दक्षिण महाराष्ट्रात कांद्यासाठी सोलापूरचेच मार्केट

दक्षिण महाराष्ट्रात कांद्यासाठी सोलापूरचेच मार्केट

सोलापूर हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमेवर असल्याने सोलापूर बाजार समितीत कांद्याची उलाढाल चांगली होते. सोलापुरातून या राज्यांत दळण-वळणाची सहज सुविधा हे मुख्य कारण त्यामागे आहे. प्रामुख्याने ऑक्‍टोबर ते फेब्रुवारी-मार्चपर्यंत कांदा मार्केट हंगाम चालतो. खरिपातील उशीराचा आणि रब्बीतील कांदा या हंगामात मार्केटमध्ये येतो. याच दरम्यान कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही कांद्याला सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे सोलापूरचे कांदा मार्केट या कालावधीत चांगलेच चर्चेत येते. साहजिकच अलीकडील वर्षात सोलापूर मार्केटला कांद्याच्या बाजारामुळे वेगळी ओळख मिळाली आहे. 

सोलापूरचे प्रसिद्ध मार्केट 
 नाशिक, लासलगाव, पिंपळगाव बसवंत या राज्यातील महत्त्वाच्या कांदा बाजारपेठा आहेत. गेल्या काही वर्षांत मात्र सोलापूर बाजार समितीतील कांद्याची वाढती आवक, दरातील स्थिरता आणि आंध्र प्रदेश, कर्नाटक यांसारख्या राज्यांची सोलापूर बाजार समितीतील कांदा खरेदीसाठी असलेली पसंती या बाबी लक्षात घेण्याजोग्या आहेत. त्यामुळेच या बाजाराशी सोलापूर बाजार समिती स्पर्धा करीत अाहे. 

लाल, गरवा कांद्यासाठी ओळख
 मुख्यतः लाल, पांढरा, गरवा कांदा सोलापूर बाजार समितीत येतो. सोलापूर जिल्ह्यात बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा, मंगळवेढा या भागात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. मध्यम, हलक्‍या जमिनी आणि एकूणच अनुकूल हवामानामुळे इथल्या कांद्याचा आकार, चव आणि रंगही वेगळा असतो. त्यातही सर्वाधिक लाल कांद्याचे उत्पादन घेतले जाते. साहजिकच त्याला मार्केटही चांगले मिळते.

बाजारपेठेची वैशिष्ट्ये 
ऑक्‍टोबरपासून कांद्याची आवक सुरू होते. तेव्हा ती २०, ४०, ५० गाड्या अशा प्रमाणात असते. ऐन नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या कालावधीत हीच आवक तब्बल २०० ते ४०० गाड्यांपर्यंत पोचते. दिवसाची उलाढाल किमान आठ ते नऊ कोटी रुपयांपर्यंत पोचते. बाजार समितीमध्ये जवळपास दहा सेलहॉल उभारले आहेत. येथे ३०० आडते कांद्याचे व्यवहार करतात. तर १२५ हून अधिक खरेदीदार प्रत्यक्ष लिलावात सहभागी होतात. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील खरेदीदारांची संख्याही त्यात मोठी आहे.

खुले लिलाव, रोख पट्टी
इथल्या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे लिलावाआधी काटा होतो. विक्री झाल्यानंतर त्याची रोख पट्टी दिली जाते. याच दोन मुख्य बाबींमुळे हाच बाजार शेतकऱ्यांना तसेच व्यापाऱ्यांनाही सोयीचा वाटतो. बाजार समितीचे प्रशस्त आवार, वाहनांमध्ये कांद्याची आवक-जावक करण्यासाठी माथाडी कामगारांचे पुरेसे मनुष्यबळ इथे उपलब्ध आहे. या सर्व कारणांमुळे कांदा बाजार नावारुपास येतो आहे.

रोख आणि चोख व्यवहारामुळेच शेतकरी आणि व्यापारी आमच्याकडे येतात. शिवाय खरेदीदाराची स्वतःची गुंतवणूक मोठी आहे. पुरवलेल्या सोयी सुविधा आणि बाजार समितीतचे योग्य नियंत्रण, हाताळणी या बाबींमुळे हे शक्‍य होते आहे.
- सुरेश काकडे, प्रशासक, सोलापूर बाजार समिती, सोलापूर

लिलावासाठी प्रशस्त सेलहॉल, माथाडी कामगारांसह पुरेशा मनुष्यबळाचा योग्य वापर आणि सोयीसुविधा हेच सोलापूर बाजाराचे वैशिष्ट्य आहे.
- विनोद पाटील, प्रभारी सचिव,  सोलापूर बाजार समिती, सोलापूर

दहा हजारांच्या आत रक्कम असेल तर रोख पट्टी, त्यापुढे शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाइन पेमेंटसह चेकने पैसे देतो. त्याशिवाय खुला लिलाव, लिलावाअाधी वजन यांसारख्या कारणांमुळे सोलापूर बाजारात कांद्याची आवक वाढते आहे. खरेदीदारांनाही सोलापूर सोयीचे मार्केट वाटते. हा एकत्रित परिणाम बाजार वाढण्यात होत आहे.
- महेश ठेसे, अडत व्यापारी,  सोलापूर बाजार समिती, सोलापूर

दरवर्षी मी एक-दोन एकरांपर्यंत पाण्याच्या उपलब्धतेनुसार कांदा घेतो. सोलापूर बाजारपेठेत खुले लिलाव होतात. वजनही आधीच होते ही आमच्यासाठी महत्त्वाची बाब आहे. शिवाय पट्टीही रोख मिळते. त्यामुळे अन्य बाजारांच्या तुलनेत सोलापूर फायद्याचे मार्केट वाटते.
- अप्पा कोरके, शेतकरी,  गुळवंची, ता. उत्तर सोलापूर


बाजारपेठेची वैशिष्ट्ये 
लिलावाआधी वजन, खुले लिलाव, रोख पट्टी 
तीनशे अडत व्यापारी, १२५ खरेदीदार
कांद्यासाठी दहाहून अधिक प्रशस्त सेलहॉल
ऑक्‍टोबर ते मार्चपर्यंत खरेदी-विक्रीचा हंगाम
आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यात दळण-वळणाची सोय
चोवीस तास सुरक्षा रक्षक

दर अन् आवकेचा उच्चांक 
सन २०१५ च्या ३१ ऑगस्ट रोजी बाजार समितीमध्ये १३८२ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यावेळी सर्वाधिक दर प्रतिक्विंटल ७४०० रुपये इतका मिळाला होता. त्यानंतर यंदाच्या वर्षी दर काहीसे टिकून असले तरी आवकेचा मात्र ऐतिहासिक उच्चांक झाला. यंदा पहिल्यांदाच १६ डिसेंबर, २०१७ मध्ये सर्वाधिक ५० हजार ९६१ क्विंटल इतकी आवक झाली. दर मात्र चारहजार रुपये प्रति क्विंटलवर होता. या एकाच दिवसाची उलाढाल तब्बल ११ कोटी ३३ लाख ८८ हजार २२५ रुपये इतकी झाली.

: सोलापूर बाजार समिती,
०२१७-२३७४६७८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com