दर्जा, उत्पादकता वाढीसाठी विद्राव्य खतांचा वापर

दर्जा, उत्पादकता वाढीसाठी विद्राव्य खतांचा वापर

पाण्यामध्ये संपूर्ण विद्राव्य अशा सरळ, संयुक्त, मिश्र रासायनिक खतांचा वापर ठिबक व तुषार सिंचनाद्वारे करता येतो. तीव्र कमतरता असलेल्या तातडीच्या स्थितीमध्ये फवारणीद्वारेही या खतांची पूर्तता करता येते. विद्राव्य खताच्या संतुलित वापरामुळे पिकांची उत्पादकता व दर्जा वाढ शक्य होते.

जमिनीमध्ये एकूण १७ अन्नद्रव्ये उपलब्ध असली, तरी त्याचे प्रमाण कमी अधिक आढळते. महाराष्ट्रातील जमिनीत पालाश जास्त प्रमाणात असून, स्फुरद आणि नत्र या अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाणही कमी अधिक असते. जमिनीत कोणत्याही अन्नद्रव्यांची कमतरता असल्याचा त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर होतो. हे टाळण्यासाठी माती परीक्षण करण्याची आवश्यकता असते. माती परीक्षण अहवालानुसार आपल्या जमिनीतील मुख्य अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे नेमके प्रमाण समजू शकते. हे समजल्यावर कमतरता असलेल्या घटकांची रासायनिक खताद्वारे नेमक्या प्रमाणात पूर्तता करता येते. पारंपरिक खतांमध्ये उदा. सुपर फॉस्फेट, डाय-अमोनिअम फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश ही खते १०० टक्के पाण्यात विरघळत नाहीत. संपूर्ण जमिनीवर किंवा गाडून दिल्याने मातीतील खनिज पदार्थांच्या संपर्कात आल्याने त्यांचे स्थिरीकरण होते. पिकासाठी दिलेल्या पाण्यासोबत त्यांचा निचरा होतो. एकूण खतांची कार्यक्षमता कमी होऊन पिकांसाठी उपलब्धता कमी होते. या समस्येवर मात करण्यासाठी पाण्यामध्ये संपूर्ण विद्राव्य अशा सरळ, संयुक्त, मिश्र रासायनिक खतांची निर्मिती झाली आहे. ही खते ठिबक व तुषार सिंचनाद्वारे पाण्यासोबत विरघळून देता येतात. 

तीव्र कमतरता असलेल्या तातडीच्या स्थितीमध्ये फवारणीद्वारेही या खतांची पूर्तता करता येते. त्याचे नियोजन पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार करावे लागते. फवारणीवेळी वनस्पतीच्या पानांशी चिकटून राहण्यासाठी चिकटद्रव्यांचा वापर करावा. फवारणीसाठी चिलेटेड स्वरूपातील खते १ किलोच्या पॅकेजिंगमध्ये विविध कंपन्यांद्वारे उपलब्ध आहेत. ही खते पिकांना त्वरित उपलब्ध होतात. 
    भाजीपाल्यांची पुनर्लागवडीवेळी रोपे विद्राव्य खतांच्या द्रावणात बुडवून लावली जातात. 
    सूक्ष्म सिंचन पद्धतीतून देण्यासाठीही संपूर्ण विद्राव्य खतांच्या विविध श्रेणी उपलब्ध आहेत. हे पॅकेजिंग प्रामुख्याने २५ किलोमध्ये मिळतात. ही खते पाण्यासोबत पिकांच्या मुळांच्या कक्षेत दिली जात असल्याने पिकांना लवकर उपलब्ध होतात. पिकांची चांगली वाढ होते. शेतकऱ्यांच्या खते देण्याची वेळ, मजुरी, श्रम, खर्च यात बचत होते.

फर्टिगेशन म्हणजे काय?
ठिबक सिंचनाद्वारे पिकांना खते व पाणी एकत्रित देण्याच्या पद्धतीला फर्टिगेशन म्हणतात.

फर्टिगेशनचे फायदे -
    मजूर, पाणी व खते यांची बचत होते.
    पिकाच्या मुळापाशी गरजेनुसार योग्य अन्नद्रव्य ठराविक प्रमाणात देता येते.
    विद्राव्य द्रवरूप खते बहुतांशी आम्लधर्मीय असून, क्षारभार कमी असणारी आहे. ही खते सोडिअम व क्‍लोरिनमुक्त असल्याने जमिनीच्या गुणधर्मावर अनिष्ट परिणाम होत नाही.
    फर्टिगेशन तंत्रामुळे पाणी वापर कार्यक्षमता ४० ते ५० टक्के, खत वापर कार्यक्षमता २५ ते ३० टक्के वाढते. जमिनीची सुपीकता टिकून उत्पादनात वाढ होते.
    पिकाची वाढ जोमाने झाल्याने रोगांना बळी पडण्याचे प्रमाण कमी होते. 
    पिकाच्या वाढीनुसार खते देता येतात.
    खते विभागून जमीन, पिकाच्या व हवामानातील बदलानुसार देता येतात.

