esakal | उसाच्या रसवंतीनेच जीवनात आणली मधुरता
sakal

बोलून बातमी शोधा

Sugarcane-Juice

उसाच्या रसवंतीनेच जीवनात आणली मधुरता

sakal_logo
By
गोपाल हागे

कंत्राटी पद्धतीने लागलेली नोकरी सोडून एका उच्चशिक्षित युवकाने शेतीतच अापले करिअर शोधले. शेती केवळ तीन एकर. मात्र रसवंती व्यवसायाच्या माध्यमातून थेट ग्राहक मिळवत ऊसशेती यशस्वी केली. त्यातून आपल्या कुटुंबाला मोठा आर्थिक आधार दिला आहे. आता दहा गुंठ्यातील शेडनेट शेती व त्यात काकडीच्या प्रयोगाकडे वळत शेतीतील उमेद व जिद्द कायम ठेवली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात मालेगाव-मेहकर मार्गावर डोणगावजवळ नागापूर शिवारात महामार्गाला लागून ऊस रसवंती पाहायला मिळते. या रसवंती शेजारीच उसाची लागवड, त्याच्या काही अंतरावर शेडनेट अशी शेती बघायला मिळते. रसवंतीत तरुण शेतकरी व त्याची पत्नी ग्राहकांच्या सेवेत सतत व्यस्त असलेले दिसून येतात. हे धाबे दांपत्य अाहे. नागापूर (ता. मेहकर) येथील सुभाष धाबे यांच्या वाट्याला वडिलोपार्जित तीन एकर शेती अाली. गेल्या चार-पाच वर्षांपासून या शेतीची संपूर्ण सूत्रे त्यांनी हाती  घेतली. खरे तर एमए बीएडपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. त्यांनी नोकरीचे अनेक प्रयत्न केले. मात्र प्राप्त परिस्थितीत २००६-०७ च्या दरम्यान तहसील कार्यालयात अंशकालीन कर्मचारी म्हणून त्यांनी नोकरी स्वीकारली. मात्र नोकरीत मन रमत नव्हते. घरच्या शेतीतच काहीतरी केले पाहिजे या भावनेने पारंपारिक पिकांसोबतच वेगळी पिके घेण्याचे नियोजन सुरू केले. 

रसवंतीचा व्यवसाय
     आपली शेती महामार्गालगत असल्याची संधी धाबे यांनी शोधली. त्यादृष्टीने रसवंतीसारखा व्यवसाय चांगले उत्पन्न देऊ शकतो, असे त्यांना वाटले. 
     त्याविषयी माहिती घेतली. सन २०१३ पासून त्यात पाऊल टाकले. उसाची अर्धा एकरात लागवड होती. लावण व खोडवा असा ताजा ऊस रसासाठी उपलब्ध केला जातो. 
     हा व्यवसाय साधारणतः जानेवारी ते मे व काही प्रसंगी जूनपर्यंत उत्पन्न देत राहतो. 
     चार वर्षांपासून व्यवसायात सातत्य ठेवले आहे. 
     महामार्ग असल्याने ग्राहकांची सतत ये-जा सुरू असते. त्यातही उन्हाचा तडाखा प्रचंड असल्याने दिवसभरात किमान १५० ते २०० ग्राहक ताज्या रसाचा आस्वाद घेऊनच पुढे जातात.  
     दिवसाला त्यातून सरासरी १५०० ते २००० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.                
     दररोज ऊस तोडायचा अाणि तो रसवंतीसाठी अाणायचा असा नित्यक्रम अाहे. ग्राहकांना शुद्ध, स्वच्छ रस देण्यावरच अधिक भर दिला जातो. त्यासाठी स्वच्छतेचे नियम पाळण्यावर भर असतो.  

