स्वप्न जेव्हा सत्यात उतरते...

स्वप्न जेव्हा सत्यात उतरते...

लातूर जिल्ह्यातील कव्हा हे गाव पूर्वी वादविवाद, कलह, कोर्ट-कचेरी यांच्यासाठी प्रसिद्ध होते. गावात त्यामुुळे विकास, उद्योग, शिक्षण यांची चर्चा होत नसे. या परिस्थितीत आम्ही महाविद्यालयात शिकत असताना नवयुवक विकास संघटना १९७५ मध्ये स्थापन केली. त्यानंतर गावच्या विकासाचा यज्ञ अनंत अडचणींवर मात करून सुरू झाला. गावातील तरुणांनी ग्रामस्थांना संघटित करण्यास सुरूवात केली. दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था स्थापन झाली. गरजूंना गाईंचे तसेच गायरानाच्या २२ एकर क्षेत्रावर मोफत घरांचेही वाटप केले. शेतकऱ्यांसाठी शिवाजी गृहनिर्माण संस्था स्थापन करून अल्पदरात प्लॉट व कर्ज उपलब्ध करून दिले. आज राजीव नगर आदर्श वसाहत तयार झाली आहे. तेथे घरकुल, स्वच्छतागृह या सुविधा देण्यात आल्या आहेत. सन १९८३ मध्ये जयक्रांती शिक्षण संस्थेची स्थापना होऊन स्वामी दयानंद माध्यमिक विद्यालयाची व मागासवर्गीयांसाठी मोफत वसतिगृह सुविधा देण्यात आली. आज येथे वैद्यकीय प्राथमिक केंद्र, जिल्हा परिषद शाळा, आयएसओ अंगणवाडया, लक्षवेधी पशू प्राथमिक केंद्र, विविध विकास सहकारी संस्थेचे गोदाम, धार्मिक स्थळे, सिमेंट रस्ते, वृक्षारोपण, स्वच्छतागृहे, शोषखड्डे, विद्युतीकरण आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. कव्हा गाव आता निर्मल ग्राम म्हणून जाहीर करण्यात आले आहे.    

विकासाला मोठी गती  
कव्हा गावचा सरपंच, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काम करण्याची संधी मला मिळाली. शिवाजीराव पाटील निलंगेकर, शिवराज पाटील चाकुरकर, कै. विलासराव देशमुख यांच्या सततच्या सहवासामुळे अनेक विकास योजना गावात आणता आल्या. तावरजा नदीवर कोल्हापुरी बंधारा, लातूर ते कव्हा रस्त्याचे डांबरीकरण, कायम पाणीपुरवठा योजना, तावरजा धरणाचे कॅनॉल आदी कामे झाली. खुंटेगाव व कव्हा साठवण तलाव पूर्णत्वास गेल्याने पुरेसा पाण्याचा साठा निर्माण झाला. त्याचा फायदा शेतीसाठी झाला. कव्हा साठवण तलावात कांही शेतकऱ्यांची घरे गेली. त्या काळात मला लातूर तालुक्याचा आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या वेळी भूकंप योजना व धरणग्रस्तांसाठी पाच गावे वसवली. आमदार झाल्यानंतर लातूर तालुक्यातील २५ हजार भूकंपग्रस्तांना घरासाठी अनुदान, विद्युत उपकेंद्र  उभारणी, खेड्यातील रस्ते, पाणीपुरवठा योजना या कामांना गती आली. कव्हा गावच्या विकासाला प्रचंड गती आली. 

जिल्हा परिषदेचा देशात सन्मान 
माझी सौभाग्यवती सौ. प्रतिभा पाटील यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून निवड झाली. त्यांच्या पुढाकारातून स्मार्ट व्हिलेज व स्मार्ट स्कूल योजना राबवण्यात आल्या. या योजनेत ६० गावे दरवर्षी निवडण्यात आली. त्या अंतर्गत तंटा मुक्‍ती, दारूमुक्‍ती, निर्मल ग्राम, दलित वस्ती विकास, जलयुक्‍त शिवार योजना, रस्ते विकास, स्मार्ट स्कूलमध्ये व्हर्च्युअल क्‍लास, खेळाचे मैदान, सेमी इंग्लिश भाषा, बायोमॅट्रिकद्वारे हजेरी आदी बाबी राबविण्यात आल्या. त्यातून जिल्हा परिषदेला देशात व २०१६-१७ मध्ये राज्यात प्रथम पुरस्कार मिळाला. हा लातूरच्या जनतेचा, जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा गौरवच आहे.

तयार केली जलसुरक्षा 
‘स्मार्ट  व्हिलेज’ अंतर्गत लोकसहभागातून तावरजा नदीचे रुंदी व खोलीकरण करण्यात आले. हिप्परसोगा ते कव्हा, चांडेश्‍वरपर्यंत साडेतीन किलोमीटर लांबीची, दोनशे फूट रुंद व १५ फूट खोलीपर्यंत कामे करण्यात आली. नदीवर भूमिगत बांध करण्यात आले. गतीमान पाणलोट विकास योजनेअंतर्गत गावातील शेतांमध्ये नालाबांध मोफत करण्यात आले. कामांचा परिणाम म्हणून  २०१६-१७ मध्ये सर्व नाले पावसात तुडुंब भरून वाहिले. विहिरी, कूपनलिकेचे पाणी वाढले. ग्रामस्थांबरोबरच आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेचे श्री श्री रविशंकर, जिल्हाधिकारी डॉ. पोले, आमदार अमित देशमुख यांची मदत झाली. 

