विक्री - ५, दर - ३५ ते ४५ हजार

लोणी (ता. राहाता)
(१) आवक ९४४, खरेदी विक्री - ३५९ , दर - १८ ते १ लाख ३५ हजार
(२) आवक - ९५५, खरेदी-विक्री - २२० दर - २० ते ८० हजार

दुधाच्या धंद्याला लोक प्राधान्य देतात. जनावरे दावणीला दिसली तरी समाधान मिळते. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून दर मिळत नसेल तर काय करणार, बाजारात दुभती गाय विकायला आणली तरी ग्राहक नाही. घेतल्या दरापेक्षा कमी दरात नाईलाने विकावी लागते.
- नारायण चौधरी, शेतकरी, घोडेगाव (ता. नेवासा)

मी अनेक दिवसांपासून दूध व्यवसाय करतो. यंदासारखी परिस्थिती कधी झाली नव्हती. जनावरे विकायची वेळ आलीय, पण जनावरांनाही बाजारात दर मिळत नाही. मागील काही महिन्यांचा विचार करता तीस ते चाळीस टक्‍के कमी दराने विकावी लागत आहेत.
- भारत गारुडकर, शेतकरी, तिसगाव (ता. पाथर्डी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news milk animal rate decrease