फायदेशीर व्यवसाय 
रसवंती व्यवसाय सुमारे पाच महिन्यांच्या काळात सुमारे दीड, दोन ते अगदी अडीच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न देऊन जातो. अर्धा एकरात उसाचे २० ते २२ टन उत्पादन मिळते. कारखान्याला हा ऊस दिला असता, तर साधारण ५० हजार रुपयांपर्यंतच उत्पन्न हाती पडले असते. रसवंतीच्या माध्यमातून मात्र त्याचे मूल्यवर्धन झाल्याचे धाबे म्हणतात.   
  
पुरस्कारापेक्षा कामाला महत्त्व 
धाबे कायम शेतीत व्यस्त असतात. रसवंतीचा हंगामी व्यवसाय संपल्यानंतर खरिपात सोयाबीन, तूर आदी पिकांकडे ते वळतात. रब्बीत मग हरभऱ्याची तयारी असते. सोयाबीनचे एकरी अाठ ते नऊ क्विंटल तर  हरभऱ्याचे १२ ते १३ क्विंटल उत्पादन ते घेतात. यंदा शासनाच्या वतीने किसान कल्याण कार्यक्रम सर्वत्र झाला. मेहकरमध्ये अायोजित कार्यक्रमात तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात अाला. यासाठी धाबे यांनाही निमंत्रित करण्यात अाले होते. परंतु अापण सोहळ्याला गेलो तर दिवसभर रसवंती बंद राहील अाणि पर्यायाने अापलेच नुकसान होईल, असे त्यांना वाटले. यामुळे त्यांनी दिवसभर रसवंती चालवित ग्राहकसेवेलाच अधिक प्राधान्य दिले. 

शेडनेट शेतीत टाकले पाऊल 
मेहकर, लोणार तालुक्यातील शेतकरी शेडनेट किंवा संरक्षित शेतीकडे वळत अाहेत. धाबे यांनीदेखील या वर्षी १० गुंठ्यांत शेडनेट उभारून त्यात काकडी घेतली अाहे. अात्तापर्यंत ७० क्विंटलहून अधिक उत्पादन मिळाले असून, सरासरी दर किलोला १५ रुपये आहे. रसवंती चालवतानादेखील काकडीसाठी थेट ग्राहक मिळवले जातात. विक्री व्यवस्थेची जबाबदारी सुभाष यांची पत्नी सांभाळतात. शेडनेट उभारणीसाठी दोन लाख १७ हजार रुपये अनुदान मिळाले आहे. कृषी पर्यवेक्षक दिनेश लंबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी शेताला भेट धाबे यांना प्रोत्साहित केले आहे. 

कुटुंबाची साथ
उच्चशिक्षित असताना अाणि अंशकालीन नोकरी सोडून पूर्णवेळ शेती करणे हे धाडस होते. हा निर्णय घेताना पत्नी मंदाकिनी यांनी समर्थ साथ दिली. त्या शेतीतील सर्व कामांमध्ये मदत करतात. रसवंतीही सांभाळतात. या हंगामी उद्योगामुळे रोजगारनिर्मिती झाली. नोकरी करण्यापेक्षा स्वतः रोजगार उपलब्ध करण्याचे समाधान मिळाल्याचे धाबे सांगतात.

पाण्याचे नियोजन 
अन्य भागांप्रमाणेच नागापूर शिवारातही पाण्याची उपलब्धता कमी होत अाहे. धाबे कुटुंबाच्या विहिरीत तिघांचे हिस्से अाहेत. त्याचा विचार करीत सुभाष यांनी २०१३ मध्ये आपल्यासाठी बोअर खोदले. याद्वारे दोन ते तीन तास पाणी मिळते. या पाण्याचा काटकरीने उपयोग केला जातो. यासाठी ठिबक सिंचनाचा वापर सुरू केला. त्यामुळे उपलब्ध पाण्यावर ऊस अाणि शेडनेटमधील सिंचन करता येणे शक्य झाले अाहे. 
- सुभाष धाबे, ९३०९८७३४७०

loading image