जाधवांच्या कारले, दोडक्याची 'क्वालिटी नंबर एक'

विकास जाधव
Tuesday, 3 April 2018

सातारा जिल्ह्यातील गोवे येथील विनोद बळीराम जाधव हा तरुण शेतकरी अत्यंत उत्साहाने शेती करतो. वेलवर्गीय पिकांत विशेषतः कारले, दोडका आदींचे सातत्याने दर्जेदार उत्पादन घेत त्यांना मार्केटही चांगले मिळवले आहे. पहाटेपासून ते रात्रीपर्यंत कष्ट, चिकाटी, अभ्यासूवृत्ती व मार्केटचा अभ्यास यातून वेलवर्गीय पिकांत त्यांनी हुकूमत मिळवली आहे.
  

सातारा जिल्ह्यातील गोवे येथील विनोद बळीराम जाधव हा तरुण शेतकरी अत्यंत उत्साहाने शेती करतो. वेलवर्गीय पिकांत विशेषतः कारले, दोडका आदींचे सातत्याने दर्जेदार उत्पादन घेत त्यांना मार्केटही चांगले मिळवले आहे. पहाटेपासून ते रात्रीपर्यंत कष्ट, चिकाटी, अभ्यासूवृत्ती व मार्केटचा अभ्यास यातून वेलवर्गीय पिकांत त्यांनी हुकूमत मिळवली आहे.
  
गोवे (ता. जि. सातारा) हे कृष्णा नदीकाठी वसलेले सुमारे तीन हजार लोकसंख्येचे गाव. पाण्याची मुबलकता असल्याने ऊस, हळद आदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहतो. या गावातील विनोद बळीराम जाधव हा तरूण शेतकरी. विनोद यांचे थोरले बंधू किसन नोकरी सांभाळून शेती करायचे. 
विनोदही आई-वडिलांच्या सोबत शेतीची आवड जपतच मोठे झाले. मात्र उदरनिर्वाहासाठी पुणे येथील खासगी कंपनीत कामास लागले. परंतु तेथे मन रमेना. दरम्यान २००३ मध्ये बंधू किसन यांचे निधन झाले. मग मात्र पूर्णवेळी शेतीलाच वाहून घेण्याचे विनोद यांनी नक्की केले. अभ्यासाच्या जोरावर त्यांनी आपली शेती प्रगतीपथावर नेली आहे. धाकटे बंधू संजय यांचे होटेल आहे. त्यांचा मोठा आधार आहे. 

शेतीतले बदल
 सुरवातीच्या काळात ऊस होता. सन २००४-०५ च्या काळात दरातील घसरण, महागडे अर्थकारण लक्षात घेता ऊस कमी करून भाजीपाला घेण्याचा निर्णय. 
  प्रथम २० गुंठ्यात टोमॅटो. दर चांगला मिळाल्याने चांगले अर्थाजन. त्यानंतर २० गुंठ्यात वांगी. सर्व हातविक्री केल्याने दरांत फायदा. उत्साह वाढला. 
 सन २००६ मध्ये एक एकर टोमॅटो दराअभावी पूर्ण सोडून द्यावा लागला. किमान ८० हजार रूपये   तोटा झाला. त्यानंतर मार्गदर्शन, अभ्यासातून विनोद यांनी पीकपध्दती विकसित केली. त्यात सातत्यही ठेवले. 

विनोद यांची पीक पद्धती 
 शेती- साडेसहा एकर 
 वेलवर्गीय पिकांवर मुख्य भर
 कारले व दोडका- पाच-सहा वर्षांपासून, हंगाम- उन्हाळी 
 खरीपात- फरसबी, शेवंती
 अन्य पिके- टोमॅटो

काकडीचा प्रयोग 
वेलवर्गीय पिकांची सुरवात ३५ गुंठ्यातील काकडीतून झाली. चांगल्या व्यवस्थापनातून ३५ गुंठ्यात ३० टन उत्पादन मिळाले. एका प्रसिद्ध मॉलला सरासरी दहा रुपयाने काकडी दिली. खर्च वजा जाता सुमारे सव्वा दोन लाख रुपये मिळाले.  

