दूध उत्पादकांना नुकसानभरपाई द्यावी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 November 2017

जळगाव - गाय व म्हशीच्या दुधाचे दर खरेदीदार संस्थांनी एक लिटरमागे तीन रुपयांनी कमी केले. या संस्थांनी त्यांचे नुकसान टाळण्यासाठी इतर खर्च कमी न करता शेतकऱ्यांनाच फटका दिला. काहींनी तर शासनाचे निर्देश धाब्यावर बसविले असून, आता शासनाने या संबंधी अभ्यास, तपासणी करून सहकारी संस्थांमध्ये दूधपुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना नुकसानीची रक्कम द्यावी, अशी अपेक्षा दूध उत्पादकांच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आली. 

धवलक्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांची जयंती आणि राष्ट्रीय दुग्ध दिनानिमित्त चाळीसगाव येथील दूध संघात रविवारी (ता. २६) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. व्यासपीठावर जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचे संचालक प्रमोद पाटील, कार्यकारी संचालक मनोज लिमये, प्रशासन विभागाचे चंद्रकांत पाटील, व्यवस्थापक मृगेंद्र पांडे, डॉ. एस. सी. पाटील, डॉ. विकास इंगळे, डॉ. पंकज राजपूत, सागर भंगाळे, संजय पाटील, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते. मेळाव्याला चाळीसगाव तालुक्‍यातील ९० संस्थांचे सुमारे दोन हजार सभासद, दूध पुरवठादार उपस्थित होते. 

चाळीसगाव तालुक्‍यात दुधाचे उत्पादन अधिक आहे. दूध संघाला ४५ हजार लिटर दूधपुरवठा चाळीसगावातून रोज केला जातो. ही बाब लक्षात घेता चाळीसगाव येथे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ स्वतंत्र प्रकल्प सुरू करील. त्यानंतर दूध उत्पादनवाढीचे उपक्रमही राबविल, अशी माहिती दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. 

गायीच्या दुधाचे दर २७ रुपये लिटरपर्यंत होते. म्हशीच्या दुधाचे दर ३६ रुपये प्रतिलिटर होते. परंतु सहकारी संस्थांनी दुधाचे दर कमी केल्याने सर्वत्र त्याचा परिणाम झाला. खासगी खरेदीदारही दर कमी देत आहेत. दुसऱ्या बाजूला पशुखाद्य, चारा यांचे दर कमी झालेले नाहीत. कापूस स्वस्त आहे, पण सरकीची किंमत कमी होऊनही सरकी ढेप पूर्वीच्याच चढ्या दरात दिली जाते, अशा प्रतिक्रिया काही दूधपुरवठादारांनी अधिकाऱ्यांकडे व्यक्त केल्याची माहिती मिळाली. 

दूध उत्पादकांच्या अपेक्षा लक्षात घेता दूध संघाचे पदाधिकारी, अधिकारी यांनी दर कमी केल्याच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले. त्यात हिवाळा हा दुधाचा सुकाळ असतो. दूध अधिक येते. त्यातच आता दूध पावडर, लोणीला हवे तसे दर नाहीत. नुकसान होत आहे. त्यामुळे दूध खरेदीदर कमी केल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowon news milk jalgaon