सायफनचा वापर करीत केली वीज बचत

 दीपक कालकुंद्रीकर
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

कोल्हापूर जिल्ह्यातील कालकुंद्री (ता. चंदगड) या गावाने ग्रामपंचायतीमार्फत यंदाच्या पावसाळ्यात तलावातून सायफन पद्धतीने पाणीपुरवठा सुरू केला आहे. सायफन पद्धतीचा वापर केल्यामुळे जॅकवेलमधून उपसा बंद केला आहे. परिणामी पाणी उपसा करण्यासाठी येणारे प्रतिमहिना २० ते २५ हजार रुपयांची बचत होणार असून, सहा महिन्यांत ग्रामपंचायतीच्या खर्चात अंदाजे दीड लाखाची बचत होण्याची शक्‍यता आहे.

ताम्रपर्णी नदीवर जॅकवेल बांधण्याआधी कालकुंद्री गावाला सैद्याच्या तलावातूनच पाणीपुरवठा होत असे. भौगोलिकदृष्ट्या उंचावर असल्यामुळे या तलावातून गावातील पाण्याच्या टाकीत सायफन पद्धतीने पाणी येत असे. मात्र, अलीकडे गावातील वाढलेली लोकसंख्या व तलावातील पाण्याची कमतरता यामुळे ताम्रपर्णी नदीवरील जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षी ग्रामपंचायत व्यवस्थापनाने चौदाव्या वित्त आयोगातून दोन लाखांचा निधी खर्च करत तलावाच्या ठिकाणी नवीन चेंबरचे बांधकाम केले आहे. त्यामुळे झरे पुनरुज्जीवित होऊन पुरेसे पाणी उपलब्ध झाले आहे. कालकुंद्रीची रोजची पाण्याची गरज ही ४० हजार लिटर इतकी आहे. गावामध्ये सकाळ-संध्याकाळ अशा दोन टप्प्यांत या पाण्याचे वितरण केले जाते. अन्य वेळी जॅकवेलमधून १५ एचपी पंपाद्वारे पाण्याचा उपसा केला जातो. यासाठी दर महिन्याला वीजबिलापोटी २० ते २५ हजार रुपये खर्च होतात. सध्या तलावामध्ये पाणी असल्याने सायफन पद्धतीने पाणी सोडता येत आहे. ही स्थिती जूलैपासून असून, पुढील चार ते सहा महिन्यांपर्यंत राहू शकते. परिणामी ग्रामपंचायतीच्या खर्चात एक ते दीड लाख रुपयांची बचत होण्याची शक्यता आहे.

ग्रामपंचायतीने केलेल्या चेंबर दुरुस्तीमुळे व चांगल्या पावसामुळे स्वच्छ पाणी उपलब्ध झाले आहे. परिणामी सायफन पद्धतीने तलावातील पाण्याचा वापर करणे शक्य होणार आहे. या पद्धतीमुळे विजेचा वापर कमी होऊन, त्यावरील खर्चात मोठी बचत होणार आहे. हेच पैसे अन्य विकासकामांसाठी वापरात येऊ शकतात.
- दयानंद कांबळे, सरपंच, कालकुंद्री
 
Web Title: agrowon news kolhapur news electric