esakal | डाळिंब रसापासून अारोग्यवर्धक ‘मायक्रोकॅप्सूल’
sakal

बोलून बातमी शोधा

डाळिंब रसापासून अारोग्यवर्धक ‘मायक्रोकॅप्सूल’

डाळिंब रसापासून अारोग्यवर्धक ‘मायक्रोकॅप्सूल’

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

डाळिंबाच्या रसापासून मायक्रोकॅप्सूल तयार करण्याची नावीन्यपूर्ण प्रक्रिया मेक्‍सिको येथील शोध व विकास संस्थेतील (इन्व्हेस्टिगेशन ये डेसारेल्लो) संशोधकांनी शोधली आहे. या प्रक्रियेमुळे डाळिंबातील नैसर्गिक आरोग्यपूर्ण गुणधर्मावर परिणाम न होता त्याची टिकवण क्षमता वाढणार आहे.

डाळिंबामध्ये रक्तदाब कमी करण्याच्या गुणधर्मासह रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्याचे गुणधर्म आहेत; मात्र ते हंगामी फळ असल्याने वर्षभर त्याची उपलब्धता होण्यामध्ये अनेक अडचणी आहेत. मेक्‍सिको येथील हिडाल्गो विद्यापीठातील आरोग्य शास्त्र संस्थेमधील संशोधकांनी सांगितले, की डाळिंब लोकांना आवडत असले तरी त्याची साल काढून त्यातील दाणे वेगळे करून खाण्यासाठी अधिक वेळ लागतो. ती सहज करण्यासारखी गोष्ट नाही. त्यामुळे डाळिंब फळे फारशी खाल्ली जात नाहीत. त्यातील आरोग्यवर्धक गुणधर्मांचा लाभ घेण्यासाठी मायक्रोकॅप्सूल्स उपयोगी पडू शकतील, अशी कल्पना मनात आली.

त्यानंतर संशोधक गॅब्रियल कॅब्रेरा बेटानझोस यांनी डाळिंबाच्या रसापासून मायक्रोकॅप्सूल तयार करण्याची वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रिया शोधली आहे. त्यामध्ये डाळिंब रसाचे रूपांतर सुक्ष्म कणांमध्ये केले जाते. हे कण पाण्यात विरघळू शकतात. त्यांची साठवण अधिक काळापर्यंत करता येते. तसेच पाण्यात मिसळल्यास पचनही सुलभ होते.

भुकटी स्वरूपात अधिक उपयुक्त...
संशोधक कॅब्रेरा बेटानझोस आणि त्यांच्या गटाने डाळिंबाच्या रसाचे रूपांतर हे भुकटी स्वरूपामध्ये केले आहे. या कणामध्ये डाळिंबाचे नैसर्गिक व पोषक गुणधर्म असून, पचनसंस्थेमध्ये गेल्यानंतर सावकाश विरघळतात. मात्र सरळ रस घेतल्यास पचनसंस्थेतील द्रावणाच्या सामूमध्ये बदल होतात. परिणामी त्याची परिणामकारकता कमी होते.

प्रयोगशाळेमध्ये डाळिंब व या मायक्रोकॅप्सूलच्या चाचण्या घेतल्या असता, त्यामध्ये मधुमेहरोधक गुणधर्म आढळले, त्यामुळे या मायक्रोकॅप्सूलचा वापर उपचारामध्ये करणे शक्‍य होणार आहे. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब कमी होतो.

पाच ग्रॅम मायक्रोकॅप्सूल हे दोन फळांच्या बरोबरीचे असल्याचे मधुमेह असलेल्या गटामध्ये दोन महिन्यांसाठी केलेल्या प्रयोगामध्ये दिसून आले.

अर्थात, अधिक फायदेशीर वापराच्या दृष्टीने विशेषज्ञ अधिक संशोधन करत आहेत. या भुकटीपासून काढा, गोळ्या, कॅप्सूल किंवा भुकटी तशीच वापरणे या प्रकाराचे विश्‍लेषण करण्यात येत आहे.

loading image
go to top