डाळिंबात घसरण, द्राक्षात तेजीचे संकेत

मनोज कापडे
Monday, 4 December 2017

डाबाचे दर उतरल्यामुळे सांगोला आणि नाशिक या दोन्ही पट्ट्यांतील शेतकरी अडचणीत आले आहेत. उत्तरेतील राज्यांतून घटलेली मागणी आणि निर्यातीसाठी मंदावलेली खरेदी यामुळे डाळिंबाच्या दरावर दबाव आहे. डाळिंबाच्या तुलनेत द्राक्ष बाजाराची स्थिती चांगली आहे. निर्यातक्षम व स्थानिक बाजारपेठेतील द्राक्षांचे दर चढे राहतील, असा अंदाज आहे. 

डाबाचे दर उतरल्यामुळे सांगोला आणि नाशिक या दोन्ही पट्ट्यांतील शेतकरी अडचणीत आले आहेत. उत्तरेतील राज्यांतून घटलेली मागणी आणि निर्यातीसाठी मंदावलेली खरेदी यामुळे डाळिंबाच्या दरावर दबाव आहे. डाळिंबाच्या तुलनेत द्राक्ष बाजाराची स्थिती चांगली आहे. निर्यातक्षम व स्थानिक बाजारपेठेतील द्राक्षांचे दर चढे राहतील, असा अंदाज आहे. 

डाळिंब उत्पादक चिंतेत
राज्यातील डाळिंब बागांमधून पुरवठा वाढलेला असताना बाजारात मात्र दर उतरलेले आहेत. सांगोला आणि नाशिक या प्रमुख बाजारपेठांत भाव गडगडल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. उत्तरेत थंडी आणि दक्षिणेत वादळ असल्यामुळे स्थानिक (लोकल) मालाची मागणी घटली आहे. परिणामी पुढील काही दिवस बाजार मंदीत राहण्याची शक्यता आहे. 

सांगोला मार्केटला डाळिंबाचे दर प्रति किलो ६०-६५ रुपयांवरून सध्या ३५-४० रुपयांवर आले आहेत. सांगोल्यात सध्या रोज दोन हजार जाळ्यांची आवक होत अाहे. मुंबईतून निर्यातदारांची मागणी नसल्यामुळे बाजारभावात सुधारणा होण्याची शक्यता कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दोन आठवडयापूर्वी मुंबईतील व्यपारी दुबईसाठी सांगोल्यातून ८० ते १०० रुपये किलोने मालाची खरेदी करीत होते. मात्र आता स्थिती बदलली आहे. २०० ग्रॅमपेक्षा जादा वजन असलेल्या 'दुबई एक्सपोर्ट ' मालालादेखील आता ६०-६५ रुपये भाव दिला जातोय. त्याचा परिणाम स्थानिक मालाच्या भावपातळीवर झाला आहे. 

`दक्षिण भारतात वादळ आल्यामुळे लोकल मालाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे सांगोला बाजारात पुढील काही दिवस तेजी येण्याची शक्यता नाही,`` असे डाळिंब व्यापारी सोमनाथ शिंदे यांनी सांगितले. 

नाशिक मार्केटलादेखील डाळिंबाचे बाजार पडले आहेत. प्रतिकिलो ८५ रुपयांवरून दर ६०-६५ रुपयांवर उतरले आहेत. त्यामुळे मालेगाव, सटाणा भागातील शेतकरी अडचणीत आले आहेत. प्रतिकूल हवामानावर मात करीत चांगला माल तयार केलेल्या बागांमधून नाशिक मार्केटला रोज १२-१३ हजार क्रेट डाळिंबाची आवक होत आहे. ही आवक आणखी वाढेल; परंतु उत्तर भारतात थंडी असल्यामुळे जानेवारीपर्यंत तरी भावपातळीत फारशी सुधारणा होणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

उत्तरेतील प्रमुख राज्यांमध्ये डाळिंबाचे भाव उतरले आहेत. ज्यूससाठी होणारी खरेदीदेखील मंदावली आहे. निर्यातदारांकडून चांगल्या मालासाठी विचारणा होताना दिसत नाही. अशा स्थिती गुजरातमधील नवीन आवक सुरू झाल्यास महाराष्ट्राच्या डाळिंबासमोरील अडचणी आणखी वाढतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

द्राक्षात तेजीची अपेक्षा
देशातील द्राक्षाच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये यंदा गेल्या हंगामाच्या तुलनेत आवक कमी राहण्याची शक्यता आहे. प्रतिकूल हवामानामुळे चांगल्या मालाचा पुरवठा घटणार आहे. परिणामी यंदा निर्यातक्षम मालाला पहिल्याच टप्प्यात गेल्या हंगामाप्रमाणेच प्रतिकिलो १०० रुपयांच्या पुढे भाव राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

`आमच्या आधीच्या अंदाजाप्रमाणे उत्पादनात यंदा २५-३० टक्के घट अपेक्षित होती. मात्र, बागांची एकूण स्थिती बघता काही भागातील माल ३०-४० टक्क्यांनी कमी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाव तेजीत राहतील. तेजी नसेल तर द्राक्ष उत्पादकांची मोठी हानी होईल. त्यामुळे कमी दरात माल विकणे यंदा परवडणारच नाही,`` अशी माहिती द्राक्ष बागायतदार संघांच्या सूत्रांनी दिली.

वाईन व्हरायटीच्या बागांची स्थिती टेबल व्हरायटीच्या तुलनेत नेहमी चांगली असते. परंतु, यंदा वाईन व्हरायटीच्या बागांमध्ये उत्पादन कमी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. टेबल व्हरायटीच्या मालाची यंदा मोठी टंचाई जाणवेल. त्यामुळेच पहिल्या टप्प्यात भावपातळी ११०-१२० रुपये प्रतिकिलो मिळतील. अर्थात थंडीच्या लाटेचे कितपत परिणाम होतो, हे पुढील काही दिवसात दिसून येईल.

सटाणा भागातील अर्ली बागांमधील काढणी वेगात सुरू आहे. व्हाईटसाठी लोकल मालाला ५० ते ७० रुपये, एक्सपोर्टच्या मालाला ७० ते ९० रुपये आणि दिल्ली मार्केटला ११०-१२० रुपये दर मिळत आहे. ब्लॅक व्हरायटीला सध्या १३० ते १६० रुपये प्रतिकिलो भाव मिळतो आहे. अर्ली बागांमधील तेज भावाचा हा ट्रेंड पुढील घडामोडींसाठी उपयुक्त राहील. निर्यातदारांच्या हाती चांगल्या ऑर्डर राहिल्यास यंदा एक्सपोर्टचे माल तेजीत खरेदी केले जातील. त्याचा प्रभाव आपोआप लोकल मालाच्या खरेदीवर राहील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news pomegranate & grapes rate