ऊस गाळप घटले; उताराही कमी

ऊस गाळप घटले; उताराही कमी

संकेश्‍वर, कर्नाटक : बेळगाव जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी २०१७-१८ च्या गळीत हंगामात ४ डिसेंबरपर्यंत ४१ लाख ७९ हजार ६९७ टन ऊस गाळप केले आहे. त्यापासून सरासरी ९.६० उताऱ्यासह ४० लाख ११ हजार ८५८ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. यंदा जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक कारखान्यांचा उतारा सरासरी दहा टक्‍क्‍यापेक्षा कमी असून संभाव्य ऊस टंचाईमुळे साखर उद्योगावर चिंतेचे सावट आहे. 

जिल्ह्यात एकूण २४ साखर कारखाने आहेत. उदपुडीतील (ता. रामदुर्ग) शिवसागर ॲग्रो कारखाना ऊस दराच्या वादामुळे गतवर्षापासून बंद आहे. तर जैनापूरमधील (ता. चिक्‍कोडी) ओम शुगर्स अद्याप गळीत हंगामाच्या प्रतीक्षेत आहे. उर्वरीत ७ सहकारी व १५ खासगी कारखान्यांचा हंगाम संथपणे सुरु आहे. गेल्या काही वर्षात बहुतेक कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवली आहे. मात्र, उसाचे क्षेत्र व एकरी उत्पादन घटले आहे. परिणामी गत दोन हंगामापासून सर्व कारखान्यांना ऊस टंचाई जाणवत आहे. यंदाही ही टंचाई भासत असून बहुतेक कारखान्यांमध्ये क्षमतेनुसार ऊस गाळप होताना दिसत नाही. त्याशिवाय बीड, जालना, यवतमाळ आदी जिल्ह्यातून येणाऱ्या तोडणी टोळ्यांनी या भागाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे, ऊस तोडणी मजुरांअभावी अपेक्षित ऊस पुरवठा होताना दिसत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत यंदाच्या ऊस हंगाम सुरू आहे. 

यंदा ४ डिसेंबरपर्यंतच्या गळीत हंगामानुसार खासगी क्षेत्रात उगार शुगर्सने ५ लाख ३४ हजार ४३० टन गाळप व ५ लाख २२ हजार १०० क्विंटल साखरेचे उत्पादन अग्रस्थान पटकावले आहे. सहकार क्षेत्रात संकेश्‍वरच्या हिरण्यकेशी कारखाना ३ लाख ४३ हजार ३६१ टन गाळप व २ लाख २३ हजार २०० क्विंटल साखर उत्पादन करुन पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान, केंद्राच्या साखर उद्योग कायद्यानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चौदा दिवसांच्या मुदतीत एफआरपीनुसार उसाचे बिल देणे बंधनकारक आहे. पण, अद्याप बेळगाव जिल्ह्यातील कारखान्यांकडून पहिली उचल शेतकऱ्यांना मिळालेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com