शेततळ्यातील मत्स्यपालन ठरले फायद्याचे

विनोद इंगोले
रविवार, 25 मार्च 2018

लंकेश भोयर यांची ५ हेक्‍टर शेती आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यत्वे भात लागवड होते. भोयरदेखील खरिपात भात पीक घेतात. धानाच्या बांधावर तूर लागवड करतात. रब्बी हंगामात हरभरा घेतात. मात्र त्यांची प्रयोगशील वृत्ती त्यांना वेगळे काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त करीत होती. 

लंकेश भोयर यांची ५ हेक्‍टर शेती आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यत्वे भात लागवड होते. भोयरदेखील खरिपात भात पीक घेतात. धानाच्या बांधावर तूर लागवड करतात. रब्बी हंगामात हरभरा घेतात. मात्र त्यांची प्रयोगशील वृत्ती त्यांना वेगळे काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त करीत होती. 

मत्स्यशेतीकडे वाटचाल
कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून वर्ष २०१६ मध्ये त्यांनी शेततळे घेतले. शेततळ्याचे आकारमान ३० बाय ३० मीटर तसेच तीन मीटर खोल असे आहे. शेतात विहिरीच्या पाण्याने शेततळ्यातील पाण्याची पातळी कायम ठेवली जाते. शेततळ्यात त्यांनी मत्स्यपालनास सुरवात केली आहे. मात्र त्याआधी त्यांनी छत्तीसगड आणि ओरिसा राज्यात जाऊन मत्स्यव्यवसायाची माहिती घेतली.

खाद्य व्यवस्थापन
गोड्या पाण्यातील माशांना खास प्रकारचे खाद्य लागते. राजनांदगाव (छत्तीसगड) येथून ते मत्स्यखाद्य आणतात. वाहतूक खर्चासह हे खाद्य ३५ ते ३७ रुपये प्रतिकिलो या दराने पडते. दररोज सकाळ व संध्याकाळी माशांना खाद्य दिले जाते. सध्या त्यांच्याकडे जरंग (फंगस) जातीचे ११ ते १२ हजार बोटुकली मासे आहेत. प्रतिकिलो बोटुकलींसाठी प्रतिदिन पहिल्या २ ते २.५ महिन्यांपर्यंत ७ ग्रॅम, त्यानंतर पुढील ४ ते ५ महिन्यांपर्यंत ५ ग्रॅम, त्यानंतर शेवटपर्यंत ३ ग्रॅम इतके खाद्य ते देतात. सद्यस्थितीत या बोटुकलींना दीड किलो खाद्य प्रतिदिन लागते. बोटुकलीचे एक ते दीड किलो वजन होण्यासाठी सरासरी दहा महिने लागतात. या कालावधीत एका माशाला दीड किलो खाद्य लागते. त्यानुसार एका माशाच्या खाद्यावर ५५ रुपयांचा खर्च होतो. तलावातील पाणी गढूळ झाल्यास त्याचा रंग बदलतो. त्यामुळे दर महिन्याला ते पंपाच्या साहाय्याने तलावातील पाणी हवेत उडवून त्यात हवेतील प्राणवायू मिळेल असे नियोजन करतात. 

माशांची उत्पादकता  
फंगस पाच हजार नग, कटला, रोहू आणि सायप्रस जातीच्या माशांचे संवर्धन ते करतात. १ किलो ते १.४ किलो असे वजन फंगस माशांचे मिळत आहे. सद्यस्थितीत आठवड्याला २ क्‍विंटल माशांची उत्पादकता मिळत आहे. त्याच्या विक्रीस सुरवात करण्यात आली. व्यापाऱ्यांना १०० रुपये किलो या घाऊक दराने माशांची विक्री करीत आहे. एक किलो माशाचे वजन असल्यास आणि तो १०० रुपयांना विकल्यास त्याच्या उत्पादनावर सरासरी ६५ ते ८५ रुपयांचा खर्च होतो आणि २० ते ३० रुपयांचा निव्वळ नफा मिळतो, असा त्यांचा अनुभव आहे. गेल्या हंगामात त्यांना २० क्‍विंटल उत्पादन झाले. त्यातून त्यांना चांगला आर्थिक नफा झाला. एरवी एवढ्या क्षेत्रावर साध्या पीक लागवडीमुळे वर्षात जास्तीत जास्त ३५-४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असते. त्यामुळे त्यांची प्रयोगशीलता परिसरातील शेतकऱ्यांसाठी अादर्श ठरली आहे. 

लंकेश यांनी अधिक प्रयोगशील वृत्ती बाळगत यंदा ओरिसा राज्यातून जयंती (रोहूमधील नवीन जात) जातीचा मासा आणला आहे. एका वर्षात त्याची दीड ते दोन किलो वाढ होते. रोहूची वाढ एका वर्षात ६०० ते ७०० ग्रॅमच वाढ होते. त्यामुळे जयंतीचे उत्पादन फायदेशीर ठरते, असे सांगितले जाते. मात्र सध्या त्यांच्या निरीक्षणात ही जात असल्याचे ते सांगतात. 
 लंकेश भोयर, ९६०४२२६२६३


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowon news Fishery lankesh bhoyar