विद्राव्य खते द्या फवारणीद्वारे : 
साधारणतः पानांत असलेल्या अन्नद्रव्याच्या पातळीवर पिकांची उत्पादनक्षमता ठरते. पीकवाढीच्या निरनिराळ्या अवस्थेत त्यांची गरज वेगळी असते. त्यानुसार संतुलित प्रमाणात ही अन्नद्रव्ये पुरवल्यास पिकांची वाढ चांगली होते. फवारणीद्वारे विद्राव्य खते दिल्यास ती त्वरित वनस्पतींना उपलब्ध होतात. त्यामुळे कमतरता असलेल्या अन्नद्रव्यांची पूर्तता करण्यासाठी फवारणी हा मार्ग उपयुक्त ठरतो. विद्राव्य खते घन व द्रवरूप स्वरूपात उपलब्ध असून, वाहतूक, साठवणूक आणि वापरणे सुलभ ठरते. त्यांच्या किमती पारंपरिक खतांच्या तुलनेत अधिक आहेत. मात्र त्यांची गुणवत्ता आणि उपयुक्तता लक्षात घेता फायदेशीर ठरू शकतात. 

फवारणीतून खते देण्याचे उद्देश -
    पिकांना उदिप्त करून त्यांची उत्पादन प्रक्रिया वाढविणे. 
    अतिवृष्टीमुळे किंवा सतत पाऊसमानामुळे जमिनीतील खते वाहून जातात. तसेच पाणी साचल्यामुळे कार्यरत मुळे कार्यरत नसतात. अशा वेळी काही वेळ पाऊस थांबला असता फवारणीमधून खते देता येतात. ती पिकांना त्वरित उपलब्ध होतात.
    जमिनीतील पाण्याची कमतरता किंवा कडक उन्हाळा अशा परिस्थितीत फवारणीद्वारे खतांची पूर्तता करता येते. सायंकाळी अशी खते दिल्यास पाने कार्यरत राहतात. पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते.

महत्त्वाचे...
    फवारणीतून दिलेली खते जमिनीतून दिलेल्या खतांना पर्याय होऊ शकत नाहीत, हे लक्षात ठेवावे. या तंत्राचा वापर पानातील पोषणद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी करावा. विशेषतः फुलोऱ्यात, मोहोर येण्याच्या वेळी, फलधारणा, त्यानंतर फळांची वाढ होण्यासाठी अन्नद्रव्यांची अधिक मात्रा आवश्यक असते. अशा वेळी फवारणीद्वारे दिलेली खते उपयोगी पडतात. 

काही प्रमुख विद्राव्य खते
    १९ः१९ः१९, २०ः२०ः२० - या खतांना स्टार्टर ग्रेड म्हटले जाते. यात नत्र अमाईड, अमोनिकल व नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो. या खताचा उपयोग प्रामुख्याने पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो.
    १२ः६१ः० - या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात. यात अमोनिकल स्वरुपातील नत्र कमी असतो. पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे अधिक प्रमाण असते. नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी या खतांचा उपयोग होतो.
    ०ः५२ः३४ - या खतास मोनो पोटॅशिअम फॉस्फेट म्हणतात. यात स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये भरपूर आहेत. फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेकरिता तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत विशेषत्वाने वापरले जाते.
    १३ः०ः४५ - या खतास पोटॅशिअम नायट्रेट म्हणतात. यात नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण जास्त असते. फुलोऱ्यानंतरच्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्‍यकता असते. अन्ननिर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे. या खतामुळे अवर्षण स्थितीत पिके तग धरू शकतात.
    ०ः०ः५० - या खतास पोटॅशिअम सल्फेट म्हणतात. पालाश बरोबरच या खतांमध्ये उपलब्ध स्वरूपातील गंधकही असतो. पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडते. या खतामुळे भुरीसारख्या रोगाचे नियंत्रण शक्य होते. तसेच पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते.
    १३ः४०ः१३ - पात्या, फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबून कपाशीची बोंडे व अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते.
    कॅल्शिअम नायट्रेट - मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरवातीच्या काळात व बोंडे किंवा शेंगावाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो.
    २४ः२४ः० - यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे. शाकीय वाढीच्या तसेच फुलधारणा त्याचा वापर करता येतो.

फवारणीसाठी द्रावण तयार करताना घ्यावयाची काळजी
    पाण्यामध्ये खत विरघळवावे. खत पूर्णपणे विरघळेपर्यंत पाणी ढवळत राहावे.
    कॅल्शिअम जास्त असलेल्या पाण्यात थोडे गरम पाणी किंवा आम्लयुक्त पाण्याचा वापर करावा. अशा कॅल्शिअमयुक्त पाण्यात कीटकनाशके, बुरशीनाशके, खते वापरण्याचे टाळावे.
    बोर्डो किंवा लाइम मिक्श्चर साठविलेल्या डब्यात खतांचे द्रावण तयार करू नये. 
    फवारणी कडक उन्हाची वेळ टाळून करावी. फवारणीसाठी सकाळी ९ ते ११ व सायंकाळी ४ ते ६.३० ही वेळ योग्य मानली जाते. 

- डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६ (मृद् विज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com