...अाणि डाळिंबाला बांधावरच मिळाला १०० रुपयांचा भाव

ज्ञानेश्र्वर रायते
बुधवार, 6 डिसेंबर 2017

बारामती, जि. पुणे - शेती आणि समस्यांचे नाते कधीच तुटले नाही, पण म्हणून काही शेतकरी कधी झुकला नाही. २०१४ मध्ये लावलेल्या डाळिंबाच्या रोपांनी गारपिटीत मान टाकली, त्यांची सालही निघाली.. पण शेतकऱ्याची जिद्द अशी, की त्याने या डाळिंबाला ऊर्जा दिली, जगण्याची जिद्द पुरवली...आणि आज महाराष्ट्रात सगळीकडे ३० ते ४० रुपये किलोने डाळिंब खरेदी केले जात असताना काटेवाडीत मात्र उत्पादकाला बांधावरच १०० रुपयांचा भाव मिळाला..!

संकटांना पुरून उरण्याची जिद्द असेल तर शेती कधीच तोट्यात जात नाही असा धडाच जणू प्रतापराव काटे व त्यांच्या अजिंक्य व प्रमोद या मुलांनी दिला अाहे. अटारीचे संचालक डॉ. लाखनसिंग, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. एन. पी. सिंग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनीही या शेतकऱ्याच्या जिद्दीला सलाम केला. 
अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी खास आग्रह करून या वरिष्ठ अधिकाऱ्यांना काटे यांच्या बागेची भेट घडवून आणली, तेव्हा ही बाग व त्या बागेतील सर्वच लाल चुटूक डाळिंबांनी, त्याच्या भव्यदिव्य आकाराने अधिकाऱ्यांना अचंबित केले. डॉ. एन. पी. सिंग यांनी तर ‘खूब बढिया, अरे यार, ये भगवा है? मुझे तो ये सुपर भगवा लगा’, अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्याचे कौतुक केले. 

९ मार्च २०१४ रोजीच्या गारपिटीत काटे यांच्या याच बागेचे नुकसान झाले. लावलेली रोपे मोडून पडली. मात्र त्याचा रि-कट घेऊन काटे यांनी पुन्हा याच झाडांवर प्रयोग केले. आज ही बाग एवढी तजेलदार आहे की, व्यापाऱ्याने बांधावर येऊन तुटलेले, फुटलेले डाळिंब वगळता इतर सर्व डाळिंबे जैसे थे स्थितीत खरेदी करण्याचे व त्याला तीन आकडी म्हणजे १०० रुपये किलोपेक्षा अधिक दर देण्याचे जाहीर करून डाळिंब खरेदी केले.

राजेंद्र पवार यांनी या वेळी अधिकाऱ्यांशी बोलताना जर शेतकऱ्याने इच्छाशक्ती ठेवली, प्रयोग केले, तर शेती वाजवी उत्पन्नाची करता येऊ शकते हे प्रतापराव काटे यांनी दाखवून दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news pomegranate rate 100 rupees