दर्जेदार उत्पादनासाठी (कारले, दोडका आदींसाठी)
मल्चिंग पेपर
ठिबक सिंचन
दर फेब्रुवारीत सहा बाय तीन फुटावर लागवड 
विषाणूजन्य रोगाला सहनशील वाणांची निवड
या रोगाचा सर्वाधिक धोका. एका प्लाॅटला मोठी इजा होऊन तोटा झाला. मात्र न खचता बारीक निरिक्षणे ठेवत प्राथमिक काळजी घेत व्हायरसला लांब ठेवण्याचा प्रयत्न.    
जमिनीचा पोत टिकावा यासाठी शेणखत, जीवामृताचा वापर 
कोंबडीखत, शेळ्या शेतात बसवणे आदी.

मित्राचा मोलाचा सल्ला 
नाशिक येथील विनोद यांचे मित्र अभिजीत साळुंखे यांच्याकडून नवे वाण, उत्पादन, शेतीतील नवे तंत्र, लागवडीच्या पद्धती याविषयी सातत्याने मार्गदर्शन घेतले जाते. वेलवर्गीय पिकांत वेल बांधण्यासाठी मजूर तसेच वेळही मोठ्या प्रमाणात जायचा. अभिजीत यांनी शेतीला भेट दिल्यानंतर सुतळीऐवजी प्रत्येक अोळीसाठी जाळीचा वापर करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी खर्च थोडा वाढला असे वाटत असले तरी मजुरी व वेळ याच बचतच झाल्याचे पुढे लक्षात आले. मजबूत असल्याने जाळीचा वेलीस आधार राहतो. फळांचा बोजा सहजपणे पेलला जातो.

उत्पादन    कारले             दोडका 
एकरी       २० ते २५ टन   २५ ते ३० टन 

मार्केट - सातारा, पुणे 
प्रसिद्ध मॉलचे कलेक्शन सेंटर - दररोज ३०० किलो मालाचा पुरवठा

होणारे फायदे 
 मुंबई बाजाराचा दर जागेवर मिळतो.  
 वजन डोळ्यासमोर होते.
 कॅश पेमेंट होते. 

अन्य शेती 
कारले पिकानंतर खरिपात फरसबी व शेवंती 
 शेवंतीची आॅगस्टमध्ये लागवड. दसरा- दिवाळीसाठी. 
 घरखर्च भागविण्यास त्याची मदत होते.
 यंदा हिरव्या मिरचीची लागवड. दर्जेदार पीक. 
 मजुरांमध्ये दहा महिला व दोन पुरुष वर्षभर- शिवाय घरचे सदस्य राबतात. 
 सहकार्य- पत्नी सौ. सुरेखा, बंधू संजय, पुतण्या शुभम, मुलगा केतन 

संघर्ष, प्रयत्नांविषयी
चार वर्षांपूर्वी थेट भाजीपाला विक्रीसाठी आत्मा विभागाच्या माध्यमातून पुण्यात स्टाॅल सुरू केला.  चांगली विक्री व्हायची. मात्र शेतीबरोबर दुसऱ्या शहरात थेट विक्रीसाठी पुरेसा वेळ देणे शक्य न झाल्याने हा उपक्रम थांबवावा लागला. 

सुरवातीच्या काळात टोमॅटोस दर नसल्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागले. मात्र हिंम्मत हारली नाही. सन २०१४- १५ मध्ये गारपिटीत काकडीचे मोठे नुकसान झाले. शेजारील शेतकऱ्याच्या कारल्यालाही फटका बसला. मात्र ती पुन्हा वाढीला लागली. ते पाहून कारल्याच विशेष पसंती दिली. 

शेतातील काम पहाटे चार- पाचपासून सुरू होते. जमीन थंड असताना ठिबकद्वारे पाणी दिले जाते.  फवारणी संध्याकाळी पाचनंतर केली जाते. रात्री नऊ वाजता कामाचा दिवस पूर्ण होतो.
- विनोद जाधव, ९६०४५४१४८५ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news vinod jadhav agriculture