उल्लेखनीय कामे 
पर्यावरणपूरक गाव बनविण्यासाठी सप्‍तपर्णी सारखी रोपे पुण्याहून आणून त्यांचे रोपण केले. ग्रामस्थ व स्वामी दयानंद विद्यालयाने हे काम पूर्ण केले. गाव व राजीवनगरमध्ये प्रत्येक घराला रोपे मोफत दिली. त्यामुळे संपूर्ण परिसर हिरवा होण्याच्या मार्गावर आहे. निर्मल ग्राम योजनेअंतर्गत ‘नरेगा’मधून गावात प्रत्येक घरासमोर शोषखड्डे घेण्यात आले. गावाच्या भव्य प्रवेशद्वाराचे कामही पूर्णत्वास गेले आहे. यामुळे गावच्या सौंदर्यात भर पडली आहे. गावातील महादेव कोळी मच्छीमार संस्था आम्ही १९८५ मध्ये स्थापन केली. संस्थेला तावरजा धरण मासेमारीसाठी उपलब्ध करून दिले. त्यामुळे अनेक तरुणांना रोजगार मिळाला. त्यांची आर्थिक स्थिती सुधारली. घरकुल योजनाही राबविण्यात आली. गावात दलित वस्तीत दोनशे फूट लांबीचे व १५० फूट रुंदीचे जिल्ह्यातील उत्कृष्ट आंबेडकर पार्क उभारले. त्यात सभागृहही बांधण्यात आले. गावात पशुवैद्यकीय केंद्र महाराष्ट्रात आदर्शवत आहे. दवाखान्यास आयएसओ मानांकन प्राप्‍त झाले आहे. कधी काळी गावामध्ये व्यायामाची आवड जपली जात होती. त्याला चालना देण्यासाठी राजीवनगर येथे उत्कृष्ट व्यायामशाळा बनविण्यात आली आहे. 

धार्मिक सलोखा जपला 
गावात शेखमियाँ साहेब यांचा दर्गा असून सर्व धर्मीयांचे लोक त्यास भक्‍तिभावाने पूजतात. त्यातून गावात धार्मिक सलोखा जपला आहे. या परिसराचे सुशोभीकरण ग्रामस्थांच्या सहभागातून करण्यात आले आहे. महादेव, नृसिंह, मारूती आदी देवतांची मंदिरेही उभारण्यात आली आहेत. 

शेतीतील प्रगती 
शेतकऱ्यांना विविध योजनांमधून मोफत बियाणे, जनावरासाठी गोठे, विहिरी, शेततळे, ठिबक योजना, नाला बांध, नदी सरळीकरण व केटीवेअर बंधारा, तावरजा नदीवरील सीएनबी बंधाऱ्यामुळे पाणी व अन्य सुविधा निर्माण झाल्या आहेत. शेतकऱ्यांना तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. येत्या  काळात शेतकरी कंपनी स्थापन करून निर्यात, विपणन, सुधारित वाण व सुधारित शेतीचे प्रयोग केले जाणार आहेत. 

तंटामुक्तीचे बक्षीस 
दीडशे कुटुंबांना कुक्कुटपालन, शिलाईमशीन, मिरची कांडप, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय आदी योजनांचा लाभ देण्यात आला. गावातील तरुणांना कर्ज देऊन स्वतःच्या पायांवर उभे करता आले. कव्हा बचत गटांना आर्थिक मदत झाली आहे. कै. बाळासाहेब कुलकर्णी ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांचे गावच्या विकासात चांगले सहकार्य होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर कुलकर्णी यांना तंटामुक्‍ती योजनेचे अध्यक्ष म्हणून चार वर्षे संधी मिळाली. यांच्या काळात गावाला तंटामुक्‍तीचे बक्षीस मिळाले. 

गावकऱ्यांचे सहकार्य 
गावातील विकासात उपसरंपच भानुदासराव घार, सुभाषअप्पा सुलगुडले, प्रा. गोविंद घार, तंटामुक्‍ती अध्यक्ष भागवत घार, माजी सरपंच ज्ञानोबा रुकमे, सदाशिव सारगे, नेताजी मस्के, अच्युत पाटील, चेअरमन सुदाम रुकमे, कै. नवनाथ सोदले, कै. बाळासाहेब कुलकर्णी, तंटामुक्‍ती अध्यक्ष कै. तानाजीराव पाटील, लक्ष्मण सूर्यवंशी, सुरेश सारगे, गोरोबा मगर, दीनानाथ मगर, भास्कर होळकर, विद्यमान सरपंच ललिताताई पाटील, उपसरपंच किशोर घार, शिवशरण थंबा, गोविद सोदले, गोरख सारगे, पाशुमियाँ शेख, कांताप्पा पाठणकर, बसवण्णप्पा पाठणकर, शेषेराव रूकमे, अमर पाटील, तसेच सर्व ग्रामस्थांची मोठी मदत लाभली आहे. येत्या काळात आकर्षक पर्यटन स्थळ तसेच व्यावसायीक, तांत्रिक अभ्यासक्रम आदींना चालना देण्याचा मानस आहे. सौ. प्रतिभा पाटील यांच्या पुढाकाराने कमला नेहरू मंडळाची स्थापना झाली. या संस्थेद्वारे महिला व युवकांचे बचत गट करून त्यांना उद्योगासाठी कर्ज व व्यवसाय प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात आली आहे. विविध मान्यवरांनी गावाला भेट देऊन केलेल्या कामांची प्रसंशा केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com